कोण म्हणत तरुण समृद्ध लेखन करीत नाहीत...सगळ्या अशा मुखभांडांचे...मुस्काट योगेशची कथा फोडेल...शाब्बास मित्रा...
विरा – योगेश विद्यासागर
मे महिन्याची सुरुवात. विरा बऱ्याच वर्षांनी काकाकडं आलेली. मुळात तिच्यामुळं सगळे एकत्र आलेले.
मक्या (मकरंद) काका असेल, सुरी असेल, म्हणजे सुरेश काका. आबा आणि रंगा तर मिठी मारूनच बसलेले. कित्येक वर्षांनी भेटत होते सगळे. वाड्याच्या चौकात बसलेले. सगळे. काकी मेथीचे फळं करत होती. आणि धाकटी काकू सगळ्यांना वाढत होती. आबा आणि रंगा एकत्र बसलेले, सुजय आणि स्वातीचे नेहमीसारखे भांडणं करत जेवणं चालू, आजीसुद्धा अगदी एखाद्या करवलीसारखी पळत होती, सगळ्यांनी नाही म्हटलं तरी. विरा डोळे भरून पाहत होती. सगळं. अगदी सगळं. हे सगळंच कित्येक वर्षांपूर्वी हरवलेलं पुन्हा एकदा नव्याने प्रत्यक्षात अनुभवता येत होतं.
“अगं विरा पण ही काय पद्धत झाली? सगळ्यांना एकत्र बोलवायची?”, सुरी काका म्हणाला.
“बघा की, सगळ्यांना निरोप पोहोचवला असता तर आले असते की सगळेच.” धाकटी काकू म्हणाली.
विराने फक्त त्या दोघांकडंच बघितलं. शांत झाले ते. सगळ्या मुला मुलीत थोरली ती. आणि तिचं सगळेच ऐकतात. कारण ती म्हणती ते पटतंही सगळ्यांना.
“खरंच बघितलाय का गं? नाही म्हणजे बघितला असेल तर बिनधास्त बोलावून घे. कोणाची काय बिशाद आहे बघतो मी.” आबा म्हणाले.
“अहो नाना असं काय म्हणता? डायरेक्ट घेऊन ये वगैरे?” सुरी काका म्हणाला.
“काय आहे ना चिरंजीव, पोरीने तेवढा विश्वास निर्माण केलाय. आपलं काय आहे तसं?” आबा म्हणाले आणि पुन्हा सुरी काका गप्प. धाकटी काकू आणि सुरीची नजरानजर. आणि धाकटी काकू हळूहळू, आवाज न करता आदळआपट करत होती.
जेवणं आटपली. आबा रंगा आणि विरा, तिघं रानाकडं निघाले. वाड्याच्या चौकातच चंद्र लक्ख झालेला. विरा ने चंद्राकडं बघितलं आणि मग आबांकडं. काही म्हणायच्या आत आबा निघालेले. नेहमीसारखे. तिघंही वाड्याच्या बाहेर पडले. अक्खं गाव झोपलेलं. पण चंद्र काहीकाहींना जागवत होता. त्यातले हे तिघं. मागोमाग श-या पण निघाला. आबांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि तो पुन्हा वाड्याच्या दारात जाऊन बसला. तिघं रानाकडं निघाले.
विराने चौफेर नजर टाकली. एखाद्या चित्रकाराने रंगवावं तसं अगदी. आणि तोच कानात घुंगरांचा आवाज पडला.
“शिवा.” आबा म्हणाले.
“आबा, हा शिवा आहे? चला ना जाऊ त्याच्याकडं.” रंगा म्हणाला.
“आत्ता नको. आत्ताच गोठ्यात बांधला असेल.” आबा म्हणाले.
