एखाद्या लघुपटा सारखी कथा डोळ्यांपुढून सरकते....माणिक...जियो...संवादाची भाषा बघा कशी पकडली आहे माणिकने...
सहवेदना – माणिक घारपुरे
पोटात भुकेचा खड्डा पडल्याच्या जाणिवेनेच राजुला जाग आली. अंगावरचं पांघरूण भिरकावुन दिलं त्यानं आणि उठून बसला गोधडीवर. डोळे चोळतांना त्याला आठवले की आईने भल्या पहाटेच उठवलं होतं. म्हणाली,
' मेरेकु पता है तेरेकु भोत भूक लगेली है, कल से कूच नै खाये हो, मई क्या करती पर? कल जो पैसा मिला, उस से मुन्ना की दवाई लेके आई। फिर भी कमीच पड़ा। आजभी लानी पड़ेंगी दवा। मई बताती तेरेकु, बस एक दफा मुन्ना को ठीक होने दे, फिर वो भी जायेगा काम पे। मैंने बात कर रखी है सेठ से, सेठ बोला है वो मुन्ना को होटल में काम दिलाएगा। फिर देखना, मुन्ना तेरे वास्ते कचौड़ी लाएगा, समोसा लाएगा।'
पदार्थांच्या नावाने राजुची भूक आणखी चाळवली. डोळ्यांसमोर ती सुंदर कल्पना उभी राहिली. पण क्षणभरातच तो वास्तवात आला आणि खोपटाच्या भिंतीकडे तोंड करून झोपला राहीला. त्याला आता आई दिसत नव्हती की आजारी मोठा भाऊ. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत समजावत राहिली
'छे -सात महीने की बात है, बस मुन्ना ठीक हो जाए जल्दी। कल जो दवाई लाई हूँ भोत असरदार है। बाकी बची हुई दवा आज लेकेआयेगी। और तेरे वास्ते किरीम बिस्कुट भी। इसलिए तो आज जल्दी जा रैली मई। ज्यादा कचरा उठायेगी तो सेठ ज्यादा पैसा देगा। तू मुन्ना को तंग मत करना हां। '
इतकं सांगून आई निघून गेली आणि त्यानंतर राजुला जी झोप लागली ती आत्ताच जाग आली होती. तीही भुकेच्या जाणिवेने.
उठून तो मुन्नाच्या औषधांजवळ गेला. गोळ्या, बाटली हातात घेऊन बघत राहिला की त्याच्या तोंडाचा घास हिरावून घ्यावा असं काय आहे त्या औषधांमध्ये? पण त्याच्या पाच वर्षाच्या बालबुद्धीला काही समजेना. एकाएकी त्याला खूप राग आला. भुकेचा, औषधांचा, भावाच्या आजारपणाचा.
त्या तिरीमिरीतच तो उठला. खोपटाबाहेर आला. सूर्य खूप वर आला होता. उन्हाने डोळे दिपले त्याचे. तरातरा निघाला नळाकडे. रामण्णाच्या खोपटाशी पोहोचताच कढीलिंबाच्या फोडणीचा वास आणि चुर्रर्रर्र आवाज त्याच्या नाकाकानाने टिपला. जीभ स्रवायला लागली होती. त्याचे पाय नकळतच रेंगाळले. आज त्याच्या पंचेंद्रियांनी कटच केला होता जसा पोटातल्या भुकेच्या डोंबाला साथ देण्याचा. लक्षात येताच दोन्ही हाताने पोट गच्च दाबून धरत तो नळाकडे धावला आणि ओंजळीने भरपूर पाणी प्यायला. पाणी खळ्ळ् आवाज करत रिकाम्या पोटात शिरलं. थोडी हुशारी आल्यासारखं वाटलं. आणि मगच त्याच लक्ष इकडे तिकडे जायला लागलं. नळासमोरच्या निंबाच्या झाडाखाली एक कुत्र्याचं पिल्लू त्याला दिसलं. पिल्लू वाट चुकलं होतं. आईवेगळं झाल्यामुळे भेदरलेलं होतं. राजुला दिवस घालवायचं साधन मिळालं. तो त्या पिल्लाजवळ गेला आणि त्याला जवळ घेतलं, त्याचं खपाटीला गेलेलं पोट बघून म्हणाला,
'तेरेकु भी भूक लगेली है क्या?'
मायेलाही भुकेलं पिल्लू ओढीने बिलगलं त्याला. राजुला ते पिल्लू खूप आत्मीय वाटलं. भुकेच्या नात्यानं जोडलेलं. दोघे खूप छान रमले एकमेकात. त्याला भुकेचा थोडा विसर पडला. तिथेच सापडलेलं डब्याचं झाकण घेऊन ते दोघे खेळायला लागलेत. राजू झाकण फेकायचा आणि पिल्लू त्याला आणून द्यायचं. पण थोड्या वेळाने मात्र त्या झाकणाचा गोल आकार बघून राजुला गेल्या आठवड्यात खोपटातल्या चुलीवर आईने भाजलेली भाकरी आठवायला लागली. तशी बंद केला तो खेळ.
मग तो वस्तीजवळच्या मंदिरात काही साखरफुटाणे, दाणे, खोबरं कुणी ठेवलंय का ते बघायला गेला; पण उन्हाचं कुणीसुद्धा फिरकलं नव्हतं मंदिरात. पारावर खेळणाऱ्या मुलांना बघत तो आणि पिल्लू मंदिराच्या पायरीवरच उदास बसले राहिले. पोटातल्या भुकेने आता मेंदूचाही कब्जा घेतला होता. डोकं रिकामं होतंय की काय असं वाटायला लागलं. पिल्लूही त्याच्या पायाशी निपचत पडून होतं.
होता होता संध्याकाळ झाली. दूरवरून खोपटाकडे येणारी आई दिसत होती. हातात गुलाबी पन्नी होती. इतक्या लांबून त्याला किरीम बिस्कुटचा वास आला. तो आईकडे धावला. पिल्लूही त्याच्या मागे गेलं. पन्नीवर झडप घालून त्याने उत्सुकतेने बघितलं तर त्यात डागदरचा कागज आणि दवाईच होती. त्याने अविश्वासाने आईकडे पाहीले आणि खिन्न होऊन मागे वळला. तेवढ्यात आई म्हणाली,
'अंदर तो आ पैले। देख, आज ईत्ताईच मिला। तू गुस्सा नको कर। खा ले। ' म्हणत तिने त्याच्या हातावर दोन पाव ठेवले. पावांना बघून दोन दिवस दाबून ठेवलेल्या भुकेचा स्फोट झाला पोटात. त्याने घाईने तुकडा मोडला खाण्यासाठी पण हात तोंडाशीच थांबला. राजू पटकन उभा राहीला. आई म्हणाली,
' पैले खा ले बेटा l '
राजू म्हणाला,
' वो है न पिल्लू, उसे भी भोत भूक लगी है, उसकी तो माँ भी गुम हो गयेली है।‘
राजू बाहेर आला आणि हातातला घास पिल्लुला भरवला.
पाच वर्षांचा राजू त्याच्या सहवेदनेशी पूर्ण प्रामाणिक होता.