बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – ९
विस्तव – विनया पिंपळे
"जाय रे बबल्या... गजाच्या दुकानातून धाची साकर अन पाचची पत्ती आन बरं"-बबल्याच्या अंगावरचं मळकट पांघरूण खसकन ओढत गंगीनं आर्डर सोडली तसं ते आणखीन अंगाभोवती गुंडाळून घेत अर्धवट झोपेत बबल्या म्हणाला- "उंहूं... मी नाई वं जात... झोपू दे मले. पाह्यटपासूनच दुकानावर धाडतं तू..."
"आजच्या दिस जाय बाबू... उद्या ऐतवार हाये. माही मजुरी भेटली की मंग मी घरात बजार भरतो हप्त्याचा. तुले सारकं सारकं दुकानावर नाई पाठोनार..."- गंगीचा सूर आर्डरीवरून मिनतवारीवर आला.
सकाळी उठल्याबरोबर चुलीवर चहाचं आधण ठेवून गरम गरम चहा पोटात ओतल्यावरच गंगीला दिवसभरातली पुढची ढीगभर कामं सोप्पी वाटत असत, पण आज मात्र घरातली साखर आणि चहापत्ती संपल्याने तिला सुचेनासे झाले. ती पुन्हा एकदा अजिजीने बबल्याला म्हणाली- "जाय रे माज्या राजा... आन मा साकर अन चापत्ती. तुह्यासाटी येक पार्लेचा पुडाबी घ्यून ये लागल तं." निदान पारलेच्या पुड्याचे आमिष तरी आपले काम चोख बजावेल असे गंगीला वाटले. पारबतीच्या वावरात आज तिला निंदायला जायचे होते. शाळेची घंटी ऐकू आली की घरातून निघावे लागणार होते. तोपर्यंत घरदारातली झाडझुड, बबल्याची शाळेची तयारी, रंजीला सोबत वावरात न्यायची तयारी, सहासात भाकऱ्या आणि कांद्याची चटणी असे सारे काही आटोपले पाहिजे ही तिची धडपड. पण इथे तर सकाळच्या चहावरच अजून काम अटकलेले होते. बबल्या काही तिच्या उठवण्याला दाद देत नव्हता. सगळे उपाय थकल्यावर शेवटी गंगीनं तुराट्याचा झाडू हातात घेत खराखरा अंगण झाडायला सुरुवात केली. चहा नं पिताच काम सुरू करावं लागल्याने तिचा पारा चढला. झाडूच्या खरखरीत आवाजाच्या पार्श्वसंगीतावर तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला..."इतल्या इनवन्या तं माह्या बापाच्या पन नाई केल्या मी कइच !!.… आता काय याचे पाय धरू उठून दुकानावर जाय मनुन?… दिसभर राबराब राबतो मी. कोनासाटी?…. समदी मजुरी काय माह्या एकटीच्याच मढयावर घालतो का मी?….गजाच्या दुकानावर का मले जाता यत नाई?… पन येचाच बाप शक घेते. त्याले बायको लोकाच्या वावरात मजुरीले गेली तं चालते, सडकेनं हागाय गेली तं चालते... पन गजाच्या दुकानात गेली तं मातर बायको बाटते तेच्यावाली!!.…"
"का हाये वं... इत्की कायले चिल्लाऊन रायली?... त्या गल्लीपस्तोर आवाज यून रायला तुहा."-गंगीची बडबड सुरू असताना काशिराम आला. अंगणामध्ये तुराट्याचा आडोसा करून, त्याच्या भोवती जुन्या साडयाचं पालव बांधून तयार केलेल्या मोरीत गेला. हातातल्या टमरेलानं रांजणातलं पाणी घेतलं. आंघोळीच्या दगडावर दाबून चिकटवलेल्या अर्धवट साबणाच्या तुकड्यावर डावा हात घासत आधी पायावर आणि मग हातावर पाणी घेत म्हणाला-"आन दे पैशे... मी आनतो काय पायजे सामान तं..."
"नोका... सामान आनाय जासान अन घुटी घ्यून येसान सकायी सकायी.." हातात पैशे मिळाल्यावर काशिरामला दारू पिण्यासाठी कोणतीच वेळ वर्ज्य नाही हे चांगलंच ठाऊक असलेल्या गंगीनं असं स्पष्ट शब्दात नाही म्हणताच काशिरामचा चेहरा रागानं लाल झाला. तिला झोंबेल अशा आवाजात तो म्हणाला- "बराबर हाये... तुले गजाची भेट घ्याची असंन नं. लै दिसाचा खाडा पल्डा नं ! जाय जाय... आन. तूच आन साकर अन पत्ती. तुले तं फुकटच दीन तो ... त्वाला दिलबरच तं हाये..."
