सुप्रिया भारस्वाडकरचे नुक्कड वर हे पदार्पण आहे...खूप अपेक्षा निर्माण करणारी कथा तिने दिली आहे.
आभास-सुप्रिया भारस्वाडकर
खिडकीतून घराच्या मागचा हिरवागार डोंगर आणि तो छोटासा धबधबा पाहून तिला खूप तीव्रतेने त्याची आठवण झाली. तिच्या मनात विचारांचे अनेक छोटे मोठे हिरवे डोंगर उभे राहिले.. अगदी समोर दिसत असलेल्या डोंगरासारखे. तो असता तर काय केले असते त्याने हा नजारा पाहून? हळूच मागून येऊन त्याने तिचे डोळे बंद केले असते, ती नेहमीप्रमाणेच त्याच्या स्पर्शाने रोमांचित झाली असती. मग त्याने विचारले असते जाणूनबुजून, ओळख पाहू कोण? आणि तिनेही माहिती असून उत्तर दिले असते, आधी ओळख पटण्यासाठी काही खूण तर हवी ना. मग त्याने नुकतीच सुचलेली एक कविता त्याच्या हळुवार आवाजात गाऊन दाखवली असती. त्याची कविता पूर्ण होईपर्यंत त्याच्यात हरवून गेलेली ती, अचानक भानावर आली असती आणि नेहमीप्रमाणेच त्याच्या मिठीत सामावून गेली असती.
स्वतःच्याच विचारात गुंगून गेलेली असताना तिची तंद्री मोडली त्या पावसाच्या थेंबांनी. जणू तिला वास्तवात आणण्यासाठी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली होती. चेहऱ्यावर पडणाऱ्या त्या तुषारांनी तिला जाणवले की ती पुन्हा एकदा त्या स्वप्नांच्या दुनियेत रमली होती. तो असण्याचा आभास तर आहे, पण तो कुठे आहे प्रत्यक्षात? कुठे आहे, कसा आहे काहीच तर माहिती नाही आपल्याला. त्याला आपली आठवण आहे की नाही हेही माहित नाही. आणि आपण मात्र अजूनही त्याच्या येण्याची वाट पाहतोय.
तो येऊनही वास्तवात काहीच फरक पडणार नव्हता. दोघांच्या वाटा नियतीनेच वेगळ्या केलेल्या होत्या तेव्हाच. पण फक्त एकदा त्याला बघण्याची, भेटण्याची आस मात्र कायम होती. बाहेर पावसाच्या काळ्याकुट्ट ढगांनी जस अंधारून आलं होत, तसं तिचं मनही उदासीनतेने झाकोळून गेलं. आणि जसजसा पावसाचा वेग वाढत गेला, तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा आवेग तिलाही थोपवता येईना..