लहानसा जीव....आपले हरवलेले नाते कुठे आणि कशात शोधेल सांगता येत नाही न?
सरप्राईझ – स्नेहल क्षत्रिय
"अगं आर्या! आज शाळेतून थेट इकडेच?" मी हसत हसत आर्याला विचारले. ती लाल रंगाची साडी नेसवलेल्या मॅनिक्वीनला न्याहाळण्यात व्यस्त होती. तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.
ती इथे तिच्या आईसोबत नेहमी साड्यांच्या शॉपिंगला येते. सातवीत शिकणाऱ्या आर्याचा फॅशन सेन्स मला कमालीचा आवडतो. मी गेली ६ वर्षे या दुकानात काम करते आहे पण आर्या इतकी गोड मुलगी मी याआधी पाहिली नव्हती. तिची आई पण खूप छान आहे. एकदम हटके पर्सनॅलिटी आणि स्वभाव तर अगदी मनमिळाऊ, बोलका.
आर्या गेल्या चार पाच दिवसांपासून शाळा सुटली की थेट लाजरी सारीजच्या दिशेने येताना दिसते. ती आली की मी आवर्जून तिच्याशी गप्पा मारायला जातेय पण ह्या चार ते पाच दिवसात ती फक्त मॅनिक्वीनला न्याहाळत असते. ती त्यांच्या साड्यांचे रंग बघत असते आणि मध्येच खुद्कन गालात हसते. अगदी तिच्याच तंद्रीत. मला तिचा लळा लागला आहे. का कोणास ठाऊक पण आर्या आली की मला खूप छान वाटतं.
आज दुपारी एक वाजता आर्या शाळेतून थेट दुकानात आली. सोबत तिची आई नव्हती आजी होती. मी आर्याच्या गोड करामती पाहत होते पण नवरात्रीच्या खरेदीसाठी येणाऱ्या गर्दीमुळे, मला तिच्यासोबत गप्पा मारता आल्या नाही. काही वेळाने आजी आर्यासोबत काउंटरवर आली.
"लाल रंगाची साडी हवी आहे. बांधणीची असली तर उत्तम. काय आहे ना माझ्या नातीला खूप आवडते अशी बांधणीची साडी. तिच्या आईचा फेव्हरेट कलर आहे रेड" तिची आजी एका दमात वाक्य बोलून गेली.
“हो दाखवते हं !” असे म्हणून मी त्यांना काही साड्या दाखवल्या.
"आजी ही बघ, आईला ही खूप आवडेल. आपण तिला सरप्राईज देऊ. तू तिला सांगू नको आपण तिला न सांगता साडी घेतली ते आणि आपण रेड कानातले पण घेऊन जाऊ. उद्या मम्माचा बड्डे आहे. तुला लक्षात आहे ना ?" आर्या एकामागून एक प्रश्न करत होती.
“हो गं. तुला हवी ती घे. तुझा आणि मम्माचा चॉईस सारखाच आहे ना ? तुला आवडेल ती साडी घेऊ आपण आणि उद्या मम्माला मोठ्ठ सरप्राईझ देऊ" असे म्हणून आजीने तिचा एक गालगुच्चा घेतला. आर्याने शेवटी एक साडी सिलेक्ट केली.
"माझ्याकडून आर्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या हं! आज त्या सोबत आल्या असत्या तर मला त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देता आल्या असत्या" मी बिल देताना त्यांना मनातलं बोलून दाखवलं.
"काही दिवसांपूर्वीच ती हे जग सोडून गेली आहे. ती साड्या घ्यायला आता नाही येऊ शकणार कधीच" आजीच्या चेहऱ्यावर खिन्न भाव पसरले.
हे वाक्य कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काही क्षण सुन्न झाले. मी भानावर आले तेव्हा माझं समोर लक्ष गेलं. आर्या अजूनही रेड कलरची साडी नेसवलेल्या मॅनिक्वीन सोबत बोलत उभी होती. त्याक्षणी तिचे ते निरागस भाव माझ्या काळजाला चिरा पाडत होते. तिची आजी तिला एकटक पाहत होती आणि मी त्या दोघींकडे. नंतर आजीने तिचा हात अलगद पकडला आणि दोघी घराच्या दिशेने निघाल्या. माझी नजर दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली होती.