Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Dafad-Kasara-Jaideep Vighne

$
0
0

बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – १०

डफडं-कासरा - जयदिप विघ्ने

तीन दिवसापासून म्हातारी तापानं फणफणत होती, झोपडीचे कान कण्हन्याचा आवाज ऐकून सुन्न झालेले, दगडू मांगान किराणा दुकानातून आणलेल्या पिवळ्या गोळ्यांनी काही फरक पडला नव्हता, शेळीचा पाय गुडघ्यात गुंतवून उलट्या तळहाताच्या चारपाच चापटा दोन्ही टांगांमधून दगडून थानावर हाणल्या, लुळ्याच्या पायांसारखे थानं हेलकावे खात होते,चारपाच चिळकांड्या कशातरी निघाल्या, शेळीची थानं पार पाचटासारखी झाली, म्हातारी बिमार असल्यान तिलाही चरायला कोणी घेऊन गेलं नव्हतं, तिही खपाटीला गेली होती, लोटी घेऊन तो आत आला म्हतारीच्या कानाला, कपाळाला थोडं दुधं लावलं..तेवढ्यान म्हतारी थोडी भानावर आली

"महं आयकता का..सुरेसलं घ्यान बलवून महा कही भरूसा नही आता..."

"मुकी बहीस..मी मेलो नही आजून तुल कुठूनबी नीट करून आणीन"

सुरेश त्यांचा मुलगा मुंबईला रहात होता, मागे केंव्हातरी गावाकडे आलेला, तेंव्हा दगडून मित्रांशी बोलतांना ऐकलं होतं, "आरे म्हतारं मेलं तरी यायल नही पुरत एवढी लांब हे मुंबई" तेव्हापासुन त्याचं मुलावरून मन उठलं होतं पन तो म्हतारीला तसं बेलला नाही.

खरंतर तो हवालदिल झाला होता, म्हातारीची अशी अवस्था त्याला देखवत नव्हती, उभ्या जन्माचा संग असा निपचित पडलेला पाहणं सोप नसतं, पण पर्याय नव्हता, खिशात दमडी नव्हती अन तीन दिवसापासुन गावात नर्स आली नव्हती, म्हातारीला तालुक्याच्या गावी दवाखान्यात न्यायला शंभरभर रूपये तर लागलेच असते.

"मल यकदा शेवटचं पाव्हद्या तरी त्यालं"

म्हातारी कण्हत बोलली तसं दगडूचं काळीज चर्रर्र झालं, म्हातारीच असं निर्वाणीचं बोलण त्याला आवडलं नाही, खरतर म्हातारीच त्याचा जगण्याचा आधार होती, पाय गेला तर चालेल पण काठी जावू नये,

"मी गावातून पैसे आणतो तू मुकाट्यानं पडून रहाय"

म्हणून त्यानं डफड्याकड बघितलं, कित्येक दिवसांपासून धूळ खात आड्याला लटकवलेलं, डफड्याच काम आता हद्दपार होत आलेलं म्हणून हाताला काम नव्हत अन दुसरं काम करण्याची अंगात ताकद नव्हती, त्यानं डफडं खाली घेतं,धोतराच्या सोग्यान पुसलं, बाहेर आला अन सुर्याकड कातड्याचा भाग थोडा वेळ धरला, एक काडी आपटली 'डंग' असा आवाज झाला, त्यानच हा आवाज कितीतरी दिवसानं ऐकला होता, त्याला भरून आलं, अंग शहारलं, म्हातारीच निपचित पडणं अन डफड्याच कित्येक दिवसापासून बंद पडलेलं तोंड याचा कुठतरी त्या सहसंबंध वाटला, काळ आपल्या प्रिय वस्तूना असा आपल्यापासून का बरे दुर करत असेल...? तो जुने दिवस आठवू लागला.

