मागच्या वेळीस हरणीचा अर्धा भाग पोस्ट झाला...नंतर वाटलं...उरलेला अर्धा भाग पोस्ट करण्या पेक्षा संपूर्ण कथा पुन्हा पोस्ट करणे श्रेयस्कर आहे...योग्य आहे.
हरणी – श्रद्धा सचिन राजेभोसले
हरणीला वाटले....की अंग काळे असले म्हणून ओठ का काळे असावेत? त्याच्या डोळ्यांत, चेहऱ्यात कुठे तरी स्निग्धता आढळते काय हे पुन्हा एकदा त्याच्या कडे पहात विचार केला अन् एक क्षीण सुस्कारा सोडला...ती स्वतःला म्हणाली,
"दरिद्र्याच्या पोटची पोर तु!!! कशाला मोठ्या अपेक्षा धरतेस?? नव-याच्या जातीचा कोणी मिळतो आहे हे काय थोडे झाले???"
अन् गरिबी वर मात म्हणून की पाठच्या बहिणी भावंडांसाठी ती बोहल्यावर चढली........हरणीच्या यौवनाची मोहक कळी आत्ताशी कुठे उमलली होती...तिची पाकळीन् पाकळी स्वाभाविक फुलायची तर तिला या वेळी दवबिंदूचा अभिषेक हवा होता....प्रभातवायुची नाजूक फुंकर हवी होती....आणि शिवाय स्निग्ध दृष्टीने काळजी घेणारा माळीही हवा होता....पण ......
शिवाचा हात बाग फुलवणा-या माळ्याचा नव्हता ...तो होता एका दांडग्या आचा-याचा....
पाण्यातली पालेभाजी मुठीने पिळून फोडणीला टाकायची, एवढी एकच कला त्याने संपादन केली होती ....मर्दपणातही जे एक मार्दव असते, ते त्याने कुठे विकुन खाल्ले होते कोण जाणे!!!
"तापलेले लोखंड ऐरणीच्या माथ्यावर ...."
आता शिवा शिवाय आणखी एक सुक्ष्म जिव हरणीला अलिकडे छळु लागला होता...त्या अनभिज्ञ पोरीला काहीच कळत नव्हते,..चौथा संपून पाचवा महिना लागताच त्याने चुळबूळ सुरु केली ...सातव्या आठव्यात तर मुखावर मनोज्ञ गर्भछाया पडली ...
शिवा जर रसिक असता तर भावकोमल असता तर...त्याने तिला हौस...आवड...डोहाळे...काही विचारले असते...पण त्याने तिला भयानक प्रसाद दिला... अशा अवस्थेत तिला सोडून पळून गेला....दुसऱ्या स्त्री समवेत...
पोटात गर्भाचे ओझे अन् काळजावर दुःखाची धोंड!!!!
हरणी निराधार झाली या जाणिवेने तिच्या पुढे ब्रम्हाड उभे राहिले....छळणारा, गांजणारा असला तरी शिवा तिचा नवरा होता...जगायला नाही तर मरायला तरी हक्काचे स्थान होते...पण....
आता सारेच मोडले होते....अवडलेला जिव घेऊन हरणी फाटक्या माहेरी पोहचली....अन् ...
समोरचे दृश्य पाहुन कोसळता कोसळता राहिली.....
"आई....आई तूच का ही.....!!!"तिच्या तोंडून उद्गार निघाले ..
हरणीची आई ही गर्भारशी होती. हरणी सारखेच तिचेही महिने भरले होते....
या खेपेस आईची अवस्था अत्यंत शोचनीय होती...मुखावर कळा नव्हती अंगात रक्त नव्हते ....
तो गर्भ मात्र तिच्या शरिरातले सप्त धातू शोषून घेऊन यथास्थित वाढला होता....
तिची ती दशा पाहून हरणीच्या मनात अशुभाची शंका डोकावली...आई यातुन सुखरुप मोकळी होईन ना?? फाटके का होईना, आपले मातृछत्र उडून तर जाणार नाही ना??? हरणीला तिच्या बापाची विलक्षण चिड आली....
वाटले....पडवीच्या धडेवर विडीचे झुरके घेणाऱ्या बापाचे दोन्ही खांदे गदागदा हलवून विचारावे त्याला ...."माणूस आहेस का कोण आहेस??? आईला जगातुन घालवून मग काय माती खाणार आहेस का???"
अती प्रक्षोभाने तिला ग्लानी आली...
हरणीची अवस्था ..."न इकडंची न तिकडंची" अशी झाली होती.....
दारात बसुन मोहर करपून गेलेल्या आंब्याच्या झाडाकडे हरणी एकटक पहात बसली....
ती केवळ भवितव्यतेच्या हातातली बाहूली बनली....
त्या घरात अन् त्या परिसरात तिला कुणाचाही आधार उरला नव्हता ...