अशा कथा दररोज लिहिल्या जात नाहीत. खूप सशक्त!
अस्तित्व – भाग्यश्री भोसेकर बिडकर
तिने दरवाजा उघडला..दरवाजाचा करकर असा आवाज आला नेहमीप्रमाणे...चप्पल काढून ती सोफ्यात बसली...शांत..निर्विकार..निश्चल..तिचा ज्वालामुखी होत होता..वरवर शांत पण आत खूप वादळं असणारा...वेगवेगळे आवाज तिच्या कानात तांडवनृत्य करू लागले...तिच्या एकाकीपणाशी पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देऊ लागले.
"तो गेलाय म्हणे!!!!!" ती स्वतःशीच बडबडली..काय करत होती ती..तेच तेच वाक्य पुन्हा पुन्हा घोकून सत्य स्वीकारायचा प्रयत्न करत असावी कदाचित....बसलेला धक्का पचवायचा प्रयत्न करत असावी कदाचित
ती बाथरूममध्ये शिरली..झरझर दोन तांबे पाणी अंगावर घेती झाली....'त्याच्या नावाने आंघोळ!!!??' ती किंचाळली..अंगावर पाल पडावी तसा तो विचार झटकून ती वेगाने बाहेर आली...समोरच्या आरशात स्वतःलाच निरखत विचार करू लागली..असा कसा जाऊ शकतो तो? माझ्या प्रत्येक श्वासात त्याचं अस्तित्व आहे, माझ्या शरीरावर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा अजूनही ताज्या आहेत...तिला आठवलं त्या दिवशी मध्यरात्री अचानक तिला जाग आली शेजारी पाहिलं तर तो नव्हता..तिने शोधलं त्याला..तर तो कॉटखाली जाऊन बसला होता..थंडीत कुडकुडत, पाय पोटाशी घेऊन..तिला एकदम कळवळल्यासारखं झालं.
ती त्याच्या शेजारी कॉट खाली जाऊन बसली.. तो तिच्याकडे पाहून म्हंटला’
"तुला माझी आठवण येते का गं?"
तिच्या पोटात खड्डा पडला, काय उत्तर द्याव तिला समजेना \
"मला येते माझी आठवण...खूप येते...आपली आठवण छळते मला"
तिने त्याला जवळ घेतलं फक्त....
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी दाखल व्हायचं होतं.. आता तर तिला फॉर्म वरचे सगळे रकाने खडानखडा पाठ झाले होते.
त्याची नेहमीची खोली..बाजूचा नेहमीचा पेशन्ट..त्या पेशन्टच्या घरच्यांचे चिंताग्रस्त चेहरे..सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा आशा, निराशेचा खेळ...नेहमीप्रमाणे यंत्रवत ट्रीटमेंट सगळं पार पडली.तोवर समजलं की शेजारचा पेशन्ट गेला..हे जग सोडून कायमचा गेला..त्याच्या घरच्यांनी यांत्रिकपणे त्याची बॉडी उचलली..घेऊन गेले त्याला...सगळं ठरलेलं असतं नाही? शेवटचा श्वास सुद्धा मग उगाच का आटापिटा करून घ्यायचा?
तो खिन्न नजरेने पहात बसला होता..शेजारच्या पेशन्टच्या कॉटकडे..तिचा हात त्याने हातात घेतला..थोपटत म्हंटला
"मरण हेच अंतिम सत्य....घर तुझ्या नावावर करतोय..पुढचीही बरीच सोय लावलीय..फक्त तू तुझ्या मनाची तयारी ठेव"
ती अवाक झाली...काल कॉटखाली बसून लहान मुलासारखे प्रश्न विचारणारा तो खरा की आज हे अस बोलणारा खरा?
आणि मग काहीच दिवसांत तोही निघून गेला...कायमचा...आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेऊन.. हल्ली ती कॉटखाली झोपते.