बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – १२
अंतरीच्या गूढ गर्भी! – रश्मी पदवाड मदनकर
पोलिसांचा ताफा घरापुढे येउन उभा होता....बंद दाराबाहेर घरकाम करणारी आशा डोळ्याला पदर लावून बावरलेली. शेजारच्या दोन-चार बायका देखील जरा दूरच उभ्या राहून डोकावून बघण्याच्या प्रयत्नात. गेटबाहेर रस्त्यावर गर्दी वाढत चाललेली. गाडीतून उतरलेले पोलिस शिपाही आणि इन्स्पेक्टर चव्हाण दाराच्या पुढे येउन उभे राहिले. जरा वेळ नजरेनेच शहानिशा करून इन्स्पेक्टर चव्हाणांनी हेड कॉन्स्टेबल शिंदेला इशारा केला आणि शिंदेंनी दारावरच्या बेलचे स्विच दाबले...बेलने कानठळ्या बसवणाऱ्या कर्कश्श आवाजात साद घातली... काही सेकंद सगळी शांतता, सगळ्यांचे लक्ष दाराकडे. आतून कसलीही हालचाल नाही म्हंटल्यावर शिपायाने परत बटन सलग चार-पाच वेळा दाबले..दरवाजा हाताने धाडधाड ठोकूनही पाहिला आणि मागे वळून इन्स्पेक्टरला खुनेनेच नाही असे सांगितले..इन्स्पेक्टर आशाला घेऊन फिरून मागल्या दाराशी आले..इतर शिपायांनी इमारतीची सगळी दारं-खिडक्या चाचपडून पाहिलीत ..कुठेही आत शिरायला काहीही मार्ग नव्हता..
'पुढल्या दारापेक्षा मागचं दार तोडायला सोप्प जाईल सर' शिपायाने इन्स्पेक्टरला सुचवले, आशाने साशंकित नजरेने इन्स्पेक्टरकडे पाहिले..पुन्हा पदर डोळ्याला लावला.
इन्स्पेक्टर चव्हाणने मानेनेच 'व्हा पुढे' चा इशारा दिला आणि दोन्ही शिपायांनी दुरून धावत येउन दाराला जोरात धडक दिली. पहिली… दुसरी ---पाचव्या धडकेत दरवाजा पडला तो ओढून बाहेर काढला आणि तशाच महिला शिपाही लगबगीनं आत शिरल्या, आतल्या खोलीत बघतात तर काय शांताक्का बेशुद्ध पडलेल्या....त्यातील एकीने कपाळाला हात लावला..अंग थंड पडलं होतं.
'सर या गेल्यात' सुस्कारा सोडत ती म्हणाली ...आणि आशाने आरोळी ठोकली…
आणि..आणि स्वप्न भंगले, शांताक्का दचकून जाग्या झाल्या ...दरदरून घाम फुटला होता..श्वास वरवर चढत होता...डोळे विस्फारले होते छातीत जोरात धडधडत होते... इकडे तिकडे पाहिले.. कुणीच नाही
''अरे देवा ! स्वप्न पाहत होतो तर आपण, पुन्हा तसंच, तेच… कसलं जळलं मेलं अभद्र स्वप्न हे''
पायावरचे पांघरून दूर सारून, अंगावरचा गाऊन निट करत त्या उठल्या. लाइटचे बटन चालू केले आणि आळसावतच भिंतीवरच्या घड्याळीकडे पाहिले आताशा फक्त पावणे तीन वाजले होते. एक जांभई घेत शांताक्का किचन कडे चालू लागल्या...दारामागे असलेलं लाईटाचं बटन ऑन केलं आणि अंधारलेलं स्वयंपाक घर उजेडानं भरून गेलं. प्रकाशानं किलकिलणाऱ्या डोळ्यांवरून शांताक्कानं हाथ फिरवला आणि पुढे येत ओटयावरचा पेला उचलून सुरईमधून पाणी ओतून घेतलं..प्यायल्या....पाणी पिऊन प्याला तिथेच उपडा ठेऊन दिला उश्वास सोडला आणि तिथेच ओट्याला टेकल्या. उभ्या उभ्या नजर शून्यात लागली. स्वप्नाच्या आठवणीनं मनात एक उदास कळा पसरली होती.
