राधी - खूप भावली...आत जाऊन भिडली...डोळ्यासमोर उभी राहिली...
राधी – सुनीत काकडे
वावराच्या बांधावरल्या गजपनात, ओढ्या नाल्याच्या दाट जाळीत एखाद्या नागीनी सारखी वाट काढंत ती आत शिरायची. चुंबळ करायला एखादं चिंधुक आणि जरमलची परात हातात घेऊन राधी माळरानाकडं निघाली की गावातल्या दोनतिन वाण्यांपर्यंत त्याची खबर पोट्टी सोट्टी पोहचवायची, खबरीच्या बदल्यात लालभडक गारेगार वसुल करायला ती विसरायची नाही. रानातुन येतांना परातीत न मावनारं गावरान मधाचं पोळ घेऊनच यायची. तसंबी वाडीतली पोरं काही रिकामे बाप्पे मध हुडकत फिरायची पर राधीची बातंच न्यारी होती. तिच्यावाणी मधं कोनालाच हुडकायला जमायचं नाही. तिच्या वाट्याचा भावपन जादा होता आणि वरून तिला मिठ मिरचीचा वानुळाबी मिळायचा. तिनं आणलेल्या मधाला बाजारात चढाभाव मिळायचा, एक राटवाडी वरून येणारा मास्तर प्रत्येक बाजारात ते खरेदी करून जायचा, काय माहीत कसं पन त्याला तिने आणलेलं मध बरोबर ओळखतां यायचं. त्याला चांगलीच मधाची पारख होती.
ऊद्या बाजाराचा दिस होता, राधीनं जरमलची परात ऊचलली, ओसरीला दारू पिऊन पडलेल्या दादल्याला कचकाऊन शिवी घालुन ती बाहेर पडली. या वाटांचा तिच्यावर जीव जडला होता, आपनहुन त्या तिच्यासाठी मोकळ्या व्हायच्या. ओढ्याच्या गवतात भले भले पाय ठेवायला टरकायचे पर तिला कधी भ्या वाटलं नाही आणि वाटांनीही तिला दगा दिला नाही.
रानातल्या जांभळीच्या दाट सावलीला किश्याच्या केसांतुन हात फिरवत ती गाणी गायची, तसा तिचा आवाज चांगला नव्हता पण किश्या म्होरं तिचं काही चालायचं नाही. वेळेच भान रहायचं नाही. पोटात आग पडली की किश्याचा हात धरून रानमेवा हुडकत फिरायचं. असंच त्याच्या सोबत फिरत असतांना टेकडाच्या कपारीवर मधाचं मोहळं दिसलं. कितीतरी थवे तिथं राबत होती. किश्याला त्या मधानं भुरळ पाडली, तो ईरेला पेटला व्हता, त्यांन जोखीम घेतली आणि तो कपारीला रेटुन पुढं सरकला. पर जे होऊ नये तेच झालं, तोल गेला आणि एक आर्त किंकाळी रानाचं काळीज चिरत हवेत विरून गेली.
त्या किंकाळीचा आवाज आजही तिच्या कानात घुमतो, त्या आवाजानेच ती भानावर आली, किश्या गेल्यावर वर्षा दोन वर्षात तिच्या बानं दारूच्या नशेत गावातल्याच बेवड्या सोकाजीशी लगीन लाऊन दिलं. तवापासुन पोटाची खळगी भरायला ती जरमलची परात घेऊन फिरतीए.
कपारी जवळ पोहचलेयावर तिला किश्या मधाच्या पोळाकडं सरकतांना काय म्हनाला होता ते आठवलं, 'पुढच्या वेळेला डब्बा घेऊन येईल, आण्णाला खुप आवडंल मध, मामा सोबत राटवाडीला पाठऊन देईल...'
पर तिला अजुनही एक कोडं ऊलगडत नाहीए, एवढ्या जालीम माशींच पोळ उघड्या हातांनी काढुनसुद्धा तिला एकही मधमाशी चावत का नाहीए....?