विनया...तू "लिहिते" आहेस...आणि ते लिखाण रसरशीत आहे ह्यात जरा सुद्धा शंका बाळगू नकोस...ह्याच पथावर चालत रहा...लाईक आणि कोमेंटस पर्वा न करता.
पुरुषच – विनया पिंपळे
एss हॅलो ss ओळखलं??"
"विसरेन कशी? विसरू शकेन?"
"अजूनही प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच देतेस?.. जशीच्या तश्शी आहेस अगदी. "
"तू तरी कुठे बदललायस??…. ज्याचं.उत्तर माहीत आहे तोच प्रश्न विचारण्याची तुझी सवय जुनी नाही का?"
"बरं बाई ..तुझ्याशी नाही जिंकू शकत मी बोलण्यात... असो. कशी आहेस बोल?"
"मी नं??… अगदी मजेत!! आनंदात आहे."
"....………"
"का? …… काय झालं?…मी आनंदात आहे म्हटल्यावर चेहरा बदलला तुझा. मी खूश आहे हे पाहून तुला आनंद नाही झाला?"
"ओह ... सॉरी सॉरी .... झाला ना. आनंद झालाच. पण मला अचानक आपली ती शेवटची भेट आठवली.
छ्या!! काय येडे असतो आपण नाही का? एकमेकांशिवाय जगताच येणार नाही असे वाटते आपल्याला. निदान जगलो तरी सुखात राहता येणार नाही असे तरी वाटते. काय सॉलिड रडत होतीस तू त्या शेवटच्या भेटीत!... आणि आज.... असो..झालं गेलं पार पडलं..."
"एक सांगू?…… "
"हं... बोल..."
"तू नं खोटारडा आहेस...एक नंबर दुटप्पी!! भेकड सुद्धा.……आणि मी मूर्ख"
" ?????"
"तुला शेवटची भेट आठवते ना? मग हेही आठवत असेन की मी जात, पात, धर्म, समाज, लाज-लज्जा, स्वतःचे मायबाप कश्शाकश्शाचा विचार न करता निघून आले होते. इतका जबरदस्त विश्वास होता मला माझ्या प्रेमावर !!... आणि तू??.... मला व्यवहाराच्या चार गोष्टी सांगितल्या. कमवत नव्हतास. मला घेऊन स्वतंत्र राहू शकत नव्हतास...तुला मला खूश ठेवायचं होतं आणि हाताला काम नसल्याने, स्वतःच्या पायावर उभा नसल्याने तू ते करू शकणार नाहीस असंही सांगितलंस. माझ्या मनाविरुद्ध असूनही मला ते पटलं. पटलं कारण की तू माझ्यावर प्रेम करतोस हा विश्वास होता मला..."
"करतच होतो गं...."
"अं...हं.... तू फक्त टाईमपास करत होतास. प्रेम केलं असतंस तर 'लग्न करून घे' असं म्हणालाच नसतास. प्रेम केलं असतंस तर मी खूश नाहीय हे ओळखलं असतंस. प्रेम केलं असतंस तर आजही मी 'आनंदात आहे' हे उत्तर तुला खरं वाटून तुझा चेहरा उतरला नसता. मला आजही तुझी खूप आठवण येते असं मी म्हणाले असते तर निश्चितच तू आतून सुखावला असता...तू दिसताक्षणी या डोळ्यात पाणी आलं असतं ना तर सुखावला असतास तू..."
"………"
"... आणि मी मूर्ख होते. इतके दिवस तुझी आठवण जवळ बाळगून होते...पण आता नाही. विश्वास ठेव... मी मुळीच आनंदात नव्हते. नाहीय. दुःख आहेतच. दुःखाची कारणेही भरपूर आहेत...पण इथून पुढे तुझं दुःख मात्र बाळगणार नाही. मी मिळवेन माझं सुख... तू भेटलास हे एक बरंच झालं.... एका दुःखातून सुटलेय कायमची...."