आजची सुचीताची कथा वेगळी आहे...तिच्या नेहमीच्या बाजा पेक्षा...आणि हेच मला तिचे कौतुक वाटते...ती प्रयोग करीत रहाते.
फुलराणी – सुचिता घोरपडे
आबांना शोधत शोधत परसदारी आले, तर ते तिथेच होते त्यांच्या जीवाभावाच्या वडाच्या जोडीने वाढलेल्या फुलराणीच्या वेलीजवळ बसलेले. आज माईला जाऊन चार महिने होत आले पण आबांची मनस्थिती अजूनही काही बदललेली नव्हती.कितीवेळा आबांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्न केला पण व्यर्थ. आबांनी अगदी घट्ट कोषामध्ये बंद केले आहे स्वतःला. माईसोबत व्यतीत केलेल्या सगळ्या आठवणी जश्या काही त्यांनी आतमध्ये साठवून ठेवल्या आहेत आणि जगाचे भान विसरून ते फक्त त्या आठवणी सोबतच जगत आहेत. त्यांचा कोणी सोबती असेल तर तो परसदारी असणारा वड आणि त्यावर चढलेली ती फुलराणीची वेल.
वर्षानवर्षे जशी माईने आबांना सोबत केली तशीच काहीशी ह्या वेलीनेही त्या वडाला सोबत केली आहे. तो वड तिच्या फुलांनीच सजला आहे. त्याच्या आधाराने वाढताना ती वेलही स्वतःचे अस्तित्व विसरून हसते, फुलते. फक्त त्या वडासाठीच जणू काही ती सजते सवरते. तिने तिच्या फुलापानांनी त्याच्या पूर्ण अंगा खांदयावर हिरवी जरतार विणली आहे आणि त्यानेही अगदी प्रेमाने तिला आपलेसे केले आहे. त्यांना वेगळे पाहताच येत नाही कधी, असे वाटते की ते दोघे एकमेकात अखंड मिसळून गेले आहेत. तिच्या शिवाय तो आणि त्याच्या शिवाय ती अधुरेच वाटतात. अगदी माई आणि आबांसारखे. कधी असे वाटलेच नव्हते की माई आबांपैकी एकाला असं एकटे झालेले पहावे लागेल. आबा अगदी एकटे पडले आहेत माई शिवाय.
का कोणास ठाऊक पण माई गेल्या पासून ही फुलराणी सुकत चालली आहे. किती खतपाणी केले आबांनी पण तिची पानगळ काही केल्या थांबत नाही आहे. आता तर आबा रोजच तिच्या सोबत माईशी बोलल्याप्रमाणे बोलत राहतात. असं म्हणतात की झाडांसोबत बोलले की त्यांची चांगली वाढ होते. पण ही वेल तर सुकतच चालली आहे. तो वडही सध्या हिरमुसलेलाच वाटतो. फुलराणीच्या वाळत चाललेल्या झामोळ्यांनाही त्याने अगदी घट्ट कवटाळले आहे.
आबांना सोडून जायला मन तयार होत नाही आहे. पण काय करावे मुले तिकडे एकटी आहेत. आणि आबा काही केल्या हे घर, त्या वड आणि फुलराणीला सोडून यायला तयार नाहीत. त्यांच्याही भावना गुंतल्या आहेत या सर्वांमध्ये. साहजिकच आहे ते. त्यामुळे असं त्यांना एकटे सोडून आबा कधीच नाही तयार होणार माझ्यासोबत येण्यासाठी.
काही दिवसांनी आबांचा फोन आला, “आपली फुलराणी पडली गं मनु....माझा वड आज धाय मोकलून रडत आहे.....त्याची सोबत तुटली...उन्मळून पडली गं फुलराणी. माझ्या वडाला आता असं ओणवा झालेलं मला नाही पहावत मनु.....”आबा आज माई गेल्या पासून पहिल्यांदा असे रडत होते. मला आता त्यांची काळजी वाटत होती.
मी खूप समजावलं आबांना तेव्हा कुठे आबा शांत झाले.माईलाच पहात होते ते त्या फुलराणीत आणि आज ती गेली परत एकदा त्यांना एकटे सोडून.
मागे एकदा गावी जाऊन आले. आबांना भेटून मन खूप उदास झाले. आबा अगदी एकाकी दिसत होते. परसदारीचा वडही खूप थकल्या सारखा वाटत होता. त्याचीही दशा आबांसारखीच झाली होती. तोही फुलराणी गळून पडल्यापासून एकाकी झाला होता. फुलराणी शिवाय ओकाबोका झालेले त्याचे रूप पाहवत नव्हते. ह्यावेळीही आबा नाही आले माझ्यासोबत. मला म्हणाले, माझी गरज आहे वडाला, मला इथे थांबलेच पाहिजे.
एक दिवस परत आबांचा फोन आला, “मनु आपला वडही पडला गं आज. फुलराणीविना नाही राहता आले त्याला एकटे....तो नाही जगू शकला फुलराणी शिवाय. त्याचे अस्तित्वच तिने स्वतः सोबत नेले होते, मग कसा राहील तो तिच्याशिवाय......?”
आबांनी फोन ठेवला...मी ध्यानावर आले आणि अचानक एक अनामिक भीती उरी दाटून आली. आता मला जावे लागणार होते. आबा... आबा आता खरंच एकटे पडले. माझी गरज आहे त्यांना. मला गेलेच पाहिजे.
मी गावी आले. अंधार दाटला होता. तडक आत शिरले. आबा आराम खुर्चीत माईचा फोटा छातीशी कवटाळून झोपले होते. मी अलगद तो फोटो काढून घेतला आणि....आणि आबांचा थंडगार स्पर्श हाताला जाणवला.