अफलातून हा एकच शब्द लागू...क्या बात है! संजन मोरे - सलाम
किक-संजन मोरे
रविवार गाठून उशीरापर्यंत आळसावून पडलेले साहेब उठले. बायका पोरांच्या आंघोळी कधीच आटोपल्या होत्या. सकाळच्या नाश्त्यासाठी तळत असलेल्या आम्लेटचा सुगंध नाकात शिरला. खुष होवून साहेब उठले. प्रातर्विधी, दाढी स्नान उरकलं. मनपसंद सुगंधी स्प्रे शरीरभर फवारला. नुकतीच दाढी आंघोळ आटोपल्या मुळे काळा चेहरा आता, तजेलदार, तुकतुकीत दिसत होता. सफाचट केलेल्या मिशांमुळे चेहर्याआवर रूबाबदारपणा आला होता. काळ्या वर्णाचे क्षणभर त्यांना वैषम्य वाटले. आपल्याला हा कलर बहाल करणाऱ्या बापाबद्दलची चीड त्यांच्या डोळ्यात तरळू लागली.
नशीब पोरगं, पोरगी रंगाच्या बाबतीत आपल्यावर गेली नाहीत. यांच्या काळ्या वर्णामुळे लग्नवयात गोर्याग पोरी पाहायला मिळत नव्हत्या. यांना हळदी वर्णाचीच पोरगी हवी होती. शिक्षण होतं. बॅंकेत नोकरी लागल्यावर यांच्याकडे पोरींच्या बापांची रीघ लागू लागली. पिवळ्या धम्मक रंगाची नवरी यांना मिळाली. शिक्षण बेताचंच होतं, पण व्यवहार ज्ञानात तयार असल्यामुळे, शहरात राहून तिने यांच्या संसाराचा मळा चांगला फुलवला. वेलीला दोन टप्पोरी फुलं लागली. शहरात बंगला, चौकोनी कुटूंब. राजा राणी चा संसार. सगळ्या भौतिक सुविधा. तेला तूपातलं खाणं या मुळे यांच्या कुटूंबातले चारही सदस्य चांगलेच गरगरीत तजेलदार झाले. शहरातलं खावून, शहरात राहूनही चांगलेच टवटवीत गच्च राहीले …..
गावाकडे म्हातारे आई वडिल. हा एकुलता एक. नोकरीच्या व्यापामुळे, मुलांच्या शिक्षणामुळे शहरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. बंगल्याचं कर्ज, मुलाबाळांचं शिक्षण. शहरातला प्रपंच, वाढती महागाई. येवढ्यातून सुद्धा त्यांनी आई वडिलांना वाऱ्यावर सोडले नाही. वडिलोपार्जित शेती आहे, मी मन दाखवत नाही. तुमचं तूम्ही पिकवा खा. मला काही देवू नका. तूम्ही माझ्यासाठी, शेतात राबून मला लहानाचं मोठं केलं. हाडाची काडं करून माझं शिक्षण केलं. नोकरीसाठी जमीनीचं एक चांगलं टूकडं विकलं. याची जाण आहे मला. दरमहिन्याला न चूकता हजार, दोन हजार पाठवत जाईन. सणावाराला कपडालत्ता करीन. आजारपणात कधीपण सांगा. जमेल तेवढे करत जाईन. इतर पोरांच्या सारखा कृतघ्न होणारा मी नाही ……
सध्या जरा तारांबळ आहे. खर्च वाढलाय, महागाई वाढलीय. पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हणजे फीचा विचार करून कसे चालेल? मुलांनी वरिष्ठ अधिकारी झाले पाहिजे. खरोखरचे साहेब झाले पाहिजे. मी कुठला साहेब? बॅंकेत नोकरी करणारा साधा क्लर्क. गावाकडे सगळे साहेब म्हणतात. पण इथं कोण विचारतो. अजून स्कुटरच वापरतोय. चार चाकी घेतल्याशिवाय जमणारंच नाही आता. मेहुण्याला जमीन घेवून दिलीय त्याचा बोजा पडलाय, हिच्या आई वडीलांचं पण दुखलंखुपलं बघावं लागतंय. त्यांना तरी कोण आहे? मेहुणीच्या लग्नात मदत केली. त्यामुळे गाडीचं नियोजन जमलं नाही. आई बापांना पण पैसे पाठवता आले नाहीत. बरेच दिवस चक्कर पण मारली नाही. मोकळ्या हाताने कसे जाणार ना? तरी येताना मात्र, म्हाताराम्हातारी पिशवीत मावणार नाही येवढं काही बाही रानातलं खायचं देतात. बायकोला ते आवडतं. पण सहकुटूंब जाणं होत नाही. पोरांना उन्हाळा सहन होत नाही. बायकोला खेडवळ वातावरणात “कंफर्टेबल “वाटत नाही. दिवाळीत मुलांचे क्लासेस गावाकडे येवू देत नाहीत. मग अशीच सवड काढून, एखादी चक्कर गावाकडे मारायची. आता गावाकडे मुक्काम करणे पण जीवावर येते. दुपारचं जेवन आटोपून चार वाजताच माघारी फिरावं लागतं ….
“आहो ...नाष्टा करून घ्या ..अन मटन आणून द्या ..आज चांगला बिर्याणीचा बेत करते“
बायकोच्या आवाजाने साहेब विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. नाश्ता करून स्कुटरवर बाहेर पडले. ….दिवस भराच्या “बेता“चे नियोजन मनात घोळवत.
