आणखी एक उत्कट कथा...सुमित्राची...सुमित्रा!!!
सांभाळ - सुमित्रा
‘सांभाळून का घेतलस?’
‘म्हणजे?’
सांभाळून घ्यायला तू कोणीही नव्हतीस माझी. फार फार बोललो तुला. तरी गप्प का राहिलीस?
‘कारण हवय?’
‘सांगितलस तर हो’
‘सांगितलं नाही तर?’
‘तसंही मी विचारलंयच कुठे?’ तिचं सस्मित उत्तर! तो आवाक!
....
‘हसलीस का?’
‘हं, अं.. कारण आजही तुझा इगो तसाच आहे.’
‘त्याचा काय संबंध, कारण कळाव असं वाटत नाही का?’
ती फक्त समोर पाहत गप्प राहिली.
‘काय गं बोल की. निदान हसण्याचं कारण सांग.’
‘कारण इतकंच की माझ्या जगण्यात फक्त माझे असे जे क्षण होते, ते तुझ्या नावावर करून टाकलेत. त्या क्षणांवर फक्त माझी मालकी होती. त्या क्षणांवर माझ्या वर्तमानाचे ओझे नाही आणि भविष्याची काळजी नाही. मग मला आता कारण समजून घ्यायची उत्सुकताही नाही आणि इच्छाही नाही. इच्छा होती तेव्हा कळलं नाही आणि आता सहज सांगतोयस कारण.. हसू त्याचं आलं.’
‘अवघड बोलतेयस.’
‘अहं.. अवघड नाही. पण सोपेही नाही. असा स्वतःच्या मालकीचे क्षण दुसऱ्याला देण्याचा प्रवास सोपा नसतोच. सोपी नसतेच ती वाट. त्या वाटेवर चालताना आपल्याला जुळवून घ्यायला लागतं, समजून घ्यायला लागतं आणि जीवघेण्या गोष्टींचा पीळ बसला ना तरी झेपवून न्यावे लागतात ते पीळ. जीवापासून ढवळून निघतो, पण मग यातून आपल्याल आपल्या आनंदाची वेळ समजते, रीत समजते, नाती समजतात आणि मग आपोआप येते आपल्या वाट्याला हवीशी शांतता.. अजून काही हवयं? अं..?’
‘ नाही, तसं नाही.. ‘
त्याला बोलता येईना, तो फक्त पाहत राहिला. एकीकडे त्याला मनापासून वाटत होतं की तिला मिठीत घ्यावं, पण त्यानं तसं केलं नाही. तो शोधत राहिला तिला..आणि लपवत राहिला स्वतःचा पराभव. तिच्याकडे एकटक पाहताना त्याला आठवत राहिले त्यांचे प्रेमाचे, वादाचे, भांडणाचे अनेक क्षण. त्या क्षणी त्याला लख्ख जाणवलं, त्या सगळ्यात ती तशीच होती, तिची जागा न सोडता राहिलेली..
तीही त्याच्याकडे पाहत होती, तिला वाटत होतं, माझं मला ढीग कळतं रे, पण तरीही केव्हा तरी तुझ्या कुशीत समरसून जावंस वाटतंच. त्यानेहून समजून पुढं होऊन आता तरी तिला सावरावं, अशी एक आशा तिच्या मनात लुकलुकत होती..
पण तसं काही झालं नाही.
‘मी निघतो..’
‘बरं..’
‘हं..’
तो वळल्यावर तिला जबरदस्त हुंदका फुटला, अनावर रडता रडता आणि पुन्हा एकदा स्वतःची समजून घालता घालता स्वतःलाच म्हणाली,
‘शांत हो..फक्त आपले आपलेच असणारे असे क्षण दुसऱ्याला दिले नं की असं होतं आणि असंच होत राहणार!’ सांभाळ स्वतःला’
तिचाच आवाज तिच्या कानांत पुन्हा पुन्हा घुमला...