''काय रे देवा हे अवलक्षण..का अशी स्वप्न पडतात? काय झालंय आपल्याला...हल्ली तर हे रोजच घडू लागलंय...का पण? सारखी सारखी अशीच स्वप्न...काय संकेत असावीत?? आपण हल्ली घाबरायला लागलो आहोत की काय? पण कशाची भीती...उभं आयुष्य मोठ्या धिटाइनं काढलंय आपण. भर तारुण्य असं आयुष्याशी दोन हाथ करण्यात निघून गेलं. तेव्हा देखील नाही कधी कशाची भीती वाटली..मग आता या वयात काय घाबरणार आणि कशासाठी? आहे काय आपल्याकडे जे हरवेल किंवा हीरावलं जाईल ...एक जीव तर तेवढा उरलाय. सगळं असूनही एकटा...एकटा जीव'
ओठाची रेषा जरा तिरकस झाली आक्काची...स्मित.. हताशा...परत मनात संवाद, स्वतःलाच प्रश्न 'हा जीव जाण्याची भीती वाटतेय कि काय आपल्याला? पण का? जीवच आहे तो; हवं तेवढं जगून घेतलंय आपण…कधीतरी जायचंच आहे, आजही गेलो तर काय फरक पडणार आहे...आपलं तरी काय असं अतृप्त शिल्लक राहणारेय. उलट झालंच असं तर सुटलोच आपण समजा...पंचावन्न वर्षाचं आयुष्य निघालच ना...पूर्वी जगण्याला कारणं होती, ठरवलेले उद्देश होते ...उद्देश झालेत पूर्ण, केले आपण...कष्ट घेतलेत त्यासाठी. पण हार मानली नाही कधी...हात टेकले नाहीत, अभिमानाने जगलो ....मग आता जगलो काय कि मेलो काय, काय फरक पडतोय'
हुह्ह्ह !! एक उसासा आणि पुन्हा प्रश्नांची सरबत्ती सुरु
"खरच फरक पडत नाही? आपल्याला नाहीच पडणार पण...पण.. इतर कोणालाच फरक पडणार नाही, आपल्या असण्याने-नसण्याने? याच प्रश्नाला तर आपण घाबरत नाहीयोत? कदाचित, याच प्रश्नाला घाबरतोय...आपण मरणाला घाबरत नाही....एकटेपणाचा कंटाळा आलाय. एकटेपणाचीच भीती वाटू लागली आहे आताशा... एकटेपणाची की मग एकट्यात मरणाची?.....मरण ….मृत्यू ..
आणि शांताक्का भानावर आल्या मानेला एक हलकासा झटका देत विचारांचे आलेले जडत्व झटकून टाकण्याचा प्रयत्न केला...नजर खाली उपड्या ठेवलेल्या प्याल्यावर गेली आणि आपण मागल्या पंधरा मिनिटांपासून असे एकाच जागी ओट्याशी भान हरपून उभे आहोत त्यांच्या लक्षात आले....काय हा वेडेपणा या अविर्भावात ओठांची हललेली पुसटशी स्मितरेषा..सुरइतले पाणी प्याल्यात ओतून परत त्यांनी प्याला तोंडाला लावला...रिकामा झालेला प्याला नळाखाली विसळून उपडा ठेवला आणि वळून दिवाणखान्यात आल्या...सोफ्यावर पडलेली काळी बुट्ट्यांची शाल उचलून अंगावर ओढून घेतली..परत झोपण्याचा प्रयत्न निष्फळ ठरणार हे आता अनुभवाने समजून आले होते....एकदा झोपमोड झाली कि परत झोप येणे नाही..मग असेच वेड्यासारखे विचारचक्र फिरत राहणार...आक्काने मान वर करून घड्याळात पाहिले पहाटेचे पावणे चार वाजायला आले होते...मंद पायांनी त्या बाल्कनीकडे चालत्या झाल्या.
