हे साम्य खूप वेदना दायक असतं...
तुच्छ – रश्मी नगरकर
त्याने तिचा कमरेला विळखा घातलेला हाथ झटकला तशी तिला जाग आली. ती उठली पदर सावरला, केसांना हाताचा विळखा देत केस घट्ट बांधले. खिडकीतून शुभ्र नटलेला मोगरा किती मोहक वाटत होता. तो तिला भुरळ घालत होता. लग्न करून आली तशी तोच तिचा प्रिय सखा झाला होता... ती झटपट न्हाउन आली. ओले केस झटकले... तिच्या केसाचे पाणी निजलेल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उडाले तसा तो वैतागला.... ती हिरमुसली. टेबलावरची परडी हातात घेतली. थेट बागेत गेली...आवडणारी सर्व फुल परडीत भरून देवघरात आली..
कालच्या सुकलेल्या फुलाना उचलून बाजूला ठेवताना एक विचार तिच्या मनात चमकून गेला. सुकलेला मोगरा तळहातावर घेत ती मनात म्हणली,
"तुझी न माझी व्यथा सारखीच आहे बघ.... गरज संपली की तुच्छ वस्तूप्रमाणे आपल्याला बाजूला लोटून दिल जात, फरक इतकाच जवळ ठेवतात ते तुला दिवस सरेपर्यंत....आणि मला रात्र सरे पर्यंत...."