आपण कशाच्या मागे धावतो आहोत हे कळणे आणि उमजणे खूप महत्वाचे असते....
माघार-माणिक घारपुरे
आणि अंधाराची तमा न बाळगता ती तिथून धावत सुटली. इथे थांबायचं नाहीये एवढंच तिला माहित होतं. वाट फुटेल तिकडे निघाली होती. मधेच मागे वळून बघायचा मोह तिला होत होता पण ती मनाला समजावत राहिली की त्यात वेळ वाया जाईल. कुणाला काही कळण्या आधी तिला तिथून निघून जायचं होतं.
आज निघाली नसती तर कधीच सुटका होणार नाही हे माहित होतं तिला. जीव गोळा करून ती धावत निघाली होती. पळतांना ओढणी कुठेतरी पडून गेली होती. केसांची पिन कशात तरी अडकून निघाली. मोकळे केस कपाळावरच्या, गालावरच्या घामाला चिकटून बसले होते. डोळ्यांवर आलेले केस बाजूला करायचंही भान नव्हतं.
पण तिने हातातला तिचा फोन मात्र जिवाच्या आकांताने धरून ठेवला होता. खूप धाप लागली होती तिला. हृदय जोरजोरात धडधडत होतं. घशाला खूप कोरड पडली होती. पाणी? कुठे मिळेल?? पण कुठे थांबायची सोयच नव्हती. इतक्यात कशाला तरी ती अडखळली आणि तिच्या टाचेत काहीतरी खसकन घुसलं. तिने विचार केला, हे काय आपण अनवाणीच निघालो होतो की चप्पल घातली होती पायात?
काहीच आठवेना. पाय दुखतोय. काय गेलंय म्हणून टाच वरून करून बघितलं तिने. ओढून काढला तो तुकडा. ती दचकलीच. हा तर माझ्या स्वप्नाचा तुकडा. आणि काय लागलंय त्याला तर कविता? हे कसं? तिने झर्रकन टाच बघितली तर टाचेतुन शब्द बाहेर येत होते. तिचा नजरेवर विश्वासच बसेना. अंगातलं रक्त कुठे गेलं? ती नकळत ते शब्द वाचायला लागली.
पहिल्यांदा वादळ बाहेर आलं, मग आकांत, वेदना भराभर शब्द येत गेले आणि त्याही परिस्थितीत तिला जाणीव झाली की ते सगळे तिच्याच कवितांमधले शब्द होते. ते काय करताहेत तिच्या धमन्यात? आणि स्वप्नाचे तुकडे? ती येण्यापूर्वीच ते तिथे कसे पोहोचले? की ते कधी वेगळे नव्हतेच तिच्यापासून?
मग तिने जे त्याच्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न केला होता ते काय होतं? एक अदृश्य ओझं जाणवलं तिला पाठीवर. स्वप्नांचं, कवितांचं, अपेक्षाभंगांचं ओझं होते ते. ती झुकल्या खांद्यांनी उभी राहिली, पराभूतासारखी. खूप हताश झाली होती. ह्यांच्यापासूनच तर पळायचं ठरवलं होतं तिने. मुद्दामच अवेळी निघाली होती. पण त्यांनी तर तिला सोडलंच नव्हतं.
तिला त्याक्षणी एक सत्य समजलं की ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी त्या ओझ्यापासून सुटका नाही होणारच नव्हती तिची. मग घरच काय वाईट आहे? हातातला स्वप्नाचा तुकडा तिने दूर भिरकावून दिला; आणि मान खाली घालून हळूहळू निघाली घराकडे. लवकरच त्या तुकड्याची जागा दुसरा तुकडा घेणार होता .