कुटुंब आणि करियर ह्यातील तिढा सुटू शकतो...जरका घर स्त्री पुरुष दोघांचे असेल तरच...
तिढा –माणिक घारपुरे
रात्रीची सगळी झाकपाक करून अदिती बेडरूममध्ये आली. रोहितने एव्हाना ईशाला झोपवले होतं. ते बघून बरंच वाटलं तिला. रोहितशी आता निवांत बोलता आलं असतं. ईशा जागी असली की ते शक्यच नसायचं. पलंगाच्याकडेला बसत अदिती रोहितला म्हणाली,
मी पुढच्या आठवड्यात राजीनामा देतेय.
ईशाला थोपटणारा रोहितचा हात मधेच थांबला.
अजून ते खुळ आहेच वाटतं डोक्यात?
खुळ? मला ती संधी वाटते.
आणि ईशाचं काय?
काय म्हणजे? ईशा माझ्या एकटीची मुलगी आहे का? तूही तर तिचा बाप आहेस.
आहे ना. पण सव्वा वर्षाच्या वयात ईशाला आईची जास्त गरज आहे .
तुझ्या आईबाबांना बोलावं इकडे राह्यला . गावातच दुसरीकडे राहताहेत ते . सोईचं होईल तुलाही .
ते दुसरीकडे नाही रहात. आपण उठून इकडे आलोय...तुला तुझी स्पेस मिळत नव्हती म्हणून.
कसले फाटे फोडतो आहेस. विषय काय आहे रोहित? आणि तू काय बोलतो आहेस? तुझा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे.
प्रॉब्लेम मी नाही तू करून ठेवला आहेस.
ठीक आहे. प्रॉब्लेम मी केला आहे तर मग निस्तरतेही मीच. सासूबाईंना फोन करून सांगते की तुम्ही ईशासाठी इकडे या. इथे सगळ्याच बायका लागलेल्या आहेत. तेच जास्त सोपं आहे.
चालणार नाही. तुला काय वाटलं की माझ्या आईवडिलांना तू तुझ्या सोयीसाठी, तुझ्या मर्जीप्रमाणे नाचवशील आणि मी चालवून घेईन?
मग तू चल माझ्याबरोबर. तू ,मी, ईशा आपण तिघेंही जाऊ.
हॅ, माझं येणं कसं शक्यय?
का? काय हरकत आहे?
-- मी येणार नाही . आणि तूही विचार करावास.
मी केलाच आहे विचार. मला सांग माझ्या जागी तू असतास तर काय केले असतंस? परदेशातल्या इतक्या मोठ्या कंपनीने जर तुला इतक्या मोठ्या पदावर नियुक्त केलं असतं तर तू काय केलं असतंस?
-- ....
-- ...
--गप्प का बसलास? बोल ना...खरं उत्तर द्यायचं नाहिये तुला. मग जर तू ही ऑफर नाकारली नसती तर मी का नाकारू? दुटप्पी विचार करू नकोस. अशी संधी पुन्हा पुन्हा चालून येत नसते.
अग, पण तू आई आहेस आता?
so wha ? आई कुणीही होऊ शकतं. त्यासाठी इतक्या भारंभार पदव्या, कार्यानुभव लागत नाही.
हा विचार ईशाला जन्माला घालण्यापूर्वी करायचास. आता उशीर झालाय.
कुठे चालू दिलं तुम्ही लोकांनी माझं तेव्हा. तुझी आई, त्यांच्या मैत्रिणी, तुझ्या मावश्या सगळ्यांनी कान किटेपर्यंत प्रश्न विचारला 'गोड बातमी कधी?' शी! दुसऱ्यांच्या खासगी बाबीत किती लक्ष घालावं कुणी. आता विषयाला तू फाटे फोडते आहे . माझ्या माणसांना नावे ठेवायची असली की तलवारीसारखी जीभ चालवतेस. पण त्याचं सोड ग आत्ता, तू ईशाचा विचार कर.
तू मला इमोशनल ब्लॅकमेल करतो आहेस. मी जाणार आहे, ह्याचा अर्थ माझं ईशावर प्रेम नाहीये असा अजिबात होत नाही.
अग, पण तिच्यापासून दूर गेलीस तर तिला काय उपयोग त्या प्रेमाचा?
पण तिचाच विचार करून मी तिला नेऊसुद्धा शकत नाहीये. तिथे ती एकटी पडेल... इथे मी नसले तरी ती तिच्या स्वतःच्या इतर माणसांमध्ये राहील. आणि मला सांग, तुझं नेमकं दुखणं काय आहे? फक्त मलाच मिळालेली ही अपूर्व संधी की...? What do you expect me to do? मी माझे पंख छाटून टाकू? मग काय उपयोग माझ्या शिक्षणाचा, योग्यतेचा, आतापर्यंत स्वतःला सिद्ध करत राहिले त्याचा?
--
आवाजातल्या चढउतारांनी ईशा दचकून उठून बसली होती. आई बाबा असे जोरात का बोलताहेत तिला कळतच नव्हतं. केविलवाणी झाली अगदी. काय करावं ते न कळून पाण्याने डबडबलेले डोळे आणि थरथणारा खालचा ओठ घेऊन ती बिछान्यातच बसली राहीली.