चकवा नसलेली गोष्ट......
चकवा - उमेश पटवर्धन
कॉलेजमध्ये त्यांची नजरभेट झाली आणि ते चक्क प्रेमातच पडले. प्रेमात पडल्यावर काय काय करायचं ते तिनं कथा कादंबऱ्यातुन वाचलं होतं. ते सगळं सगळं तिला करायचं होतं. मग तिने गुलाबी कागद, गुलाबी envelop आणले. त्याला प्रेमविव्हळ अवस्थेत पत्रं लिहिली. तिचं काव्यात्मक लिहिणं त्याला विशेष समजायचं नाही. पण तो ते गोड मानून घ्यायचा.
एकदा तर तिने त्याला रक्ताने I love you लिहून पाठवलं. पण त्याचं धाडस न झाल्याने त्याने साध्या पेनने 'I love you too' असं लिहून पाठवलं. ते तिनं गोड मानून घेतलं.
प्रेमातला महत्वाचा टप्पा म्हणजे पळून जाऊन लग्न करणे. तिने तशी जोरात तयारी करायला सुरुवात केली होती. एक दोन मैत्रिणींना सांगूनही ठेवलं. पण हाय ! ती वेळच आली नाही, दोन्ही घरचे तयार झाल्याने तिची ती हौसही राहून गेली.
मग यथावकाश त्यांचं लग्न झालं. पहिलं वर्ष तर फुलपाखराच्या स्वच्छंदीपणाचे होतं. ते दोघे तर जणू हवेत तरंगत होते..आणि मग..
'आणि मग काय?'
लिहिता लिहिता मी एकदम थांबलो. कुठुन आवाज आला बरं?
'अहो, इकडं बघा लेखक महाशय. आम्ही तुमची साधी, भोळी भाबडी पात्रं आहोत हो'
ती दोघे कागदातून बाहेर डोकावून माझ्याशी चक्क बोलत होती!
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. असंही होऊ शकतं?
'आता तुम्ही कथेत ट्विस्ट आणण्यासाठी काही प्रसंग पेरणार ना?' तो म्हणाला
'म्हणजे त्यांची कुरबुर, भांडण वगैरे.. किंवा याची बदली होऊन आमची ताटातूट वगैरेे..' ती म्हणाली.
'किंवा प्रेमाचा त्रिकोण..' तो डोळा मारत म्हणाला. तिने डोळे मोठे करत त्याला एक चापटी मारली.
'Hmm, means.. असं काहीसं डोक्यात येऊ लागलं होतं' मी डोकं खाजवत म्हणालो
'अहो, कशाला आमच्या सुखी संसाराला नजर लावलाय राव? आता तुम्ही म्हणाल, कथेत ट्विस्ट नसेल तर कोण वाचेल ती कथा? काय खरं की नाही?' ती म्हणाली.
'हं..असंच काहीसं..' मी
'अहो, गरज नाही हो या सगळ्याची. आम्ही दोघे खूप सुखी आणि आनंदी आहोत आणि पुढेही असेच राहणार आहोत' असे म्हणून ती दोघे हातात हात घालून परत कथेत शिरले.
'आणि ते सुखानं नांदू लागले..' असे लिहून त्यांच्या संसाराला कोणताही धक्का न लावता मी माझी कथा संपवली.