विराने रंगा कडं पाहिलं. गप्प झाला. तिने आबांकडं पाहिलं. आणि तिघंही वळाले. समोरच शिवा. गोठ्यात. पिळदार शरीराचा. रंगा त्याच्याकडं गेला आणि तोच शिवा चिडला. रंगा बाजूलाच झाला. आबा ओरडले,
“शिवा... घरचा माणूस आहे. असं करतात का ?” त्याच्याजवळ गेले आणि गोंजारत होते त्याला.
“सई, पाणी नाही ठेवलं याला?”
ती कुठं दिसत नव्हती म्हणून आबा तिला शोधायला गेले. ही शिवाची काळजी घेणारी. त्याला काय हवं नको बघणारी. मुळात आबा जे सांगतील त्याच्यासाठी, ते सगळं करणारी. शिवाची नजर विरावर पडली. विरा बराच वेळची त्याला बघत होतीच. ती जवळ गेली आणि तोही तिच्या जवळ आला. खूप वर्षाचं जुनं नातं असलेलं कोणीतरी अनपेक्षितपणे भेटावं तसं काहीसं. ती गोंजारत होती त्याला. तिकडून सई आणि आबा आले. मधूनच सई धावत आली. बावरलेली. आबांनी विचारलं,
“काय झालं?” सई आणि आबा दोघं शिवाच्या डोळ्यात बघत होते. विराला सुद्धा काही कळेना. ती त्यांच्याकडं बघायला लागली, ते शिवाकडं बघतायत. विरासुद्धा बाजूला येऊन पाहायला लागली. शिवाच्या डोळ्यात पाणी होतं.
“आज का असं झालं ?” सई म्हणाली.
आबांना सुद्धा काही लक्षात येईना. शिवाचं पाहून रंगासुद्धा रडायला लागला. विरा शिवाकडं बघतच राहिली. आणि थोडा वेळ गेला आणि बोलायला लागली.
“मी म्हणालेले याला, दरवर्षी येईल. निदान जेव्हा जमेल तेव्हा तरी. मी सारखी याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे. एकदा इकडून आणि मग तिकडून. एवढं हे असं पाहायला मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं. का रे शिवा? काय असा जीव लावला मी तुला? लेकरा... सगळे डोळे पुसायला शोधत होते. बरं झालं लेका, माणूस नाही झालास.”
विरा त्याला मिठीत घेऊन म्हणाली.
विराने शिवाला मोकळं सोडलं. सई आधी काचकूच करत होती. पण आबांनी तिच्याकडं फक्त बघितलं. शिवा जागचा उभाच. हलतच नव्हता. रंगा, विरा आणि आबा निघाले रानाकडं. मागोमाग शिवासुद्धा निघाला. सई सगळं फक्त बघत राहिली. समोर दिसणारा चंद्र, रंगा, विरा, आबा आणि मागोमाग जाणारा शिवा. एक विलक्षण दृश्य. या घराचे सगळे विलक्षण माणसं. सगळे पोहोचले आणि समोर दिसणारं मोठठं रान. एकीकडं गहू.. दुसरीकडं ऊस. चिंच, आंबा, फणस सगळे भलेमोठे झाडं. सगळ्यांवर पडलेला चांद्रप्रकाश. जसे चंद्राने या सगळ्यांना लगडले असावे.
विरा जरा पुढं गेली आणि सगळं नजरेत भरून घेत होती. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. त्या दोन टोकांमध्ये तिचं सगळं आयुष्य तिला दिसून गेलं. मक्या काका, सुरी काका, धाकटी काकू, काकी सगळे समोर नसले तरी समोर भासत होते. किर्रर्र किर्रर्र असा आवाज त्यांच्या तोंडून येतोय असं काहीतरीच तिला जाणवत होतं. आबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि टीव्हीच्या मुंग्या जाव्या तसा आवाज एकदम बंद झाला.
