संजनने बाळा ही व्यक्तिरेखा उभी करायला सुरुवात केली तेंव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो....आत्ता पर्यंत त्याने ४ भाग पोस्ट केले आहेत..ते क्रमश: देणार आहे.
बाळा-संजन मोरे
१
आज रविवार ...सुट्टीचा दिवस. मनसोक्त खेळायचा दिवस. पण त्याला हा दिवस कसा घालवायचा? असा नेहमी प्रश्न पडत असे. गल्लीतली पोरं त्याला मिसळून घेत नव्हती. त्याला वडिल नव्हते. त्याच्या आईविषयी चांगलं बोललं जात नव्हतं. भावकीतली पोरं “ये कडू च्या … “ अशी त्याला हाक मारायचे. मग भावकीच्या पोरात त्याला मिसळावेसे वाटायचे नाही. पोरं सुट्टीत धमाल करायची.राना शिवारात मनसोक्त भटकायची. रानमेवा गोळा करत हिंडायची, झाडावर चढायची. पेरू, जांभळं, आवळे, सिताफळं, बोरं, गाजरं. शिवारात गेल्यावर मेव्याला तोटा नव्हता. त्याला पण खूप भटकावंसं वाटायचं. पोहावंसं वाटायचं, सूरपारंब्या खेळाव्यात असं वाटायचं. त्याला जास्त काही कळत नव्हतं. एकदा त्याने सोबत्याला विचारले सुद्धा……. “तूमच्या घरी बाहेरच्या जातीचा माणूस येतो म्हणून तू कडूचा आहेस “ असं काहीतरी न कळण्यासारखं सांगीतलं होतं त्याने त्यावेळी. मग त्याने न राहून आईला विचारले सुध्दा. “ बाळा आपली शेती आहे, ती भावकीला घशात घालायची आहे. हे काका तूझ्या वडिलांचे मित्र आहेत. यांच्या माघारी त्यांचाच आधार, शेतीचं ते बघतात. भावकीला ते बघवत नाही. तू त्यांच्यात मिसळू नकोस. “....
आईने सांगीतलेलं बरंच त्याच्या डोक्यावरून गेलं. पण तेंव्हापासून त्याचे मित्र कमी होत गेले. तो एकटा राहू लागला. शाळेतही एकटाच स्वतःच्या कोषात राहू लागला. पण हल्ली त्याचं एकाशी छान जमत होतं. त्याला एक नविन मित्र मिळाला होता. गोर्या गोमट्या पोरांच्यात एक काळा कुळकुळीत पोरगा उठून दिसायचा. चिवट, चलाख. मैदानी खेळात तो कुणाला अैकायचा नाही. पण अभ्यासात त्याला डोकं नव्हतं, मग हा त्याला मदत करायचा. त्यामुळे दोघांची दोस्ती लवकरच जूळली.
आज त्याच्याकडेच जायचे खेळायला. गावाच्या वर, शेवटच्या टोकाला धनगरवाड्याजवळ नाईक वस्तीत तो मित्र राहत होता. सकाळचा नाश्ता करून, आईला विचारून तो निघाला. गल्ली गल्लीत पोरांचे डाव रंगले होते. खेळ बघताना तो नेहमी तल्लीन होवून जायचा, पण आज त्याची पावले रेंगाळली नाहीत. कुभारवाडा, सुतारमेट लोहारआळी सावता माळी मंदिर, असा प्रवास करत त्याची पावलं गावाच्या वरच्या टोकाला आली.मग एक वेगळंच जग सुरू झालं. दगड मातीची घरं, छप्परं, शेरडा मेंढरांचे दगडांचे वाडगे, जाळी. शेणामुताचे वास रस्त्यावर पसरलेल्या लेंढ्या, कारवानी कुत्री. धूळीत मातीत खेळणारी मुलं. त्याने उमाकांत चं घर विचारलं. वस्तीच्या वरच्या टोकाला भिकाजी नाईकाचा वाडा होता. वाडा म्हणजे एक जूनाट भलं दांडगं दगडी घर. समोर मोकळं पटांगण. बाजूला मेंढरांचे कळप. वाघरीच्या जाळ्या. घरासमोरच्या बाजल्यावर भिका नाईक, सकाळच्या उन्हाला निवांत पडला होता.
“ उमाकांत आहे …? “ त्याने म्हाताऱ्याकडे चौकशी केली.
