आल्हाद देशमुख च्या दुसऱ्या कथेत लेखनातला प्रवास किती स्पष्ट दिसतो आहे पहा...
चव –आल्हाद देशमुख
लहानपणी मला बेसनाचे लाडू फार आवडायचे. स्वयंपाकघरातून बेसन भाजण्याचा वास आला की कुठूनही मी धावत येऊन आईला विचारायचो
"किती वेळात होणार लाडू?"
आई सुद्धा लाडू झाल्याझाल्या ओल्या बेसनाचा एक ताजा लाडू माझ्या हातावर ठेवायची. तो जिभेवर लोळवत खाता खाता कधी संपायचा हे कळायचे देखील नाही. मग पुन्हा दुसऱ्या लाडवासाठी माझा हात पुढे. तरीसुद्धा जराही ना चिडता आई दुसराही लाडू ती तितक्याच प्रेमाने हातावर ठेवायची. प्रसंगी लटक्या रागाने म्हणायचीही
"लाडू केले की ते घरातल्या इतरांना पहायला सुद्धा मिळत नाहीत."
पुढे कॉलेज नंतर नोकरी मिळायला मला खूप त्रास झाला. बऱ्याच ठिकाणी interviews देऊनही नोकरी काही लागत नव्हती. एकदा असाच एक interview देऊन निराश होऊन मी घरी परतलो. मग माझा मूड चांगला करण्यासाठी आईने बेसनाचे लाडू करायला घेतले. त्या वासानेच मी अर्धा आनंदी झालो होतो. आता लाडू हातावर टाकण्यासाठी आईची हाक कधी कानावर पडते असे झाले होते. हाक ऐकू येताच मी लगेच सवयंपाकघरात गेलो. हातावर लाडू पडणार इतक्यात वडिलांचा आवाज आला
"कामं धामं करायला नको फक्त लाडू खायला हवेत. बापाच्या पैशावर मजा मारा. नुसते खा खा खात राहा."
मी आणि आईने एकमेकांकडे पहिले. माझ्या डोळ्यात खळकन पाणी तरळले. लाडू घेण्यासाठी पुढे केलेला हात मी तसाच मागे घेतला आणि तिथून निघून गेलो. त्यानंतर आयुष्यात कधीही लाडू खाल्ला नाही.
आज बरणीभर लाडू घरी पडलेले असतात. टोकायला वडीलही जवळ नाहीत. पण माझा हात काही त्या बरणीकडे वळत नाही. काही 'चवी' या जिभेपेक्षा आठवणींना असतात हेच खरं .