दिवाण खाण्यातल्या ओसरीचे दार उघडले तशीच गार वाऱ्याची झुळूक अंगावर धावून आली..अंग शहारलं..पहाटेचा धुंद कुंद असा गार मोहक सुगंध मनाला मोहवून गेला....क्षणभर डोळे मिटून त्यांनी लांब श्वास घेऊन सगळं मनात भरून घेतलं..प्रसन्न पहाट समोर होती...अजून उजाडायचे लक्षण दूर होते....थोडा दूर रस्त्याच्या कडेने असलेला स्ट्रीटलाईट पिवळ्या रंगात तेवत होता...त्याचा मंद प्रकाश नजरेच्या टप्प्या पर्यंत पसरलेला....इमारतीच्या आतल्या बाजूने मेनगेट बाजूला काहीश्या अंतरावर कधीकाळी कुणालच्या आज्जीने मोठ्या हौसेने लावलेलं पिवळ्या-पांढऱ्या छटा असलेलं चाफ्याचं झाड....आक्काने जीव लावून जपलं होतं. अतिशय आवडतं, कुणालच्या आज्जींचा आणि अन्नांचा आधार हरवल्यावर हे झाडंच मग घरातला थोर सदस्य वाटत राहिला ..आधारवडच ...त्या झाडानेही आक्काला तशीच साथ दिली....निदान एकटं सोडून कुठे दूर निघून गेलं नाही इतरांसारखा ....चाफा आक्काचा सखाही होता आणि नातलगही.
त्या चाफ्याचेही आपल्या माणसा सारखेच तर असायचे चांगले दिवस आलेत कि बहरून यायचे, फुलून जायचे ...सुख सुख होऊन आनंदाचे गंध पसरायचे...आणि दिवस फिरलेत कि, एक एक पर्णरुपी अवसान गाळून रिक्त रिक्त होऊन नव्या दिवसांची नव्या बहराची वाट पहायची.... आक्का विचारात गढून त्या चाफ्या कडेच बघत राहिल्या ...तोही जणू त्यांच्या नजरेला प्रतिसाद देत दिमाखात उभा डोलत राहिला..
बघता बघता आठवडा उलटला होता खरा पण आठवड्याचे सात दिवसही महिना झाल्यासारखे भासायचे हल्ली. दर गुरुवारी कुणालचा फोन यायचा. तसा शिरस्ता रचला होता त्यांनी. नौकरीची धावपळ आणि विदेशात बस्तान मांडण्याची, स्थिरस्थावर होण्याची धडपड त्यात वर्षच झालंय संसारात पडलाय. पूर्वी बाजारभाव कश्याशी लावून खातात हे माहितीही नसलेला कुणाल, आईच्या उबदार पंखांखाली वाढलेला. जबाबदारी म्हणजे आईसाठी फार सुख मिळवण्याची ती ओढून आणण्याची गरज किंवा जाणीव न जोपासणारा पण तिला निदान दुखावू नये एवढीच जबाबदारी इमाने एतबारे निभावणारा. सालस, निरागस पण हुशार कुणाल. आता हे सगळे व्याप शिंगांवर घेऊन फिरतोय म्हणल्यावर त्याने रोजच फोन करावा, आपल्याला वेळ द्यावा हा आग्रह आक्कानेही धरणे योग्य नव्हतेच. आणि त्या तसं करणारही नाहीतच. कुणालच्या आयुष्याची गाडी योग्य मार्गक्रमण करते आहे आणि तो त्याच्या आयुष्यात खुश आहे एवढेही पुरे होते आक्कांना.