शिवा पुढं जायला लागला. तेवढ्यात पुढं जण तो थांबला. गुर्रर्रर्र करायला लागला. रंगा लगेच पुढं झाला. एक मोठा साप होता. बड्या हिमतीने त्याने तो एकदम सराईतपणे धरला. आणि मागे सोडून दिला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की वाड्यातून मोठमोठे आवाज येतायत. आणि तो लगेच निघाला. वाड्यातून येणारा आवाज, समोर जाताना दिसणारा रंगा, ती मोठी पाऊलवाट, शेजारी उभे असलेले, त्याच्याकडंच बघणारे आबा आणि मागे वर असलेला चंद्र. हे सगळं विराला जाणवत होतं आणि ती हे सगळं साठवत होती. रंगा पोहोचला आणि दोघांची नजरानजर झाली. शिवा फिरत होता मनसोक्त. पण नासधूस नव्हता करत कसलीच. माणसं करत असतात तशी. आत्ता करतायत तशी. वाड्यात.
रंगा नजरेआड झाला, आबा आणि विरा दोघांची नजर वळाली.
"आबा..."
"अं? काय गं बाळ?"
"यांना काहीच का बोलत नाहीत तुम्ही? तुमच्या अबोल असण्याचा गैरफायदा घेतायत सगळेच !"
"काय बोलू सांग? सगळे माझेच लेकरं आहेत."
"पण हिच लेकरं उरावर बसतायत आबा. आणि ते तुम्हालासुद्धा लक्षात आलेलंय तरी तुम्ही का गप्पा आहेत ?"
"आत्ताच बघ. तू बोलावलं कशाला आणि यांचं काय सुरु झालंय !"
"मला तुम्ही म्हणालात ना तर एकेकाच्या मुस्काटात देईल. सांगा फक्त तुम्ही."
"त्यानी काय होईल ?"
"माझ्या जीवाला तरी शांतता मिळेल."
"तसं होणार असेल तर बिनधास्त मार."
"आबा?"
"अगं हो... खरंच !"
"...." काहीतरी चुकल्यासारखं वाटून गप्प बसते.
"रमा म्हणालेली मला, आबा किती काही होऊ द्या. पण हे घर वेगळं होऊ देऊ नका. जसं बाकीच्यांचं होतं तसं आपलं नका होऊ देऊ !"
"हे तर बाबा मला म्हणलेले."
"हां...पण तुझ्या बाबाला सुद्धा तुझी आईच म्हणालेली."
विराचे डोळे भरून येतात. आबा तिच्याजवळ जातात. चिंचेच्या झाडाखाली तिला बसवतात. कोपरीमधून पंचा काढून देतात. आणि तिला आणखी रडू फुटतं.
" घे रडून मोकळं." आबा म्हणतात. तिकडून शिवा येतो. आणि दोघांच्या शेजारी बसतो.
" हे बघ बाळ, तुझे आई बाबा काय आणि हे बाकी सगळे काय, सगळे माझ्यासाठी लेकरंच. हां... पण तुझे आई बाबा यांच्यात नाही मोडत. हेच तर त्यांचं मोठेपण आहे. आणि हेच या बाकीच्यांना पचत नाही. मुळात त्यांना पचवायचं नाहीये. बांधून राहायचं नाहीये कोणालाच. ज्याला त्याला आपापलं पाहिजेय. म्हणजे पुन्हा हे बांधलेपण नको आणि पुन्हा कोणाची थोबाडं पाहायला नको. दुसरं काय ? बरोबर म्हणालीस मघाशी तू, शिवाला, बरं झालं लेकरा माणूस नाही झाला. नाहीतर शिवाने तर काय काय मागितलं असतं ? हसूच येतं मला तर." मोठा सुस्कारा सोडतात आबा. तिकडून वाड्यातला आवाज बंद झालेला. आणि वाटेत रंगाची आकृती येताना दिसत होती. त्याच्या पावलांचे आवाज विराचं त्या आवाजामागं श्वास घेणं सोडणं, आबांचं तिच्या डोक्यावर थापटणं आणि शिवाचं मध्ये मध्ये शेपटी हलवणं, एक वेगळं समीकरणच.
