Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

तो आणि ती-Manali Jadhav

$
0
0

मनाली जाधव ...एक अलीकडे लागलेला शोध...काय सुरेख लिहिली आहे कथा..रूपक इतक सुंदर गुंफल आहे तिने...

तो आणि ती – मनाली जाधव

भाग 1

आणि आज तो आला… जवळपास आठ महिन्यांनी. नेहमीप्रमाणे रस्त्यातचं गाठलं त्याने तिला. तसा काही दिवसांपासून तो येईल अस्ं वाटत होतंच. पण दाटलेल्या ढगांच्या मागून तो हुलकावणी देत राहिला. असा उशीर केलेला पाहून जरा घुश्शातच तिने विचारलं,

“आता आठवण आली का? हळव्या ‘मना’सोबत असे खेळ खेळताना काही वाटत नाही का रे तुला?”

तो नेहमीसारखाच गडगडाटी हसला, जरा अजून जोराने बरसला. त्याच्या ओल्या स्पर्शात ‘मना’चा लटका राग क्षणार्धात वाहून गेला. तिलाही तो हवा होताच. खरंतर सर्वांनाच हवाहवासा असा तो. पण ती मात्र त्याच्या येण्याने इतरांपेक्षा जरा जास्तचं सुखावली होती. काही वेळ ती तशीच डोळे मिटून थांबली, त्याचे थेंब अंगावर झेलत. एवढे दिवस झाले म्हणून काय झालं, प्रेमाला कसलं काळवेळेच बंधन?

डोळे उघडले आणि तिने सरळ चालायला सुरूवात केली. डोळ्यांमध्ये आनंद, उत्साह; गालांवर बारीक हसू, ओठांवर नाजूक शीळ अशा तिच्या भिजल्या रूपाकडे लोक आडोशाला उभे राहून जरा आश्चर्याने, जरा कुतूहलाने तर जरा तिरकसतेने पाहत होते. पण तो सोबत असताना पर्वा कशाची? एका ठिकाणी तिचे पाय थांबले.

“चहा घेऊयात का?”

तिने विचारले. वाफाळलेल्या चहाचा घोट घेऊन ती म्हणाली,

“तसा रोज घेते रे मी चहा, अगदी चारचारदा; उन्हाने तापून, घामाने चिंब झाले तरी. पण तुझ्यात चिंब होऊन चहा पिण्यात जे सुख् आहे ना…….”,

एवढे बोलून ती स्वता:शीच खुदकन हसली. तिला माहित होतं, या Tea Date ची सर five star hotel मधल्या candle light dinner ला सुद्धा येणार नाही. बराच वेळ ती बाकी सारं काही विसरून भिजत राहिली. निरोपाचा क्षण आला पण त्याला दुखा:ची एवढीशीही छटा नव्हती. तिच्यामध्ये तो पुरता भरून राहिला होता, तो परत येईपर्यंत पुरेल एवढा… घराच्या दारातून मागे वळून ती म्हणाली,

“असाच येत राहा…’मना’चा ओलावा तुझ्यामुळे तर टिकून आहे”. -----------------------------------------------------------------------------------------------------------

भाग 2

मिटींगसाठी फोन आला आणि दुपारची झोप अर्धवट टाकून ती उठली. आजकाल तसं हे नेहमीचंच झालेलं, जेवढे शक्य होईल तेवढे कामात व्यस्त राहायचं तिने ठरवलंच होतं. कातरवेळी उगाच आठवणींत गुंतून मनाला हूरहूर लावून घेण्यापेक्षा हे बरं.

काल ‘तो’ येऊन गेल्यापासून तर ती जरा जास्तच हळवी झालेली. इतरांनी स्वता:च्या मनाच्या लहरीप्रमाणे वागायचं आणि या ‘मना’च्या नशिबी मात्र निव्व्ळ झुरणं…. झोपेतून उठायला लागल्याने तिला जरा रागचं आला. रात्री उगाच खिडकीबाहेर बघत जागल्याबद्दल तिला नाही म्हटलं तरी जरा पश्चातापात झाला. पण पुन्हा ते मनाचं उदास होणं नको…फक्कड चहा घ्यावा अन् कामाला लागावं अशा विचारातच ती बाहेर पडली.

