Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

कापूस कोंड्याची गोष्ट! - प्रा. माधवी भट

$
0
0

माधवीचे लिखाण म्हणजे प्रतिभेची भरारी असते...त्यात एका वैश्विक(universal)सत्याची आस असते...स्त्रीच्या स्त्रित्वाचा शोध असतो...एक मनस्क लेखन असते तिचे...ही नुक्कड कथा तुम्हाला असाच भारावून टाकणारा अनुभव देईल..

विक्रम

कापूस कोंड्याची गोष्ट! - प्रा. माधवी भट

विस्तीर्ण, विस्तृत आणि निरभ्र आकाश आहे! पिठूर चांदण पडलंय का माहित नाही, चंद्र आहे का माहित नाही...वारा झुळूझुळू वाहतोय का माहित नाही! एकुणातच विशेष काही माहिती नाही. आकाशाखाली विस्तीर्ण मैदान पसरलेय..बहुदा नुसती वाळू आहे. वाळवंट म्हणा ना! आजूबाजूला कुठली झाडं नाही की वेली नाहीत. एकुणातच ज्यामुळे हिरवं प्रसन्न वाटावं असंही काही नाहीय. नाही म्हणायला काही दिवट्या पालवल्या आहेत. त्या कुणी पालवल्या ठाऊक नाहीत. त्यांची उब नाही मात्र पिवळसर प्रकाश आहे. त्या प्रकाशात सारं कधीतरी झळाळून दिसतं, कधीतरी रोगट पिवळं दिसतं तर कधीतरी उदास दु;खी वाटतं.

अश्या “आकाश मंडप – पृथ्वी आसन“ च्या मध्ये त्या दोघी बसल्यायात. त्या कधीच्या बसल्यायात ते कुणाला माहिती नाही. त्यांच्या चेह-यावरचे भाव फारसे वाचता येत नाहीत. जरा जवळ जाऊन निट बघाल तर डोळे वाचता येतीलही. पण ते देखील जरा अवघड आहे. युगांपासून एकाजागी खिळून बसलेल्या त्यांना आताशा स्थिरत्व आलेय. दोघींनीही आपले पाय जरा जवळ घेतलेत आणि त्याभोवती हातांची कडी घातली आहे. त्यांच्या हातात अवजड आणि बलदंड अशी चांदीची कडी आहेत. दुरून ती दागिन्यासारखी सुंदर दिसतात, जवळ जाऊन बघाल तर त्या कड्या वाटतात. दोन्ही हातांची बोटं एकमेकीत गुंफून ठेवली आहेत त्यांनी. आता काही ती पकड सुटायची नाही असे वाटते. हात गोठलेत त्यांचे. पाठीचा कणाही आता जसाच्या तसाच आहे. तो ताठही नाही की झुकतही नाही. मान? ती हातांच्या रेषेत सरळ बघतेय. तिचेही पाठीसारखेच...मान हो देखील म्हणत नाही आणि नाहीही नाही.

त्यांना अनेकांनी पाहिलंय. कुतूहलाने, थट्टेने, गांभीर्याने ...काहींनी त्यांच्यावर लेख लिहिले. काहींनी कविता...काहींनी नाटकं...काहींनी चित्रे काढली आणि काहींनी शिल्पे घडवली. हे त्या दोघींना माहिती नाही. एखाद्या घरंदाज , पुरातन वाड्यातले इनामदारी लोक किंवा वारसदार जसे वेड लागल्यासारखे सैरभैर होऊन मग नुसते एका जागी बसून शून्यात बघत रहातात किंवा मुंग्यांची रांग न्याहाळत राहतात तश्या त्या अनिमिष नेत्रांनी समोर पहात राहतात.

खूप जवळ गेलात आणि नीट शांतपणे ऐकायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल त्या काहीतरी पुटपुटत आहेत. त्या काय बोलतायत ह्याची मात्र एक गोष्ट आहे. ती कर्णोपकर्णी होत सर्वत्र पोचलीय. कुणी तिला लोककथा म्हणतं, कुणी दंतकथा...कुणाला ती खरी वाटते कुणाला नुसतीच टाईमपास ...! मात्र कथा नक्कीच आहे. तर कथा अशीय की –

एक गाव होता आणि त्या गावात त्या दोघी मैत्रिणी रहात असत. लहानपणाच्या सख्या त्या ..पुढे त्या एकमेकींच्या जावा झाल्या. आनंद गगनात मावेना त्यांचा.. सारा गाव त्याना आता ज्येष्ठा कनिष्ठा म्हणू लागला. ज्येष्ठा कनिष्ठा केवळ नावाला होत्या. तश्या त्या सारख्याच. आराश्यापुढे उभं राहावं इतक्या एका मनाच्या ...भोळ्या , स्वप्नील आणि हस-या..! खरे तर बाईने असं राहू नये. म्हणजे भोळं असावं, मात्र स्वप्नील असू नये..किंवा स्वप्नील असलं तरी हसरं असूच नये. आता ह्या तर तीनही गुण युक्त होत्या. भोळेपण इतुकं की कुणी काहीही म्हटलं की त्यांना खरं वाटे...स्वप्नील इतक्या की त्यांना एकमेकीना इंद्रधनुषी चुडा लेऊन द्यावा वाटे, बुच फुलांचे लोलक कानात घालून मिरावावं वाटे आणि नुसतं नुसतं धुकं पांघरावं वाटे. त्यांनी प्रेम करावं तर भान हरपून, जीव लावावा तर उधळून देऊन आणि दान द्यावं तर हाती काहीही ठेवू नये...! त्यांच्यात जी ज्येष्ठा होती ना तिला जरा जगाचं आकलन जास्त होतं. कनिष्ठा त्यामानाने अधिक खुळी !