काशिरामच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द जणू काही एखाद्या विषारी बाणासारखा आपल्या शरीराच्या आरपार टोचून निघत आहे असे गंगीला वाटले. एकदा गजाच्या दुकानातून सामान आणायला गेलेल्या गंगीनं गजाला त्याच्या हिशोबातली चूक लक्षात आणून दिली तेव्हा- "तुमी लै शाळा शिकेल हा वाट्टे वैनी." असं गजानं सहज विचारलं होतं. गंगी चौथी पास आहे हे ऐकून आणि तिची हिशोबातली समज पाहून त्याला तिचे कौतुक वाटले होतेे. तेव्हापासून गजा 'गंगावैनी'शी चांगलं बोलायचा... आणि इथेच तर काशीरामचे सारे बिनसले होते. 'अरे !!…… माल्या बायकोचं कवतिक करते त्ये सालं...' असं म्हणून अर्वाच्य शिव्या हासडत गजाला ठोकायच्या इराद्याने बाहेर पडू पाहणाऱ्या, दारूत तर्र असलेल्या काशीरामला गंगीने कित्येकदा मोठ्या कष्टाने थांबवले होते... पण गंगीने त्याला थांबवले याचा अर्थही उलटाच निघाला. मग उठता बसता आणि कधी कधी तर झोपतानाही ... "सांग त्ये गजा तुले आवडते नं?…आन त्याले तू. जवा पाहाव तवा वैनी वैनी ...लै गमत असन तुले. नाई?"...
शेवटी काशिरामच्या जाचाला कंटाळून गंगीनं गजाच्या दुकानात जाणं कायमचं बंद करून टाकलं. पण गजाचं दुकान म्हणजे गावातलं एकुलतं एक दुकान !... अडीअडचणीला 'गजाचं दुकान' हा एकच पर्याय असल्याने आज गंगी बबल्याच्या मागे लागली होती... आणि तो न उठल्याने काशिरामने त्याचा आवडता वाद उकरून काढला होता. पारबतीच्या वावरातलं निंदण डोळ्यासमोर आणून, कुठलंही भांडण वाढवायचं नाही असं ठरवून, काशिरामचे टोचणारे शब्द झेलत त्याच्यासमोर हात जोडत गंगी म्हणाली- "हेप्पा बबल्याचे बापू, या तुमच्या शक घेन्यापाई किती दीस झाले म्या दुकानावर जानं सोल्डं. किरपा करा पन मले डाग लावत जाऊ नोका बापा. मले सईन व्हत नाई."
"होव वं...होव"…… गंगीच्या डोळ्यासमोर आपल्या उजव्या हाताचे बोटं 'सुंदर' या अर्थाने उपरोधिकपणे नाचवत काशीराम तितक्याच उपरोधिक आवाजात म्हणाला- "मने मले डाग नोका लाऊ !! सती सावीतरी नं तू.. मनात चोर नसता तं देले असते नं तू आतालोक पैशे." त्या दोघांच्या बाचाबाचीनं आत झोपलेला बबल्या डोळे चोळत उठून बाहेर आला. त्याच्या मागोमाग कळकट हिरवा फ्रॉक घातलेली, अस्ताव्यस्त झिपऱ्यानी तोंड वेढलेली रंजीही आली. आता जर का आपण दुकानात गेलो नाही तर माय अन बाप्पूचं भांडन वाढत जाईल हे लक्षात येऊन बबल्या म्हणाला- "आन वं मा. दे पैशे. मी आनतो सामाईन."
पण गंगीच्या जिव्हारी लागलेल्या आरोपाने आपला परिणाम दाखवलाच-"पैलेच काऊन नाई गेला रे राजाच्या पोटच्या...आं?… आता नाई जा लागत. आता तं पैशे याईलेच देतो मी...बघतोच कितीक सामाईन आनते तं " असं म्हणत गंगीनं कडोसरीला गुंडाळून ठेवलेली दहाची नोट अन पाचचा कलदार दोन्हीही काशिरामच्या हातावर टिकवले. हातात पैसेे येताच काशिरामच्या अंगात कमालीची चपळाई आली. त्यानं मघाशी दारात काढून ठेवलेल्या चपलेत आपले पाय सरकवले आणि - "तू आधन ठेव चुलीवर. मी आलोच पाच मिंटात." असं म्हणत अंगणाबाहेर निघून समोरच्या गल्लीतून तो दिसेनासाही झाला.
