मित्रानो हादरलो मी ही कथा वाचून....तुम्ही सुद्धा हादराल.....आता हे असेच होणार आहे...अन्याया विरुद्ध दंड थोपटले जाणार आहेत.
तलाक – जैनाब इनामदार देसले
''तलाक तलाक तलाक ''
हे तीन विषारी शब्द जेव्हा तिच्या कानातून शरीराच्या प्रत्येक भागात शिरत होते तेव्हा नुकतीच सकाळ उलटून गेली होती. मान कापलेल्या कोंबडी सारखी ती तडफडत, अपमानाने धुमसत जमीनीवर पडून राहिली. नवरा आक्रस्ताळा, थोड्या थोड्या गोष्टींवरून तिला धारेवर धरे. आजतर कमालच झाली धांदलीत भाजीत मीठ टाकायचं विसरली म्हणून सरळ तलाक. संपूर्ण आठ वर्षे तिने संसारासाठी वेचली. प्रेमापेक्षा नवऱ्याची तिला भीतीच वाटे. एखाद्या दिवशी नवऱ्याने तिचा अपमान नाही केला तर चुकल्यासारखं वाटे तिला...
रिती प्रमाणे आईवडिलांना कळल्यावर ते तिला घेऊन गेले. ती दिवस दिवस धुमसत राही. आणि कित्येक रात्री स्वतःची त्वचा स्वतःभोवती पांघरून यातनांच्या खोल गर्तेत पडून राही. तिकडे आपण काय करून बसलो याची नवऱ्याला जाणीव झाली तसा तो धावत तिच्या वडीलांजवळ आला. रडून भेकून चूक झाली म्हणाला. ''मला परत तिच्याशी लग्न करायचं आहे '' नवरा.
पण धर्मानुसार तिचं आता दुसऱ्या कुणाशी तरी लग्न होणं आवश्यक होतं, तरच त्याला तिच्याशी पुन्हा लग्न करता येणार होते.म्हणजेच हलाला निकाह होणं जरूरी होतं. त्यानं या कामासाठी एक निरूपद्रवी मित्र शोधून ठेवला होता...
वडीलांना तशीही ती जडचं होती. एका उदास, कंटाळवाण्या दुपारी तिचा हलाला निकाह झाला. नव्या नवऱ्यानं ठराविक काळानंतर तिला तलाक द्यायचं कबूल केलं होतं. नवा नवरा कलाकार होता. सुंदर पेंटींग करे. सहवासाने दोघांत मैत्री होऊ लागली. संवाद घडू लागला. तिची मर्जी विचारली जाऊ लागली. पदोपदी अपमान सहन करणार्या तिला हे सगळं नवीन होत...
वेळ भरली तरी नवा नवरा तिला तलाक द्यायचं चिन्ह दिसेना तसा जुना तडक तिच्या घरी गेला. ''नवा तुला तलाक कधी देणार '' त्यानं मालकीची वस्तू मागावी अशा आवेशात विचारलं...
तलाकचा विषय निघाला तशी ती म्हणाली
'' मी किती हौसेने क्षण न क्षण वेचून तुझा संसार उभा केला पण एका शुल्लक चुकीपायी तूच माझ्या पायाखालची जमीन हिसकावून घेतली मी तेही सहन केलं असतं पण तू वस्तू समजून माझा बाजार मांडला हे मी कालत्रयी ही सहन करणार नाही. ज्या क्षणी तू माझं लग्न तूझ्या मित्राशी लावलं अगदी त्याच क्षणी माझ्या मनाने, माझ्या आत्म्याने तूला उद्देशून तूझेच शब्द वापरले....
''तलाक तलाक तलाक''