रूपल कुणालच्याच पसंतीची… चंदीगढ तिचं माहेर. शुद्ध ब्राम्हण घरात कट्टर पंजाबी सून येणार हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा धस्सकन झाले होते आक्कांना…कुणाल नौकरीसाठी बाहेर राहणार हे ठावूक असूनही निदान आपले मराठमोळे सणवार, रिती-परंपरा माहित असलेली सून असती तर त्यानिमित्त्याने सण-उत्सवाला भेटीगाठी होण्याच्या संधी येत राहिल्या असत्या. पण कुठेतरी या अपेक्षाही आता कमी झाल्या होत्या. एकतर परजातीय परप्रांतीय आणि त्यात परदेशात स्थावर… कुठले सणवार आणि कसल्या परंपरा जपणार, त्यांनी त्यांच्यापुरता त्यांचा संसार त्यांच्या पद्धतीनेच सुखाचा करावा…एवढे मिळवले तरी पुरे. आक्का स्वतःला समजावत राहायच्या.
कुणालचे बाबा कुणाल अडीच वर्षांचा असतांना घरदार, संसार त्यागून निघून गेले. … त्या वर्षी प्रचंड नुकसान झाले होते व्यापारात. लोकांचा पैसा व्यापाराला लागला होता. लाभ झाला तर सर्वांचा पैसा व्याजासकट परत करूनही बक्कळ पैसा उरणार होता. नुकसान होऊ शकतं अशी कल्पनाच केली नव्हती त्यांनी. मुळात मराठी माणूस आणि त्यातही देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण व्यापारातील राजकार्णांना बळी पडणं साहजिक ठरलं. ज्यांचा पैसा या व्यापारात अडकला होता त्यांचे शिव्याशाप जिव्हारी लागत होते त्यात कुणालच्या आधीचा मोठा मुलगा ५ वर्षांचा निहाल आजाराने दगावला. हे जे घडतंय ते आपल्या पापाचं फळ आहे हि दुखरी जखम त्यांनी एवढी मनाला लावून घेतली कि मुलगा गमावलेल्या शांताक्कांना आताच त्यांची खरी गरज होती, कुणालचे संगोपन वडिलांशिवाय होणे शक्य नाही आणि स्वतःच्याच आई-बाबांना म्हतारवयात लागणारा आधार आपण आधीच हिरावून घेतोय .. हे कुठले कुठले भान त्यांना उरले नाही. ते भयाने, पाप पुण्याच्या अध्यात्मिक बिनबुडाच्या तत्वांनी आणि मानसिक खचलेपणाने एवढे ग्रासले कि सर्वांना आयुष्याच्या कठीण वळणावर टाकून देऊन मनःशांती शोधायला घराबाहेर पडले… त्यानंतर १६ वर्ष त्यांचा काहीच थांगपता लागला नाही.… अनेक वर्ष विविध माध्यमांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला शांताक्कानी, अन शेवटी हात टेकले...एकटीनंच हा संसाराचा जगन्नाथाचा रथ त्या ओढत राहिल्या. अन्ना गेलेत त्यानंतर वर्षभराने कुणालच्या दूरच्या काकांना ते दक्षिणेच्या कुठल्याश्या देवीच्या देवळात आकस्मिक भेटले. मोह-माया त्यागून अध्यात्माच्या शोधात देश भ्रमंतीवर आहे असं सांगून. चार ओळींचं पत्र घरच्यांसाठी पाठवलं होतं …पत्र...पत्र म्हणण्यासारख फार काही नव्हतंच त्यात. घरादाराची, संसाराची आसच उरली नाहीये त्यांच्या मनी हे ध्यानात आणून देणारं मिळमिळीत, अतिशय शुष्क असं शब्दांचं बोचकं होतं .… कुणालच्या आजीनं ते वाचायला हातातही घेतलं नाही. कुणाल हे सगळं समजून घ्यायला लहानच होता अजून…पण शांताक्का …
पुन्हा सर्व जखमा भळभळून वाहायला लागल्या त्या रात्री…. एवढ्या वर्षात गाडून टाकलेलं रुदन, दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला होता.… ओसरीत जाऊन चाफ्याखाली हृदयातून फुटू पाहणाऱ्या पण कोंडल्या गेलेल्या किंकाळीला आक्काने पुरता मार्ग मोकळा करून दिला. हमसून हमसून रडून घेतलं. आवेग उतरल्यावर मात्र त्याच पत्रावरून त्यांच्या अक्षरावरून हात फिरवत त्यांच रूप आठवून हुंदके देत राहिल्या. चाफा हे बघत राहिला , नंतर कित्तेक रात्र....
