Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

माहेर-Jainab Desale

$
0
0

फार संवेदनशील कथा आहे ही..डोंगर खूप भावला आहे.

माहेर - जैनाब इनामदार-देसले

हातभर हिरवी काकणं, रूपेरी पैंजण, रूपेरी जोडवी, नव्यानेच बांधलेले काळे मणी, लाल साडी, लाल हात, अंगभर मेहंदी चा ओला वास. असा नवा वेष, अन ती ओलांडते तिच्या गावची वेस. आता नाती नवी असतात, त्यांना नावं ही नवी असतात. तिचं गाव कात टाकतं. ती ही बदलते, गाव ही बदलतं. गावाकडे बघायची तिची नजर ही बदलते.

ती पुन्हा फिरून येते. वळण संपल्यावर जे अचानक सामोरं येतं, हृदयात सोबत ती घेऊन गेलेली ते तिचं 'माहेर' असतं. आता फक्त उरत नाही ते लांब च लांब रस्ते असणारं आखीव रेखीव गाव, प्रत्येक चौकाचौकात पहुडलेल्या आठवणींचा ती घेत असते ठाव. हर एक ठिकाणी ती नजरेनं शोधते दिसतात का कुठे तिचे खेळगडी, थांबून थांबून आठवत राहते सगळ्या सख्या सगळे सवंगडी. आठवतं तिला याच रस्त्यावरून ती धावली होती अनवाणी, इथेच लागली होती तिला ठेच भयंकर देखणी. भळाभळा रक्त पुन्हा वाहतं चोहीकडे, ती आवरते, सावरते स्वतःला चालू लागते पुढे.

अजब वाटतं तिला आता नुसती माणसंच राहात नसतात या शहरात, झाडं सुध्दा ओळखतात तिला नावानिशी. चालताना एक फूल हळूच तिच्या पायाशी वाहतात, लेकी ला जन्माची भेट न मागताचं देऊन जातात. ती थक्क होऊन बघत राहते, उंच उंच सजीव इमारती, त्यांच्या नक्षीदार कमानी. ती पुन्हा पुन्हा मनात साठवते त्यांना नव्या अलवार डोळ्यांनी. ते ही हळूच मिचकावतात डोळे हर्षाच्या गहिऱ्या अर्थांनी.

इतका मोठा अजिंक्य डोंगर आता बाप बनतो. त्याला ठाऊक असते जगरीत. तो म्हणतो

'राणी, बाई असणं कठीण असतं पण बाप असायला काळिज लागतं.’

तो परत हताश होतो, स्थितप्रज्ञ दगड बनून जातो.

ती निघते जड मनाने चालायला लागते सासरची वाट. उधळणारी, बंडखोर नदी हरवून बसते तिचा वार्याचा थाट. ती जाताना नदी रडते सहस्र डोळ्यांनी होऊन दुःखाने चूर, उगाचच का येतो तिला इतका मोठा पूर.

ही झाडं रस्ते माती, नद्या डोंगर इमारती सगळे असतात तिच्या अस्तित्वाचा भाग. प्रत्येक वेळी जाताना आठवणींची सय दाटून येते. डोळे आनंदाने, होय आनंदानेच पाझरतात, कारण तिचं माहेर बनतं तिचं आभाळ, मायेचं अखंड छत्र लेवून मरेपर्यंत सोबत करणारं, अन वात्सल्याच्या पायघड्या घालून तिला पुन्हा पुन्हा मातृत्वाशी जोडणारं.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>