कल्पि श्याम जोशी...खूप गर्भार शब्द असतात त्यांचे...खूप जागा वाचकासाठी सोडतात...आपण त्या भराव्यात अशी त्यांची रास्त अपेक्षा असते.
पुडा-कल्पि श्याम जोशी
तिच्या खेळण्यात एक तुटलेले चाक, दोन अर्ध्या पेन्सिली.....कापडाची बाहुली..तिच्या डोळ्यात जरा जास्तच काजळ...ओठाची जागा लालचुटुक गंधाने घेतलेली..पण बाहुलीचे कपडे मळकट...........भोकाड पसरले की तिची माय हा सर्व पसारा तिच्यासमोर पसरवायची...
खुप इच्छा होती जत्रेत पाहीलेला भांड्याचा पुडा घ्यायची ..जत्रा संपली पण मनात ते रंगिबेरंगी भांड्याचे पुडके तळाला अडुन बसले होते......चार घरची भांडी घासताना तो पुडा खुपच सतावायचा तिला..आपण लहानपणी नाही खेळलो, आपल्या लेकिला तरी मिळावा म्हणुन बापुडी हिरमुसलेली...
एक दिवस मालकिणीने घर आवरायला “ये कमले” म्हणुन साद दिली....गेली पदर बांधुन.
घर आवरताना मालकिणीच्या लेकिचा खेळ दिसला..बघुन हरकुन गेली कमली.