अण्णा गेल्यानंतर दोनेक वर्षांनी कुणालची आज्जी देखील खंगली, आजारी पडली आणि दोन महिन्यात ती देखील सोडून निघून गेली. आक्का निराधार झाल्या …वर्षभर आक्काच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही...कित्तेक महिने तिने उंबरठा ओलांडला नाही.. त्या वर्षी चाफा फुललाच नाही. पिवळ्या फुलांची पखरण अंगणी झालीच नाही. चाफ्याला आपल्या दुःखाशी असणारी सलगी त्या वर्षी प्रथमच शांताक्काना कळाली … आणि चाफा हा मन समजून घेणारा 'सखा' तिला वाटू लागला. आता सुखही त्याला सांगायचं आणि दुःखही वाटून घ्यायचं. सततचा सोबती, खंबीर पणे तिच्या रक्षणार्थ दारात उभा असलेला एकमेव आधार झाला, अश्या चाफ्याला आक्का मग जिवलावून जपू लागल्या.
कुणाल एव्हाना ‘ऑटोमोबाइल इंजिनिअर' होण्यासाठी प्रयत्नरत होता. त्याचा बेंगलोरच्या 'द ऑक्सफोर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअर' ला नंबर लागला. शिक्षण होईस्तोवर कधी आईचे त्याच्याकडे येऊन राहणे, कधी सुट्ट्यांमध्ये त्याने घरी येणे नित्याचे ठरले. पण शांताक्का घरून बाहेर गेल्यात कि चाफा चुरगाळायचा, त्याचा बहर ओसरायचा … आठाचे पंधरा दिवस झालेत कि पानं पिवळी होऊन गळायला लागायची. शांताक्कांना या नात्याचं खूप अप्रूप वाटायचं त्यातलं गूढ उकलून दाखवणं त्यांना शक्यच नव्हतं आणि उकलून सांगितलं असतं तरी ऐकणाऱ्यांचा त्यावर विश्वास बसायला हवा होता: असे होणे नव्हते, मग त्या गप्पच राहायच्या. चाफ्याचे अन त्यांचे नाते मुक्याने निभवायच्या.
आज गुरुवार होता ठरल्याप्रमाणे कुणालचा फोन आला. खूप गप्पा आणि कुशलमंगल विचारून झाल्यावर रूपलनं गोड बातमी दिली. तीन महिने झालेत म्हणाली. आक्काचा आनंद गगनाला भिडला. फोन ठेवला आणि डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. कुणालला बाळ होणार हि कल्पनासुद्धा किती सुखद होती, आणि आता तर हे प्रत्यक्ष घडणार होतं. आक्कानं उठून देवासमोर तुपाचा दिवा लावला. तूप-साखरेचा नैवेद्य ठेवला. सगळ्यांना सुख दे आनंद दे प्रार्थना म्हणून पुन्हा त्या बाल्कनीत येऊन उभ्या झाल्या. विचारांची तंद्री लागली आणि 'तीन महिने होऊन गेले' हे रुपलचे शब्द आक्कांच्या कानात रुंजी घालू लागले. दर आठवड्यात बोलत असूनही इतकी मोठी आनंदाची बातमी आपल्याला का कळवली नाही ह्यांनी?? विदेशात गेलेली आपलीच मुलं इतकी का रुक्ष होतात, कि मग व्यावहारिक विश्वात वावरतांना आपल्या लोकांशीही व्यावहारिक वागायला शिकतात, कि मग असेच अलिप्त राहणे-वागणे हा रोजच्या जगण्याचा भाग होऊन बसतो आणि त्याचं त्यांना काहीच अप्रूप वाटत नाही ? कि मग ती दोघे खुश नाहीयेत या घटनेने ??… अगं बाई ! नाही नको, हा काय विचार करतेय मी. आक्कांनी कानाला हात लावला..डोळे मिटले ..मिनिटभर शांतता .. एक लांब श्वास घेतला आणि चाफ्याकडे पाहून त्या मंद हसल्या.…