रंगा आला आणि सोबत श-या पण आला. दोघंही बसले. बराचवेळ शांतता होती. वर्षानुवर्षे खंबीरपणे उभी असलेली चिंच. त्याखाली हे सगळे, आबा, त्यांच्या मांडीवर विरा, बाजूला शिवा, त्याची शेपटी हलवत, इकडं रंगा, वरती सगळं बघण्यात मग्न आणि शऱ्या ल्याही ल्याही करत बसलेला. आणि या सगळ्यांसमोर चंद्र. मघाशी माथ्यावर होता. पण आता अगदी समोरासमोर आलेला.
"आबा.." विरा.
" हं बोला.." आबा.
" का वागतात असं माणसं ?" विरा.
" प्रत्येकजण स्वार्थी असतो बाळा. माणूस आहे शेवटी." आबा.
" पण साध्य काय होतं यातून ?" विरा.
" तू काय म्हणून ठरवलेलं आणि काय झालं? तुझा पण काहीतरी स्वार्थच होता ना? काय झालं त्याचं?" आबा म्हणाले आणि विरा जरा शांत झाली.
"ढवळलेलं पाणी स्थिर व्हावं असा आपण प्रयत्न करतो. का तर जी काही धूळ माती आहे ती खाली तळाला जाईल आणि स्वच्छ पाणी प्यायला मिळेल. पण आपलाच तो गैरसमज असतो. ते पाणीच स्वच्छ नसतं. आपण हे लक्षात घेत नाही की ती माती जरी तळाला गेली असली तरी त्या पाण्यातच आहे ती. तसंच आपलं सगळ्यांचं आहे. काहीतरी हातात यावं, जे आपलं आहे ते मिळावं याच्यासाठी सगळा अट्टाहास चालूच असतो. पण ते आलं तरी आपलं समाधान होत नसतं कधीच. मी कितीही म्हटलं यांनी सगळ्यांनी चांगलं वागावं तरी ते नाही शक्य. जेवढे चांगले गुण असतात तेवढेच वाईटही असतातच की. आपल्याला ते लक्षात येत नाहीत. यांना जे पाहिजे ते दिलं तर होऊन होऊन काय होईल ? सगळे आनंदी होतील आणि पुन्हा आपापल्या ठिकाणाला जातीलच. जायचंच आहे प्रत्येकाला. पण मग पुढं काय ? ओढ जी आहे ती पूर्णपणे संपूनच जाईल. आणि जे स्थैर्य यावं याची आपण वाट पाहत असतो, ते आलं, असा प्रत्येकाला भास होईल. एवढंच. दुसरं काही नाही. माझ्या तरुणपणात पुण्यात गेलो काय आणि काय त्या स्थैर्याची वाट शोधात होतो. ते मिळालं नाहीच. नसतंच मिळत ते. पण रमा भेटली. आयुष्यातली खूप मोठी भेट. माझ्याच मुलानी दिली. तुझी आई. आणि मग पुन्हा रत्नागिरी. आपण सगळेच स्थैर्य शोधात असतो. पण ते नसतं अगं. स्थैर्य आलं तर माणसाचं माणूसपण संपणार. तो का जगेल ? जोपर्यंत अस्थिर आहे, तो या स्थैर्य नावाच्या मृगजळाकडे पळत असतो. पण त्याला हे माहीतच नसतं की ते मृगजळ आहे. स्थैर्य नावाचं मृगजळ आणि त्यामागं पळणारा माणूस हेच तर माणसाच्या आयुष्याचं द्योतक आहे. स्थैर्य शोधणं, हेच तर माणसाचं माणूसपण जिवंत असल्याचं मूळ लक्षण आहे. जे आत्ता हे सगळे करतायत. ते तेच आहे. अस्थिर आहेत ते सगळे. स्थैर्य आलं की संपला माणूस.
माणसाचं माणूसपणसुद्धा!