“ कोण उमाकांत ..? “ म्हाताऱ्याने बावचळून त्याच्याकडे पाहत विचारले.
“ उमाकांत आबाजी नाईक … “ त्याने उत्तर दिले
“ उम्या व्हय ?... आरं मंग उम्या म्हण की ! त्यो माझा नातू ...त्या तिकडं तालमीकडं असल बघ … “ त्याची पावलं दाखवलेल्या दिशेला वळली. एका पटांगणात लाल माती टाकून आखाडा केला होता. त्यात नाईकाची गोटीबंद पोरं , सकाळच्या कोवळ्या उन्हात लांग, किस्ताकावर एकमेकांशी झटत होती. लंगोटी लावलेली बारकी पोरं जोर बैठका मारत होती. दंड ठोकत होती. उमाकांत पण त्यांच्यातच होता. मुरली वस्ताद पैलवानांना डाव शिकवत होता. याला बघीतल्यावर काळ्या चिवट देहाचा, लंगोटी लावलेला छोटा उमाकांत लाजला. त्याने कपडे चढवले. मग दोघे त्याच्या घरी आले….
“ तू घरात बस ..मी आंघोळ करून लगेच येतो .. “ असे म्हणत तो आंघोळीला पळाला. पटांगणात ठेवलेल्या दगडी शीळेवर त्याने बादलीतले पाणी अंगावर घेतले. म्हाताऱ्याच्या जुन्या धोतराने अंग पुसले. पैरण, चड्डी चढवली. घरात आला. आरशात बघून भांग पाडला. “ चल जेवू या .. “ म्हणत त्याने त्याला आईपुढे न्हेले. उम्याची आई भाकरी थापत होती. एक भाकरी हातात, एक तव्यावर, एक चूलीवरच्या निखाऱ्याला लावली होती. उम्याने दोघांची ताटं काढली.
“ उमाकांत ..मी नाश्ता करून आलोय ..तू जेव मी बसतो. “ तो आढेवेढे घेवू लागला.
“ ये पोरा ...तू उम्याचा मैतर ना ? मग बामणावानी करू नगसं, उम्याबरं थोडं जेव ..सश्याचं मटण आवडतं ना तूला ? “ उम्याची आई म्हणाली.
“ नाही ...आमच्या घरी केलं नाही अजून कधी तसलं “ त्याने आवंढा गिळत कसे बसे उत्तर दिले.
“ त्याचं बोलणं पुर्ण होत नाही तोवर उम्याच्या आईने एक भाकरी अन दोन पळ्या सशाचं सुक्कं मटण ताटात वाढलं,त्याच्या पुढ्यात ठेवलं. उम्यालाही वाढलं. आंबूस चवीचं, तेल मीठाचं, तांबड्या तिखटातलं , घट्ट सुक्कं मटण आपण कधी संपवलं ते त्याला कळलंही नाही.
“ अजून वाढू का रं ? “ उम्याच्या आईने त्याला विचारले.
“ नको नको ...खूप जेवलो. “ असे म्हणत गडबडीने त्याने ताटात हात धूतला. उम्या जेवतच होता. दोन भाकरी अन चार पाच पळ्या मटण संपवून मग उम्याने हात धूतला.
“ दूध घेतोस का रं ? “ उम्याच्या ग्लासात चूलीवर तापवलेलं खरपूस दूध ओतत त्या माऊलीने याला विचारले.
“नको नको ...आता काही जाणार नाही . “ घाबरतच दूधाच्या वितभर उंचीच्या ग्लासाकडे बघत त्याने उत्तर दिले.
ग्लास भरल्यावर तीने एक गुळाचा खडा, पाट्यावर वरवंट्याने चेचला. त्याचा चूरा ग्लासात ओतला. ग्लास उम्याकडे दिला.
“ आता हिथंच खेळा. दुपारी जेवायला या. ये पोरा ..दूपारी जेवायला घराकडं जावू नगंस. उम्याबरं जेव हिथंच ..चांगलं बरबाट करते मांदाललेल्या कोंबडीचं. तूझी बाजिंदी आय लक्ष देती का न्हाय तूझ्याकडं ? कसलं हाडाडून गेलंय लेकरू ! आमच्या उम्याकडं बघ …. “ तीचं बोलणं संपेपर्यंत दोन्ही पोरं घराबाहेर उधळली होती.
त्याला आज एक वेगळंच जग खूलं झालं होतं ! एक नवं घर मिळालं होतं !