बाहेरची झाडझुड आटोपली तशी गंगी आत आली. चुलीच्या बाजूची एक गोवरी तुकडे, तुकडे करून अधर चुलीत रचली. उल्यावर ठेवलेल्या चिमनीतलं घासलेट त्या तुकड्यावर ओतलं. माचीसची एक काडी बाजूवर घासून लगेचच गोवऱ्यांमध्ये ठेवली. चूल पेटली. कोपऱ्यातल्या दोनचार खुट्या तिनं चुलीत सरकवल्या. बाहेरून काळंभोर पण आतून पांढरं दिसणारं जर्मनचं भांडं चुलीवर ठेवलं आणि कोपऱ्यातला फडा उचलून घर झाडायला सुरुवात केली. त्याबरोबर कोरड्या शेणामातीचा धुरळा खोलीभर पसरला.
"मां... मले भूक लागली...बाप्पू पार्लेचा पुडाबी आनन कावं?" आतापर्यंत शांत असलेल्या रंजीनं घर झाडणाऱ्या गंगीचा पदर धरून तिच्या मागेमागे फिरत विचारलं, पण तिला कुठे ऐकू येत होतं?… ती आपल्याच विचारात गुंग होती. पारबतीच्या वावरात जायचं तर भराभर काम आटोपणं तिला गरजेचं होतं.
मग रंजीच्या बोलण्याची दखल घेत "हुं ..."- म्हणत, नकारार्थी मान डोलवत "मले तं वाट्टे बाप्पू सामाईन बी आननार नाई."-असं म्हणून बबल्यानं आपलं मत नोंदवलं. त्याच्या म्हणण्याचा अर्थ अर्थातच रंजीच्या लक्षात येणार नव्हता.
वाट पाहून पाहून सुरुवातीला नुसती किरकिर करणाऱ्या रंजीनं आता मोठ्याने भोकाड पसरलं-" मांss... मले चा दे नं वं... मले भिस्कीटबी पायजे..." रंजीचा वाढलेला आवाज सहन न होऊन विचारांची तंद्री तुटलेल्या गंगीनं तिच्या पाठीत एक रट्टा हाणला- "भूक लागली तं मले गिय आता... मीच हावो शिल्लक. बापाले तं दारुशिव काई सुचत नाई. सोता मस्त नशीत रायते लेकाचा... अन सौंसार अटकवते माह्या गयात. लेकरं तं जशे माहे येकटीचेच हायेत. दिवसभर कटलं चालवते तरी येक खडकू घरात दाखवत नाई. त्या दारूच्या मढ्यावर नेऊन घालते. बुढाबुढीनं येचं लगन दारुशीच लाऊन द्या लागत होतं. माह्या जिंदगीचा इस्तव काऊन केला काजून?"
गंगीची बडबड सुरू असताना जोरजोरात रडणाऱ्या रंजीला बबल्यानं जवळ घेतलं. गंगीनं रट्टा मारलेल्या जागी आपल्या उजव्या हाताने हलकेच चोळत -"भूक लागली का माह्या बाइले?... थांब हा मी देतो भिस्कीट" - असं म्हणत दप्तर उघडलं आणि दोन रुपयावाला पारलेचा एक छोटा पुडा तिच्या हातावर टिकवला. दर शुक्रवारी शाळेतून भेटणारा एक बिस्कीटचा पुडा कालच्या शुक्रवारीही बबल्यानं आपल्या छोट्या बहिणीसाठी आठवणीनं दप्तरात घालून सोबत आणल्याचं पाहून गंगीचे डोळे भरून आले. मघाशी पारलेच्या पुड्याचं आमिष बबल्याला का भुलवू शकलं नाही हे ही तिच्या लक्षात आलं. एव्हाना चुलीवरचं आधण उकळी येऊन चुरचुरू लागलं होतं. "रंजे, भिस्कीट कोलडं नोको खाऊ. थांब तुले आधनातलं पानी उनउन करून देतो." रंजीला कोरडं बिस्कीट खाण्यापासून थांबवत गंगी चुलीकडे गेली तसा काशिराम घरात आला. दारूच्या उग्र घमघमाटानं सगळी खोली भरून गेली. प्लास्टिकची एक पन्नी गंगीच्या दिशेनं भिरकवत दारूच्या ओझ्यानं जड पडलेल्या आवाजात काशिराम म्हणाला- "घ्ये... साकर अन चापत्ती हाये."
"बाप्पा !!… पंधरा रुपायात उलुशिकच साकर अन चापत्ती?"-काशिरामनं तिच्याकडे फेकलेल्या जेमतेम मुठीएवढया पुरचुंडीकडे पाहात गंगीनं विचारलं.
"उलुशिकच नाई तं का पोते आनू?… पाच रुपयात इतकीच येते."
"अन बाकीचे धा रुपय??"- गंगीनं हिशोब विचारला.