बघता बघता दिवस महिने कसे निघून गेलेत कळले नाही. आणि कुणालचे 'आईला' बोलावणे आले. खरतर रूपलच बाळंतपण भारतात होईल तिच्या आईकडे नाहीतर इथे आपल्या घरी अशी किमान अपेक्षा होती आक्कांची. किती स्वप्न पहिली होती त्यांनी, एवढ्या दिवसात तशी तयारी देखील करून ठेवली होती. बाळाची दुपटी, स्वेटर, टोपडी, पाळणा आणि काय काय एक एक वस्तू स्वतःच्या हाताने तयार करून साठवून ठेवल्या होत्या. बाळ महिने सहा महिने इथे राहणार तर बाळ बाळंतीण दोघांचेही दवाखाने, राहण्या-झोपण्याची सोय, स्वच्छता सारं सारं हौशेने आखून ठेवलेलं. पण कुणालचा निरोप आला बाळंतपण तिथे अमेरिकेतच करायचे असा निर्णय त्यांनी घेतला होता, त्यासाठी पुढल्या पंधरा दिवसात कुणाल आईला घ्यायला येणार होता. त्याआधी विदेशात जावयाची करावी लागणारी सगळी तयारी, विसा, पासपोर्ट रिन्युवल आणि इतर सोपस्कार यासाठी कुणालचा मित्र मदतीला होताच.
शांताक्काना काळजी होती ती फक्त चाफ्याची, त्याच्या संगोपनाची… त्या नसतांना त्याची काळजी कोण घेणार? आशाला कितीही सांगितले तरी ती आपल्यासारख्या जिव्हाळ्याने नाही निभावू शकणार. आणि पुन्हा आपला विरह सोसेल का त्याला…चाफ्याच्या चिंतेने त्यांचा जीवाची घालमेल होत राहिली, मग पुढले सगळे दिवस आक्काने चाफ्याच्या सान्निध्यात काढले. त्याच्याशी गप्पा केल्या येणाऱ्या सुखाचा उत्साह त्याच्याशी मनसोक्त वाटून घेतला. ...आणि तो दिवस उगवलाच, कुणाल आला. कामांची आवर-सावर, बाळाच्या अन बाळंतीणच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी आणि तिकडे घेऊन जाण्याच्या वस्तूंची बांध-बुंध या सगळ्यात तीन दिवस भुर्रकन उडून गेलेत आणि भरल्या डोळ्याने आक्कांनी घराचा अन प्राणप्रिय चाफ्याचा निरोप घेतला.
कधी नव्हे ते आक्कांना परिवाराचे सुख मिळत होते. रूपल सारखीच गोंडस गोरी-गोमटी नात त्यांच्या कुशीत होती. आपल्या कुणालचं अपत्य, तिच्याकडे त्या कितीतरी वेळ बघत राहायच्या. कधी कुणालच्या बाबांना तर कधी निहालला तिच्यात शोधू बघायच्या. त्या चिमुकल्या जीवाला न्हावू माखू घालण्यात, तीच सगळं सगळं करतांना आक्का आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या. तिच्या नाजूक गालात पडणाऱ्या हास्याच्या लकेरीत आयुष्याची दुःख विरळ होत जात होती. तिच्या निरागस किलबिलण्याने मनभर सुखाची कळा पसरत होती. आयुष्यभर वेचलेल्या दुखऱ्या अनुभवांची वाफ होऊन उडत होती. आयुष्यभर आवाक्याबाहेर वाटणारी सुखी कौटुंबिक आयुष्याची स्वप्न अशी डोळ्यासमोर साकार होत होती. दिवसांमागून दिवस जात राहिले. नातीनीच्या बालक्रीडा पाहण्यात त्यात रमण्यात दिवस निघून जात पण रात्री मात्र कित्तेकदा घराची आठवण उचंबळून येत असे. घर ते अंगण त्यांच्या अनेक आवडत्या वस्तू आणि जिवलग 'चाफा' …त्यांचा हक्काचा सखा. रात्रीच मग अश्रूंची टीप गळायची. उशी भिजली जायची. कधीतरी अर्ध्या रात्री झोप लागायची अन पुन्हा नवा दिवस उजाडायचा.