मिटींग सुरु होऊन तासभर झाला असेल. सूर्य पश्चिमेकडे कललेला आणि आज परत एकदा दाटून आलं. शेजारच्या पत्र्याच्या शेडवर थेंब पडलेला आवाज आला आणि ती अस्वस्थ झाली…….तो आला होता! काही महत्त्वाचे लोक उशिरा येणार असल्याने तिला सर्वांबरोबर आत थांबणे भाग होते. वरून गडागडासोबत लखकन् वीज चमकली. तो आपल्याला खुणावतोय याची तिला जाणीव एव्हाना झालेली. हात बाहेर काढून त्यावर तरी थेंब झेलावेत असे वाटते तोपर्यंतच असला बालिशपणा करण्याचे मनाने नाकारले.

Professional आणि personal life वेगवेगळे अस स्वत:लाच बजावून तिनं चर्चेवर लक्ष एकवटले.

“मी हिला भेटायला येतो काय आणि काल लाडिवाळपणे इतके दिवस का आला नाहीस म्हणून विचारणारी ती चक्क माझ्याकडे दुर्लक्ष करते.”

तो साहजिकच रागावला असणार. जोराचा वारा सुटला होता; काहीतरी पडल्याचा आवाज, सोबत विजांचे कडकडणे होतेच. कालच्यापेक्षा जरा जोरातचं बरसून त्याच रागात तो निघून गेला. मीटिंगमधली निरोपाची औपचारिकता होता क्षणी ती बाहेर आली. रस्त्याच्या कडेने लावेलेले बोर्ड, झाडाच्या फांद्या, पानं, सारं अस्ताव्यस्त विखरून पडलेलं, चिखल झालेला, लाईट गेलेली….. रुसव्याच्या-रागाच्या सारा खुणा मागे ठेवून तो निघून गेलेला. उदास मनाने परतीचा रस्ता धरला, तिने परत कालच्याच ठिकाणी थांबून चहा मागवला. साखर कमी पडल्याने त्यातलाही गोडवा गायब झाला होता. आभाळाकडे डोळे लावून ती विचार करु लागली,

“प्रेमाबरोबर possessiveness यायलाच हवा का ? ‘दो दिल, एक जान’च्या रोमँटिक कल्पनेत स्वता:चे स्वतंत्र असित्व गमावलेली मित्रमैत्रिणी तिने पाहिले होते. एखादवेळी नाही देता आला वेळ म्हणून प्रेम कमी होतं का लगेच ? प्रत्येकवेळी त्याच्या मिठीत जाऊन चिंब भिजायलाच हवं का?”

‘आरं वळवाचा पाऊस त्यो…पडला दोन दिस, आता कशाचा येतूय…!’,

हे वाक्य कानावर पडलं आणि तिची तंद्री भंगली. गार झालेला, बिनसाखरेचा तो चहा तसाच एका घोटात संपवून तिने चालायला सुरुवात केली. असलं काही नको म्हणून तर तिने ‘त्याच्या’शिवाय दुस-या कोणावर जीव लावला नाही. बुध्दी आणि मन (?) असणा-या या द्विपादांपेक्षा उशिराने का होईना पण आठवणीनं भेटायला येणारा तोच तिला प्रिय.

अंगाला स्पर्शणा-या गार वा-यात तिला अजूनही त्याचं अस्तित्व जाणवत होतं. तिला वाटत होतं की तो येईल…., निदान आज अशी का वागलीस याचा जाब विचारायला तरी एकदा नक्कीच येऊन जाईल.

डोळ्यांतला उष्ण आणि वरुन थंडगार पाण्याचा थेंब एकदमच तिच्या गालावरून ओघळला… तो खरंच परत आला होता.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>