"हरपले..." -मक्ख चेहऱ्यानं काशिराम उत्तरला.
काशिरामचा धादांत खोटेपणा पाहून अंगाचा तिळपापड झालेली गंगी त्याला टोचून बोलली... "मन्याकडच्या मव्हाच्या दारूत हरपले असतीन. नाई...??"
"हेप्पाय ज्यास्त टपरटपर करू नोको. त्वाल्या हद्दीत राय... नाईतं... "- गंगीच्या उलटतपासणीला उत्तर द्यावे लागू नये म्हणून तिच्याकडे बोट दाखवत काशिरामनं धमकावण्याचा पवित्रा घेतला.
"नाईतं??… नाईतं काय करशील रे भाड्या?…"- चिडलेली गंगी आता एकेरीवर आली.
"भाड्या??… भाड्या ???… कोनाले मनुन रायली वं तू?… त्ये गजा असंन त्वाला भाड्या. मी नोय... नवऱ्याले भाड्या मंते रांड सायची.."- काशिरामचा आवाज चढला. मायबापाचं भांडण पाहून रंजी आणखीनच जोरात बोंबलू लागली. आवाजाच्या चढत्या पट्टीनं भेदरलेल्या बबल्यानं कोपऱ्यात बसून रंजीला जवळ ओढलं.
"आय हाय रं नवरा !!" आता गंगीनं काशिरामच्या डोळ्यासमोर बोटं नाचवले.."हुं... नवरा मनं... त्वासारक्या नवऱ्यापरीस भाड्याच कराले परवडते. कमसकम संग झोप्याचे पैशे तं देते. लेकराच्या पोटापान्याची सोयबी व्हते. नवरा असून काय कामी हाये तू ? "- काशिरामनं दिलेल्या शिव्यांचं जहर अंगभर मुरून गंगीच्या तोंडातूनही जहरच बाहेर पडलं आणि काशिरामच्या अंगाची आग आग झाली. त्यानं दरवाजाच्या कोपऱ्यात अडकन म्हणून ठेवलेला दगड उचलला. कसलाही विचार न करता गंगीच्या दिशेनं भिरकावला आणि गंगीच्या अंगावर धावून गेला. काशिराम असे काही करेल याचा आधीच अंदाज आल्यानं गंगी चपळाईनं बाजूला झाली पण हुकवलेला दगड उकळी आलेल्या पाण्याच्या भांड्यात पडून तिच्या अंगावर शिंतोडे उडाले. "माय वं sss मेली वं मी ss " असा आक्रोश करत गंगीनं चुलीतलं जळतं लाकूड हातात घेतलं आणि आपल्यावर चालून आलेल्या काशिरामच्या दिशेनं पुढे केलं तसा काशिराम मागे सरकला. त्याच्या दिशेनं चालत येणाऱ्या गंगीला म्हणाला- "बाजूले टाक त्ये लाकूड ... टाक मंतो ना... काय पागल झाली का काय तू…?"
"होव...झाली मी पागल. याच्या बाद सांगून ठिवतो. माह्याकून एक रुपयाबी तुमाले कईच भेटनार नाई. आन आज तं मह्यासमोर तुमी थांबुच नोका. नाई तं दोघापैकी एकाचा जीव जाईन." हातातलं जळतं लाकूड निकराने घट्ट धरत गंगीनं काशिरामला घरातून हाकललं आणि तो गेल्यावर भिंतीला टेकून ओक्साबोक्शी रडू लागली. आतापर्यंत एका कोपऱ्यात रंजीला ओढून घेऊन बसलेला बबल्या तिच्याजवळ आला आणि म्हणाला- "मां... आज मी शाईत नाई जात."
त्याच्या आवाजानं भानावर येत डोळे पुसत गंगी म्हणाली- "शाळा कईच नाई बुडवाची बाबू. माह्या जिवात जीव हाये तधलोक तं मी पाठोतोच तुले. शाईत नाई जाशीन तं हमाल्याच करशीन बापावानी. आजूक एका पोरीची जिंदगी खराब व्हईन माह्यावानी." असं बोलत तिनं चुलीच्या बाजूला पालथं पडलेलं जर्मनचं भांडं सरळ केलं. त्यात पाणी ओतलं. मघाची पुरचुंडी त्यात एकदम रिकामी केली. भांडं चुलीवर चढवत चुलीतले निवत आलेले निखारे फुंकून फुंकून धग वाढवली आणि पुन्हा दोन खुट्या चुलीत खुपसल्या. भांड्याच्या तळाला आपल्या कवेत घेत खुटीचा जाळ लपलपू लागला.
चहाचं आधण पुन्हा एकदा चुरचुरू लागलं.