त्या अश्या बंधमुक्त स्वच्छंद झ-यासारख्या ..होय होय त्याच कवितेसारख्या –

तू तलम अग्नीची पात जशी दिनरात जळावी मंद! तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंद !!!!!

नुसती दुरून पहायला बरी वाटते अशी स्त्री. ती स्पर्शून प्रत्यक्षात वरायची असेल तर मात्र आपले हात फुलांचे करावे लागतात हा साधा नियम आहे. पण दरवेळी असं होत नाही. त्या दोघींचं तेच झालं. घर उभं करणार होत्याच त्या कारण त्यांचा तो स्वभाव होता. मात्र मघा सांगितलं ना? त्यांना स्पर्शायचं तर फुलाचं व्हावं लागेल. तसं झालं नाही. करपत गेल्या त्या. झेपल्या नाही घरातल्या पुरुषांना...मन उभारी घेईना झालं...आपण बावळट आहोत हा साक्षात्कार रोज होऊ लागला....आपसूक फुलून येण्याचा धर्म असलेल्या दोघी कोमेजत गेल्या...फुलल्याच नाही कधी सर्वार्थाने ...!

ज्येष्ठेला लवकर आकलन झालं..तिला कळलं आता इथे टिकाव लागणार नाही. आपली घडण तशी नाही. आता उन्मळून पडू त्यापरीस इथून दोर तोडायचे. पण कनिष्ठेला सांगायचं कसं? तिला यातून दूर न्यायला हवं...

एक दिवस नदीवर धुणं धुऊन वाळवून झाल्यावर ज्येष्ठेनं कनिष्ठेला जवळ घेतलं...म्हणाली तुला एक कथा सांगू ? कनिष्ठा कसनुसं हसत हो म्हणाली...!

“ पण एक अट आहे बरं कनिष्ठे!”

कनिष्ठेने.. कोणती? असं मानेनेच विचारलं . .

ज्येष्ठा म्हणाली “अट ही की कथा संपेपर्यंत मी विचारेन त्या प्रश्नाला उत्तर देत रहायचं. आणि कुणीही आलं तरी कथा संपेपर्यंत मला सोडून जायचं नाही.”

कनिष्ठा मनात म्हणाली यात काय फारसं ? एरवीही ही काहीही म्हणेल त्याला आपण डोळे मिटून उत्तर देतोच की...आणि हिला सोडून कुठे गेलोय आजवर आपण....?

आणि दोघीही चालत चालत, बोलत बोलत दूर जात राहिल्या....मग ....ज्येष्ठेने विचारलं

“कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? “

कनिष्ठा म्हणाली ‘होय“ ...

ज्येष्ठा पुन्हा म्हणाली “होय काय म्हणतेस? कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?”

कनिष्ठा म्हणाली ‘सांग ना...”

असा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरु राहिला....तो अजूनही सुरुय....तुम्ही जवळ जा दोघींच्या त्या मंद पुटपुटत आहेत...ते हेच आहे...

’कापूस कोंड्याची गोष्ट“

इकडे त्या दोघींना शोधत गाव लोटला...त्या काही सापडे ना...चालत चालत त्या कुठल्या दिशेला गेल्या ते कळेपर्यंत कनिष्ठेला मनातच कळून चुकलं आता हिच्यापासून आपण निराळे नाही....किती सहज त्या जाचातून हिने सोडवलं आपल्याला ..!

त्यांच्या नव-यांनी त्यांना जागे करायचा प्रयत्नही केला नाही. मात्र गावकरी बायका चुटपूटत राहिल्या. त्यानंतर मात्र प्रत्येक बाईने घरातल्या मुलीला स्वप्नांसोबत कणखरपणा शिकवला...आपल्या स्वप्नांना आपणच अभेद्य कवच द्यायचं हे ही सांगितलं आणि झालीच परिस्थिती हाताबाहेर तर तीच स्वप्नं लेकारासारखी पाठीला बांधून सा-या तटबंदीवरून घोडा फेकून उडी घ्यायची हेही शिकवलं .. चटके बसतात, दाह होतो..झळ लागतेच जीवाला पण म्हणून अशी जगरहाटी सोडून रुसून बसू नये हेही ...!

धाक घातला की कुणी कुणाला पुन्हा कापूस कोंड्याची गोष्ट कधी सांगू नये...! काहीतरी रुजायला कुणाचा तरी बळी जातोच मात्र...ते पाहिलं दान देवाला असतं ना? ते मात्र त्या ज्येष्ठा कनिष्ठेचं द्यावं लागलं !!!!!!

इतकंच !!!! .


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>