बुकहंगामा टॉप २० - स्पर्धेतील गोष्ट क्रमांक – ८
मिरग –उमेश कांबळे
चार जून.. मिरग. तीन दिवस बाकी....माय आज सकाळी लवकर उठली ... बाजूला बाबग्याच्या गोठ्यात गेली ..हातावर शेणाचा गोळा घेऊन आली..
‘बाबग्या अरे मेल्या मेणकापड कधी घालतलास रे?’
‘माय आज संध्याकाळी घालतंय ... आज जरा मालवणात जातंय ..’
‘कशाला रे ....?’
‘आज चुडता सांगितलीत ...घेऊन येतंय .. पाऊस आलो तोंडावर ..कालच मनिऑर्डर आली लेकाची ...’
‘तुझा आपला बरा हा .. आमका कोण धाडता मनिऑर्डर ...’
‘माय तीनशेच धाडल्यान हत... दोनशे जातले झापाक... शंभरात महिनो कसो काढू ??? ही एक गाय, ती व्यातली भाद्रपदात .. पावसात काम तर काय कोण देता ...? चल मी निघतंय..’
‘लवकर ये रे झिला.’
मायने घर सारवुन घेतलन..आणि च्याय टाकली...मांगर सोडुन मागच्या मागे परसात गेली..अबोली फुलली होती...मोठी टोपली भरून तिन अबोली काढली..
‘पुसपे ये गो बाय चाय पी ये ...’
पुष्पा, बाबग्याची बायको...आली...च्या पिऊन गजरे तयार झाले..मायने आवराआवर केली आणि ती बाजारात गेली..परबाच्या दुकानाच्या बाहेर उभी राहिली....अबोलीची गजरे हे मालवण पट्ट्यात खास आकर्षण...तासाभरात गजरे संपवून माय परत आली...तो पर्यंत सारवान सुकलं होत चूल पेटवली भाताचं आधण ठेवलं..मातीच्या कढईत रात्रीची चवळीची आमटी शिल्लक होती, त्यात दुपार जाईल ...
दोन घास पोटात ढकलून माय झोपली..वीस खंडी शेती होती...ख्रिश्चन वाड्यात मायला आणि तिच्या नवऱ्याला खूप किंमत होती..म्हातारा पुरा शेतीतं गेला...पोरगा डॉक्टर होऊन फोरेनात गेला. तो परत आलाच नाही...त्याला डॉक्टर बनवण्यात वीस खंडीची शेती....पाच खंडीवर आली....ती आता कुणाला तरी खंडायला देऊन मायच्या भाताची सोय आहे...अबोलीची गजरे विकून दुपारच्या कढीची सोय आहे!
जेवून माय उंबऱ्यावर उशी घेऊन झोपली...अंगाची आग होत होती..आणि आठवलं तिला. सात जूनच्या मिरगात अर्धा गाव जेवायचा घरात...बारा कोंबडे पडायचे....काजूची दारू म्हातारा स्वतः पाडायचा..वडे मटण जेवून दुसऱ्या दिवसापासून शेतात काम चालू...मरण चुकतं पण मिरग नाय चुकाचो... पण आता काय खरा नाय.
‘गे माय झोपलंय काय गे..????’
‘नाय रे जरा डोळो लागलो...कधी आलास...?’
‘मघाशी ...’
‘मिळाली झापा?’
‘हो मिळाली..तिनशेची आणलय...या टायमाक तुजो मांगर पण शाकारून घेऊया... मातीचे भिंती कधी रातभर पाऊस लागलो तर काय खरा नाय .....’
बाबग्याचा लगीन होऊन वीस वर्ष झाली पोट पोटाक नाय..पण रडलो नाय कधी..दोन दिवसात कामा झाली पुरी....मायचो मांगर नवीन फ्रॉक घातलेल्या मुलीसारखा दिसत होता...आता तिला भीती नव्हती
आज मिरग ...
सकाळी बाबगो पेलेवर( घराशेजारच्या छोटा बांध ) बसून मशेरी लावीत होतो..
‘बाबग्या आज मिरग ना रे ???’
‘कसली मिरग आणि काय...एक कालो ढग तर दिसता काय बघ...???’
‘अरे माणूस चुकता….. देव नाय, येतोलच बग ...’
असा म्हणून माय घरात गेली...बाजाराची तयारी करून आली..बाबग्याने तोंड धुवून चाय पिली आणि तो तसाच पेलेवर बसून राहिला दुपारी पेज जेवून आणि डांब्याची भाजी खाऊन ..
संध्याकाळ झाली ....
‘बाबग्या ये बाबग्या ...’
‘काय गे माय ???’
‘तू आणि पुष्पा इकडे या जरा ....’
दोघे नवरा बायको पळत गेले ..
“काय झाला??”
मायने लाईट..लावला....अलतरावर (माजघरात भिंतीवरील देवघर) दिव्यांची आरास केली होती ...म्हाताऱ्याच्या पिवळसर पडत आलेल्या फोटोला अबोलीचा गजरा घातला होता ...
‘अरे मेल्या आज मिरग...सकाळी बाजारात तांदूळ विकलंय..मागच्या पडवीत कोंबडो बांधून हा ...काप त्याका...आज मिरग साजरो करूया.....’
सगळ्या गावातून मिरगाच्या कोंबड्यांचा वास सुटला होता..वडे तयार होत होते...त्याचा खरपूस वास तोंडात पाणी आणत होता ...
‘माय झाला गे तयार ...’
‘बाबग्या तुमच्या पद्धतीत जरा म्हाताऱ्याक वाडी दाखवशीत ...’
‘होय गे ...’
बाबग्यानं वाडी ठेवली...माय पटकन आत गेली. थांब रे वाईच...आतून काजूची दारू घेऊन आली ..बुचातून वाडीवर ओतली....बाबग्याने हात जोडले...म्हाताऱ्याला मानवून घे म्हणून सांगितलं...आकाश स्वछ नीरब्रा होत....
‘माय मिरग वाटणा नाय गे ...’
‘काय झाला...कळनं नाय.... आमच्या टायमाक सात तारीख म्हणजे सात तारीख..पाऊस पडणारच ..’
‘माणूस बदललो ...पावसाचा काय घेऊन बसलं ...?’
जेवण झालं...बाबगो गेलो आणि...माय पडवीत बसली....मिरग फसवताकि काय ..??? काय रे बाबा कशाक फसवत...???? पड रे पड लवकर ...
कुठेतरी लांब एक प्रकाश पडला...मायच्या काळजात धस झालं ...आणि गार वारा सुटला . आभाळ भरुन आलं दूर मालवणकडच्या बाजून पश्चिम धरून मिरग येत होता ...बाबग्या पुष्पा आणि माय खळ्यात उभे राहून बघत होते ...
मिरागचा देना पोचला होता.... मिरग प्रसन्न झालो होतो...