बघता बघता ६ महिने निघून गेलेत आणि आक्कांच मन लागेनासं झालं. घराची ओढ स्वस्थ बसू देईना. उंबरठा हाक घालू लागला आणि त्यांनी कुणालच्या मागे तसा तगादा लावला... कुणाल आईला परत सोडून देण्याच्या तयारीला लागला.
जवळ जवळ साडे सहा महिन्यांनी अक्कांनी भारतात पाय ठेवला, त्यांचा कंठ दाटून आला. कुणालच्या मित्राची गाडी घराच्या रस्त्याने वळली आणि आक्कांचे हृदय जोरजोरात धडकू लागले. आत्तापर्यंत चाफ्याची खूप आठवण यायची पण आत्ताचा हा क्षण त्याच्या भेटीच्या ओढीने, काळजीने पार भरून गेला होता. कधी एकदा गाडी घराच्या गेटला लागते आणि कधी बहरलेला, फुललेला, हसरा चाफा दृष्टीस पडतो असे त्यांना झाले होते.…गाडी वळली आणि चित्र स्पष्ट होऊ लागले, कल्पनेतले रंग फिके होऊ लागले..प्रत्यक्ष गेटजवळ पोचले आणि आक्कांचा श्वासच रोखला …. चाफा पार सुकला होता, बहर तर सोडाच पण साधी पानेही त्याच्या वाळलेल्या डहाळ्यांवर शिल्लक राहिली नव्हती. झाडाचा बुंधा आणि डहाळ्या सुद्धा काळ्या पडल्या होत्या. आक्का गाडीतून बाहेर आल्या आणि चाफ्याच्या बुंध्याला मिठी मारून खूप रडल्या. त्यांच्या रडण्याचा आवेग पाहून कुणाल फारंच अवाक होता. त्याने कसे बसे आईला समजावून घरात आणले. पण आक्काला मात्र फारच धक्का बसला होता. घरातल्या एखाद्या प्राणप्रिय व्यक्तीचे मरण व्हावे इतक्या अक्का हादरल्या होत्या. कुणालला आई अस का करतेय हेच कळेना पुढल्या दोन दिवसांनी त्याचा परतीचा प्रवास होता पण आईची स्थिती पाहून काय करावे असा प्रश्नच पडला होता. एका साध्याश्या झाडाच्या संपण्याने असा काय फरक पडणार होता… हवे तर आणखी दोन झाडे लावूया. अश्या कुणालच्या समजावण्यानेही आक्काचा आवेग थांबत नव्हता. खरतर चाफ्याची काळजी पूर्वीसारखी न घेतल्या गेल्याने आणि ग्रीष्मातील उश्मेने झाड वाळले होते पण आक्का हे कारण समजून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हत्या ….चाफा निव्वळ आपल्या विरहामुळे आणि निष्काळजीपणाने सुकलाय अशीच त्यांनी धारणा करून घेतली होती.
आता एवढ्या मोठ्या वाड्यात त्यांच्या मरेपर्यंत सोबत राहणारा हा शेवटचा सदस्यही निघून गेला होता...
दोन दिवसांनी कुणाल देखील त्याच्या घरी निघून गेला.....