मी गूढकथेचा मागोवा घेत गेलो..आणि हाताशी लागल ते इतक समृद्ध होत...कथेचा शेवट कसा करावा ह्याचा आदर्श आहे ही कथा...
अंधाराचा बळी – सुचरिता
शे वर्षांचे जुनं, मुरलेलं खेडं होतं. त्यात आणि भुईतुन उगवल्यासारखे वाडे. वडासारखे पसरलेले. त्यात रहाणारी माणसं त्याच भुईत रुतुन बसलेली. कधीकाळची रीत हाडीमाशी मुरलेली. सगळ्या जुन्यापान्या शब्दांवर घट्ट विश्वास. 'बाबजाद्यानी सांगितलंय न? त्यांचे अनुभव खोटे कसे असतील? मग ते म्हणताताहेत म्हणजे हे असंच असणार'.
असाच एक वाडा. बोळाच्या दोन्ही बाजुनी आपलीच घरं. एकच आडनाव.
'त्या ह्यांचं घर कुठाय हो?' असं गावात आलेल्या परक्यानं विचारलं तर खट्ट गावकरी विचारणारच
' हे म्हणजे नक्की कोण? या नावाची वीस तरी घरं आहेत इकडे? तुम्हाला नक्की कुणाचा कोण हवाय ?!'
तर अशी सगळी आपलीच घरं. जुन्या काळी राबता भक्कम. तर हे मोठे पसारे बांधलेले. आता लाल त्रिकोणाच्या काळात घरटी संख्या मुळातच कमी. असतील त्यातली पिल्लं शहराकडे गेलेली. घरोघरी या ओस खोल्या पडलेल्या. कोण जातंय मरायला त्या मागच्या नाहीतर बाजुच्या खोल्यात. वापरातल्या चार रोजच्या रोज लोटायचं तर कंबर उभ्याची आडवी होतेय. शे वर्षांची धुळ, अंधार नि अडगळ घेऊन खोल्याखोल्या नावडतीचे भकास नशीब घेऊन उदास पडलेल्या.
काकुनी दुपारचा घास खाल्ला . आता आडवं होणार तर पलीकडुन चुलत घरातली बारकी पळत आली.
'कशाला ग धावतेस सोने?'
'काकु आजी मी घाबरले न. आई अजुन आली नाही. मला असली तर पोळी द्या. भुक लागलीय.'
'भुकेला घाबरलीस? वेडी कुठली.' ' नै काई..ओसरीवरून आत येताना मला आवाज आला ..'
' कसला?'
'बांगड्यांचा. आणि आज किनई पैंजण पण वाजले. मग मी घाबरले आणि पळत आत आले.'
'अग तुला माहित्येय न? मग कशाला गेलीस बाई त्या बाजुला? किती दिवस झाले. आवाज याय लागलेत.'
' हो न.. पण काकु कसला ग आवाज तो? कोण करतंय? आई म्हणत होती की..'
'काय म्हणत होती? तुझ्या आईला एक लेकरा जवळ काय बोलावं आणि काय नाही याची जराही अक्कल नाही बघ.'
' आईचं जाऊ दे काकु. पण सांग न..'
' हम्म्म.. अग कुठल्या दहा पिढ्यामागे तिथे कुठली सवाष्ण जीव दिली. काय सासु की नवऱ्यासोबत भांडली आणि काचा खाऊन मेली. पुर्वी यायचा फार आवाज तिच्या वावराचा. माझ्या सासुबाई दिवा ,घास ठेवायच्या. मग येईना झाला होता. माझ्याच्याने खंड पडला . आणि हे परत सुरू झालं इतक्यातच. या अमावस्येला ठेवते परत.'
' पण तु तर जातेस की तिथे एरवी पण . तुला भीती नाही वाटंत?'
'अग अडगळीची खोली ती. मी दिवसा दिवा घेऊन जाते कधी तरी. घ्यायचं देवाचं नाव मनात. काही होत नाही बघ. सासुरवाशीण ती. मला सुनेला कशाला त्रासेल? मी आणि ती वेगळ्या का आहोत?'..
' म्हणजे काय?'
'काही नाही. तू जेव गप. आणि लक्षात ठेव. इकडे मी आहे. पलीकडे थोरल्या बाई आणि त्यांच्या लेकी असतात. तुला भ्यायचं काही कारण नाही बघ. फक्त तिकडे बघत जाऊ नकोस म्हणजे झालं . पळा आता!'
' काकु... दारापर्यंत ये की..'
' हत भित्री! चल आले.”
सोनीला घालवुन परत येताना काकुंची नजर त्या दाराकडे गेलीच. नुसते लोटलेले होते. बाहेरचा अडसर कधीचा तुटून गेला होता. संध्याकाळी उंबऱ्यावर दिवा ठेवायचा असं मनाशी घोकत काकु आत वळल्या आणि थबकल्या. कुजबुज ऐकू येतेय का? पण छे. भास असेल. जाऊदे.
संध्याकाळी काकांना हे सांगताना काकुंचा आवाज किंचित कापला. काकांनी खिल्ली उडवली.
'अहो शंभर वर्षापासुन कोण कशाला बांगड्या वाजवत बसेल? फुटून नाही का जायच्या त्या एव्हाना? आणि मला कसे नाही येत ते आवाज?'
