सत्यघटना..कधी कधी जास्त असत्य वाटाव्यात...कारण चांगुलपणा वरचा विश्वास उडत चालला आहे.
दैव – सुचरिता
वय १८ पुर्ण झाल्यामुळे अनाथश्रमाबाहेर पडाव्या लागलेल्या एकीची गोष्ट. . तर या एकीला आपण एक नाव देऊयात. दया चालेल? दैवाला तिची दया आली म्हणुन तसे म्हणुया. पण मुळात गोष्ट सुरू झाली तेंव्हा दुर्दैवाने घात केला.
घटना साधारणतः पन्नास वर्षांपुर्वीची आहे. सो कॉल्ड उच्च जातीत जन्माला आलेली देखणी मुलगी. कोवळ्या, मुढ वयात वडिलांच्याच एका देखण्या मित्राने भुलवली. सोळाव्या वर्षी गरोदर राहिली. वडिलांनी रीतसर हाकलुन दिली. प्रियकराला (नेहमीप्रमाणे) नंतर बायकामुले आठवली. अर्धवट शिक्षण आणि पुर्ण भरलेल्या दिवसाची दया भटकत भटकत तिच्या छोट्या गावाहुन मुंबईला आली. स्टेशनवर नजरेतला हरवलेला भाव ओळखुन स्त्री पोलिसांनी एका प्रसिद्ध महिलाश्रमात पोचवले. दिवस भरले. मुलगा झाला. तिने त्याला दत्तक देण्यास नकार दिला. कायद्याप्रमाणे तिला बाळासकट बाहेर पडावे लागले. तेंव्हा मुंबईत सुतगिरण्या होत्या. मुलाला घेऊन ती जवळच्या एका गिरणीच्या बाहेर भीक किंवा काम, जे मिळेल ते शोधत उभी राहिली.
याच गिरणीत फाळणीमुळे अनाथ झालेला आणि भटकत भटकत इथे येऊन स्थिर झालेला एक सद्गृहस्थ काम करायचा. दया पेक्षा वयाने बराच मोठा. अनाथपणाची सहअनुभूती त्याला तिच्याकडे ओढुन घेऊन गेली. दयाची गोष्ट ऐकुन त्याला तिचे दुःख आपले वाटले. त्याने तिचा बाळासकट स्वीकार केला. लग्न झाले. तीन अजुन मुलं झाली. संसार झाला. परदेशी नोकरी मिळवुन त्याने भरपुर पैसा कमावला. घडायच्या इतर अनेक चांगल्या वाईट घटना आयुष्यात घडल्या.
नंतर आईवडील सुद्धा येऊ जाऊ लागले. (त्यांचा मात्र मला फार राग येत असे.) पहिला मुलगा या वडिलांचे नाव घेऊन स्थिर झाला. तो त्याच्या जन्मदात्या पित्या इतकाच अतिशय देखणा झाला हे विशेष. सोळा वर्षांच्या सुंदर मुलीला भुल का पडली असावी याचे उत्तर त्या मुलाला पाहुन मिळायचे. दयाचे सुदैव की तिच्या नशिबी कुंटणखाना नाही आला.
वय अठरा पुर्ण होताच अनाथश्रमातुन बाहेर पडाव्या लागणाऱ्या प्रत्येकीच्या नशिबी असे सुदैव यावे.
कहाणी फिल्मी वाटली तरी शत प्रतिशत खरी आहे.