सुमित्राचे अनुभव विश्व .... एक समृद्ध कथा
हुंकार – सुमित्रा
अस्ताव्यस्त पसरलेल्या मनाला गोळा करत ती उठली तरी मनातल्या आणि तनातल्या तृप्तीला ती थांबवू शकत नव्हती. उसळत्या आणि उफाळत्या लाटेवर स्वार होत एकमेकांत मिसळून गेलेली ती अख्खी वेळ आठवत ती तशीच बसून राहिली होती.
मागे वळून पाहिल्यावर तिला आणखीनच तृप्त वाटलं, कारण तोही तसाच हलेकच हसू चेहऱ्यावर पसरून झोपला होता. त्याच्या घट्ट मिठीची आठवण तिला पुन्हा शहारवून गेली आणि त्याच वेळेस तिच्या डाव्या बाजूनं मुटकुळं करून झोपलेल्या इवल्या हातांनी तिला जवळ ओढल्याचा भास झाला. ती वळली.
तो त्या मुटकुळं करून बिनघोर झोपलेल्याने त्याच्या बाळमुठींनी तिच्या बोटांना धरून ‘ममम..आंआं...’ असं काहीस घशातल्या घशात गुरगुर आवाज करत तिला ओढलं आणि मगाच्या घट्ट मिठीपेक्षा आत्ताच्या या क्षणी तिला या बाळमिठीची भूल वाटली..
त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या करता येईनात तेव्हा त्या बाळमिठीच्या आणि घट्ट मिठीच्या तिच्या अशा त्या दोघांच्या मधोमध झोपत दोघांना स्वतःशी कवटाळून घेत तृप्तीचा हुंकार दिला..