एखादे प्रेम आत जपत जगाव लागत...त्याची पालवी सुकू द्यायची नाही हे तत्व आपण जपाव लागत...
प्रेम-मृणाल वझे
तो तिच्या प्रेमात लहानपणापासूनच होता .... नक्की कधी सुरवात झाली ते त्याला सुद्धा आठवत नाही.
साधारण शाळेत जायला लागला होता तेव्हा ती त्याच्या दृष्टीस पडली. मग मात्र त्याला ती फार हवीहवीशी वाटायला लागली. फार वेळ तिच्या बरोबर राहिला की आई वाकून वाकून बघायची. मधेच कधीतरी दटावायची. पण मग मात्र काहीतरी पुटपुटत निघुन जायची.
जस जसा मोठा होत गेला तस तसे प्रेम वाढायला लागले. सारखं तिच्याबरोबर राहावं असे वाटू लागलं. मग मात्र आईने विरोधच पुकारला. आता जास्तच लक्ष देऊ लागली. ओरडू लागली. बाबाना नाव सांगीन अशी धमकी पण देऊ लागली !!
मग त्याने जरा आवरतेच घेतले! १०/१२ वीच्या परीक्षेच्या वेळी त्यानेच मनावर दगड ठेवला. त्याच झटक्यात इंजिनियरिंग पूर्ण केले.
आता तरी ....!!! पण नाहीच जमले त्याला ... !नाही विरोध करू शकला आपल्या आई वडिलांना ...!
मग काय नोकरी .... लग्न .... संसार ह्यात तो इतका गुरफटून गेला की सरतेशेवटी तो आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आला ... नोकरीतली निवृत्ती ... !!!
मधून मधून ... बहुदा रोजच दमून अंथरुणाला पाठ टेकतांना, त्याला रोज एकदा तिची आठवण यायची. पण दमल्याने डोळ्यावर झोप असायची. आणि तो स्वप्नातच रंगून जायचा तिच्या बरोबर...!!!
आज निवृत्तीनंतरचा पहिला दिवस... उठतानाच मोकळा श्वास घेतला .... मन खंबीर केले ... अर्थात आज आईबाबांची करडी नजर न्हवतीच त्याच्याकडे ...!
आज त्याने कोणालाच जुमानायचे नाही असे ठरवले .... पायात चप्पल घालून तो आपल्या प्रेमाला भेटायला निघाला .... आता उरलेले आयुष्य फक्त तिच्या बरोबर घालवायचे असा निर्धार केला आणि तो दुकानात शिरला ......
दुकानदाराकडे त्यांनी त्याच्या प्रेमाची " चित्रकलेच्या वहीची " मागणी केली ... आणि छातीशी कवटाळून तो घराकडे परंतु लागला.