'तुमचा कधी विश्वास बसलाय माझ्या बोलण्यावर? उद्या दुपारी जेवायला या घरी आणि पहा. सासूबाईंच्या छळाविषयी सांगितलं तेंव्हा तरी ठेवलात का विश्वास?'
' बाssस, पुsss रे ss. कुठला विषय कुठे... बघतो उद्या.' ....
दुपारच्या रणरणत्या उन्हात गाडीवरून घरी जाण्याचा खरं तर काकांना कंटाळा आला होता. पण आज दुपारी घरी येणार म्हणुन काकुनी डबाचा दिला नव्हता. नाईलाजानी काकांनी गाडी काढली आणि ते घराकडे आले. बोळात वळताना गाडी बंद पडली. कशाला थोडक्या करता म्हणुन त्यांनी गाडी तिथल्याच वाड्याच्या दारात लावली आणि चालत पुढे आले. वाड्याचे दार उघडेच होते.
' ही असावी कुठे तरी आत' .
काका आत येताच थेट त्या खोलीकडे वळले.
' आज बघतोच ते भुत कसे दिसते ते. जन्मापासुन ऐकतोय..'
जवळ येताच त्यांना हलकी किणकिण ऐकू आली. मग फुसफुसता शब्द. त्यांनी खोलीचे दार अलगद आत लोटले. आत स्तब्ध शांतता होती. खोली वापरात नाही म्हणुन विजेचा दिवा लावुनच घेतला नव्हता. बंद खोलीत थिजलेला काळोख होता. सोबत आठवणीने आणलेली बॅटरी काकांनी पेटवली . चारी दिशेने फिरवली. उजव्या कोपऱ्यात कपाटाआड खसखस झाली. पैंजण वाजलं. काकांचा श्वास थांबला.
' खरंच?..'
उसन्या धीराने ते किंचित पुढे सरसावले. मनात आलं
' कुणाला तरी सोबत आणायला हवं होतं का?'
कुलदेवाची आठवण आली. कपाटाजवळ येताच पुन्हा आवाज आला. तिथे मागे काय होतं ते आठवेना. पलंग.. खापरच्या खापर पणजोबांचा पलंग होता तिथे. काकांनी बॅटरी पुढे धरली. जणु काही ती बंदुकच होती आणि सुनेच भुत त्याला घाबरून हात वर करून शरण जात पुढे येणार होतं. आता मात्र खसपस जोरातच ऐकु आली. काकांना कापरं भरलं. त्यांनी धडधडत कपाटाला वळसा घातला . आणि समोरच्या उजेडात त्यांना पुरुष दिसला. काका अवाक झाले.
' ऑ ! बाईने आत्महत्या केली न? मग पुरुषाचे भुत कसे? '
त्यांनी बॅटरीचा झोत वरखाली फिरवुन खात्री पटवुन घेतली. पुरुषच होता. नजर खजील होती. इतक्यात पुन्हा बांगड्या वाजल्या. हालचाल दिसली. काकांनी मागचा अंधार उजळवला. तिथे डोक्यावर पदर घेऊन कुणी बाई पाठमोरी उभी होती. भुतच होती ती. फक्त जिवंत. उजेड जाणवताच ती शरमेने हलकी वळली. बाजारातल्या कापड दुकानदाराची विधवा सुन आणि हा तिचा धाकटा दिर. नुकताच गावाहुन इकडे आला होता.
दुकानदाराचा मुलगा काही महिन्यांपुर्वी अपघाताने गेला. हा लांबचा कुणी घर सावरायला आला होता. काय घडतेय हे कळायला फारसे तर्क करण्याची गरज नव्हती. गावात काय, प्रत्येकाला प्रत्येकाची खबर. दुपारी घर ओस असते. म्हणुन यांनी इथे आसरा शोधला. मान खाली घालुन उभे असलेल्या जोडीकडे ते शांतपणे पहात उभे राहिले.
पदराआडची नजर दयार्द्र होऊन त्यांच्या नजरेला एकदाच भिड़ली आणि पुन्हा खाली वळली. काकानी मागे होत त्यांना जायला जागा दिली. अंग चोरुन बाहेर पडताना ती वाकली. एकदा देहाला शरण गेल्यावर ती कुणकुणापुढे शरणागतच की. पावलाला तिच्या हातांचा स्पर्श होताच काकांचा हात नकळत आशिर्वादाला उंचावला.
'सुखी अस बाई.'
ते दोघेही जाताच काकांनी खोलीतल्या अंधाराला विचारलं,
' काय रे.. किती जणींचा घास घेणार बाबा तू असा?'
बाहेर येऊन त्यांनी दार लोटले. आत जात त्यांनी काकुंना हाक मारली.
' अहो, मी पाहिलं आत जाऊन. भास झाला मलाही. तुमचं बरोबर आहे. या रविवारी शांत करून ते दार बाहेरून बंद करून टाकु.'
काकुंना हायसे वाटलं. आता मोकळेपणानी वावरता येईल.
' पानं घेते. या.'
'आलोच'.
पुन्हा दाराशी येतं त्यांनी मुख्य दार घट्ट बंद करून घेतलं. पुन्हा कुणाला मोह नको. आणि अंधाराला बळी नको.
सुचरिता