"दगड्याच्या डफड्याशिवाय काय मजा हे कुस्त्यात..बलवा लवकर त्यालं"

"अय दगडूबा चालनबापा हळद लागायचा टाईम झाला नं"

" कही म्हण पण दगड्याचं डफडं नसतं तं आईच सोंग पाहायलं मजा नसती आली"

अन पाटलाचे अन सरपंचाचे भांडणं

"सरपंच मागच्या वर्षी तुमचे बैलं मिरवले होते दगड्यानं यावर्षी आमचा मान हे"

सगळं आठवलं अन टचकन डोळ्यात पाणी आलं त्याच्या, आता डफड्यावाल्याल कोणी बोलवत नव्हतं, मग बलुतंही भेटत नव्हतं, ओवाळणीचा विषयच नव्हता, त्यानं दंडानं डोळे पुसले, डफडं डाव्या बगलात अडकवलं उजव्या हातात काड्या घेतल्या अन गावाच्या दिशेने निघाला, गावात डफडं वाजवून पैसे मागावे असं त्यानं ठरवलं होतं. त्याला आशा होती की पैसे मिळतील.

किसन भिंतीला पाठ टेकून बसलेला, सुमन किसनची बायको त्याच्या पुढं काडीन सारवण उकरत बसलेली बाजुलाच त्याची लेकुरवाळी लेक गिता लेकराला जोजवतेय...

"कहीतरी पहा तुम्ही आता, शेजारच्या बया ईचारायलं लागल्या" –सुमन

छताकड बघत किसन नुसता "हुं' म्हटला

''हुं नही आता ती कही वल्ली बाळातीन नही राहिली..सव्वा महीन्यात पोऱ्ही सासरवाडीत जात्या, ईल तीन मैने झाले"

"तुही कटकट बंद करती का, पहलेच पैसे बाकी हे साशावकाराचे आजून दिड लाख कुठून आणू वं..? " तो वैतागुन तिच्यावर खेकसला, पोरीनं पोरगं उचलल अन ती पडवीत आली, लेक लग्नानंतर परकी होत जाते.

"खरंय बाई तुमचं..तव्हा एवढ्या हुंड्याचा नवरदेव पाह्यलच नव्हता पाह्यजे, पण एकुलती एक लेक हे ..सुखात राहीन पण कह्याच काय..आगीतुन निघलय अन फुपाट्यात पडलय"

पाच एकराचा धनी किसन दोन एक्कर पाण्याखालची तीन एक्कर कोरडवाहू, पोरीच लग्न केलं हुंडा दिला तीन लाख दिड नगद. दिड एका वर्षाच्या बोलीनं पण दोन वर्ष होत आले होते, मुलगी बाळंत पण झाली तरी पैसे देणं झाले नाही. मागचे तिनही वर्ष कोरडा दुष्काळ होता, आता मुलीचे सासुसासरे अडून बसले होते राहीलेला हुंडा अन पोरगी दोन्ही संगच आणून घाला नाहीतर पोरगी तिकडच राहुद्या, किसन वैतागला होता, साशावकाराचे पहिलेच पैसे देण बाकी असल्यावे नविन कुठल्या तोंडाने मागावे त्य़ाला कळत नव्हते.

किसन तसा होतकरू शेतकरी पण निसर्गाच्या कोपापुढं कोणाच काय चालतं तो हतबल झाला होता. 'डडंगडा डांगचिक डडंगडा डांगचिक' दगडू मांग वरच्या गल्लीत पुर्ण जोशानं डफडं वाजवत होता, पोरं अप्रूपान त्याच्या मागमाग फिरत होती, जाणती विचारत होती आज का बरं वाजवतोय, लोकं भाकर तुकडा देत होती पण पैसे मागितले की तोंड वाकडं करून खिशाला हात लावत होती..खरंतर भुक्कार झालेलं खेडं कुणाकड फारसे पैसेही नव्हते म्हणा..तो एक एक घर मागत फिरत होता..पण गरज दगडूला कुणापुढेही हात जोडायला भाग पाडत होती..गरज माणसाला लाचार बनवते..एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत,तो जात होता..ऊन तापत होतं..घामाची त्याला पर्वा नव्हती कुठेतरी शंभरीक रुपये कसे भेटतील एवढच तो बघत होता.

"सुमने...पैसे नही देले तं खरच नेणार नही का गितीलं ते...?” हतबल मुखातून त्याचा प्रश्न ऐकून सुमनचे डोळे भरून आले.

'नकान असं म्हणू. करू आपुन कहीतरी"

"काय करती आता वावरबी इक्र्या काढ्ढं तरी कोनी घेणार नही, घेतलं तं मातीमोल, काय कराव कहीच कळून नही राह्यल"

किसनला इतकं उदास पाहून सुमनला कसंतरीच झालं

"बरं जावद्या बरं लै नका लोड घेऊ..तुम्ही दोन घास खा..म्हशीची शिंग कही म्हशीलं जड व्हत नही" किसनला धीर यावा म्हणून ती बोलत होती बोलताबोलताच तिनं त्याच्यापुढं ताट वाढलं...बेसनासोबत कशीतरी आर्धी तिनकोरा भाकर त्यानं पोटात ढकलली...अन बाहेर निघला.

"मी बैलाह्यलं पाणी पाजून येतो वावरातून"

डफडं वाजवतवाजवत दगडू गावाला फेरा मारून किसनच्या दारापुढं आला

"आरे दगडूबा..कुणीकडं? घामाझुकीळ झाला तु तं?" "किसनराव..समदं गाव फिरलो वीस रूपये मिळाले..म्हतारी तापानं फणफणतीय तीन दिवसापसुन ..कही करापण शंभरीक रूपये तरी द्या"

अन त्यान किसनचे पाय धरले..एक आकांत दुसऱ्या आकांतापुढं टाहो फोडत होता.

किसन तसाच मागे सरकला, त्याला काय करावं सुचेना, दगडूबाच्या खांद्याला धरून तो दारासमोरच्या लिंबाच्या सावलीत गेला, दोघंही खाली बसले..समदुःखी भेटला की सांत्वनाची खात्री असते..गरजा लहान मोठ्या असल्यातरी दु:ख सारखीच होती..क्षणभर शांतता...किसन एवढच बोलला

"जेवून जा वाटल्यास पण पैसे नही गड्या"

अन तडक निघाला, दगडू त्याला पाठमोरा बघून अश्रू ढाळत होता, सु मनने पदराचा बोळा तोंडात कोंबला, गिता मुलाला घेऊन आत गेली.

किसन बैलांना पाणी पाजून, आंब्याखाली बांधायला घेऊन गेला, कसलातरी विचार डोक्यात आला अन दोन्ही बैल त्याने मोकळे सोडून दिले, कासरा हातात घेऊन भराभर अंब्यावर चढला, फास बनवला, एक बाजू फांदीला बांधली, फास गळ्यात अडकवला, अन तसाच शुन्य होवून फांदीवर बसला.

दगडू उठला घराकडचा रस्ता धरला, मधेच आईचं मंदीर लागलं, तसा त्याला अजून उमाळा फुटला. जमा भाकरीचं गाठोडं बाजुला ठेवलं अन भुतासारखा डफडं बडवू लागला, गावकरी जमू लागले, झपाटला , दगडू झपाटला...डफडं ताल धरू लागलं..घाम निथळत होता..जुने दिवस आठवले..दगडूच्या हातात डफडं देताना बाप बोलला होता "दगड्या हे डफडच आपलं सगळं कही है, हे तुल कधीच उपाशी मरू देणार नही" पण काळ बदलला होता. डफडं मुकं झालं होतं..

तीसेक वर्षापुर्वी बापासोबत लावलं होत आपण हे झाड, लहान होतो तेव्हा आपण,

"बाबा, ह्यो आंबा मोठा झाल्यावर मल झोका बांधून देसान्न यालं"

अन बाप हसत हो म्हनाला होता,किती निरागस होतो आपण ज्या फांदीवर झोका बांधायची स्वप्नं पाहिली त्याच फांदीवर फाशी घ्यायची...नाही..नको...भानावर येऊन दोर सोडला, खाली आला कोलाहल चालुच होतं..काय ..? काय करावं? उन तापत होतं...

कासरा दुहेरी केला उजव्या हातात गरगर फिरवला...स्वतःच्या अंगावर कोरडे मारून घ्यावे तसा मारून घेऊ लागला....बैलं बुजाडली. ऊन रणरणत होतं, डफडं शिगेवर पोचलं, गाव गोळा झालेलं दगडू बेभान होता..डांगचिक, डांगचिक, डांगचिक डडंगडा, डडंगडा डांगचिक..कासऱ्याचे फटके पाठीवर, पोटावर, पोटरीवर, तोंडावर बसत होते किसन बेभान झाला होता, गावात माणसं हसत होती शेतात बैल बिथरले होते....किमान जनावरांना किसनची दया तरी येत होती...

गावात अन रानात दोन अवस्था दिवसाढवळ्या ढणाढणा जळत होत्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>