मस्त रसरशीत, गुलाबीसर, पांढऱ्या चरबीचे दोन किलो मटन घेतले. हा मटन वाला चांगलं मटन देतो. बोकडंपण चांगली तयार असतात. सोनं जोखल्यासारखे मटन जोखत नाही. झुकतं माप असतं. हवा तो पार्ट काढून देतो. आतडी पोतडी, बिन रसाची वजनदार हाडकं, आसलं काही टाकत नाही. त्यामुळे बायको पण स्वयंपाक मन लावून करते. शहरात चांगलं मटन मिळणे तसे अवघडच. शेळ्या कापतील, सोड्याचे पाणी मारतील, टोपात काढून ठेवलेले मांसाचे तुकडे मिक्स करतील. पण हा गॅरेंटीवाला. थोडे पैसे जास्त घेतो. पण मटन एकदम चोख. मटन घेतलं, मंडई केली, लांबसडक कळीदार बासमती तांदूळ घेतला. घरी येवून सगळं बायकोच्या हवाली केलं.
गुलाबांच्या फुलात मोगर्याच्या कळ्या मिसळाव्यात तसं परातीत ओतलेलं मटन दिसत होतं. बिर्याणीसाठी, गुलाबी मांसाचे तुकडे “मॅडम “ने बाजूला काढले. मग चरबीचे पांढरे तुकडे वेगळे केले. मटनाला फोडणी देताना मॅडम तेल वापरत नाहीत. चरबीच्या तुकड्यांना चांगले चरचरीत तापवून, तेल सुटल्यावर मग कांदा लसूण, कढीपत्ता टाकून फोडणी देतात. बिर्याणी साठी मात्र गावरान तूपच वापरतात …. “मी जावून येतो गं ….तुझं होईपर्यंत !“ बायकोला सांगून, कपाटातल्या नोटा खिशात टाकून, आरशात भांग पाडून साहेब पुन्हा बाहेर पडले.
बारा वाजत आले म्हणजे, काळोखे, सबनीस येवून बसले असतील. कदाचित त्यांची सुरूवात ही झाली असेल. साले वाट पण बघत नाहीत थोडी. “सृष्टी“ बारच्या पार्किंग मध्ये स्कुटर लावली. नेहमीच्या टेबलावर हे होतेच. सबनीसची बिअर अर्धी झाली होती. काळोखेचा “स्कॉच“ चा एक पेग झाला होता. पापड, सोडा, बिसलरी, वेफर्स, काजू, शेंगदाणे असा सगळा सरंजाम टेबलवर तयार होता.
“ये..ये...खेमनर ये...तू साल्या नेहमी उशीर करतो. बायकोचा पदर सुटत नाही का रे तुला?“ काळोखे असे बोलल्यावर हा कसनूसा हसला.
“काळोख्या...खेमनर वहीनी कुठे साडी वापरतात रे?...ड्रेस असतो घरी असल्यावर ..“
सबनीसने पण फिरकी घेतली.
“ये साल्यांनो..मला आगोदर पीऊ द्या...मग बघतो, तूमच्याकडे..वेटरने नेहमीचा ब्रॅंड आणून दिल्यावर खेमनर साहेबांनी एका दमात एक मोठा दीर्घ घोट घेतला आणि मग यांच्या लेव्हलला आल्यावर सावकाश, संथ गतीने तब्बेतीत पीऊ लागला ……….
……..
कापडी पिशवी सायकलला अडकवून म्हाताऱ्याने सायकलवर टांग टाकली. म्हातारीने वाटून घाटून मसाला कधीच तयार करून ठेवला होता. आज म्हातारीला मटन खावंसं वाटलं होतं सकाळपासूनच तिची भूणभूण चालू होती. म्हाताऱ्याच्या डोक्यात अर्धा किलो ब्रॉयलर चिकन घ्यायचं होतं. ते परवडतं. पण म्हातारीचा हट्ट!!
कुई..कुई...सायकल वाजवत म्हातारा स्टॅंडवर आला. हजरतच्या दुकानावर गर्दी उसळलेली. जो तो लवकर मटन घेवून घरी देण्याच्या विचारात. त्या मुळे सगळ्यांचीच गडबड. सगळी गिर्हाइके होईपर्यंत म्हातारा थांबला. मग हळूच पुढे सरकला.
“हज्जूभाई...अर्धा किलो मटन दे बाबा...म्हातारीला लयीच तलफ झालीय“ म्हातारा……...
“म्हाताऱ्या...अर्धा किलो नं काय व्हणार रं….किलो भर घे की, चांगला पालवा हाय..“ हजरत.
“न्हाय बाबा...पैसा न्हाय तेवढा, अर्धा किलोच दे“
म्हातारयाने असे म्हणल्यावर हजरतने शेलका शेलका माल वजन करून तोडून दिला. शंभराच्या दोन नोटा देवून मटनाची कॅरीबॅग पिशवीत टाकून, कुइ...कुइ...सायकल वाजवत म्हातारा घराकडे निघाला. घरी आला, पिशवी म्हातारीच्या हवाली केली. म्हातारीने भाकरी संपवत आणल्या होत्या. ढणढणत्या चूलीपुढच्या ओढलेल्या रसरशीत इंगळावर भाकरी खरपूस भाजत होती. टम्म फुगत होती..म्हातारीने मटनाची लगबग चालू केली.
“आवं….माझा सैप्पाक होईस्तवर...तुमी या की जावून… “
म्हातारी म्हणाली. तसा म्हाताऱ्याचा हात बंडीतल्या खिशाकडे गेला. होतं नव्हतं ते दोनशे रूपये हजरत ला दिले होते. पाच दहा रूपायाची चिल्लर शिल्लक होती.
“नको जाव दे….मला पण न्हाई सोसत आता...तुझं होवू दे निवांत … “ म्हातारा केविलवाणा हसन्याचा प्रयत्न करत म्हणाला, पण त्यात त्याचा चेहरा अणखीनंच केविलवाणा दिसू लागला.
“काय सांगू नका“
म्हणत म्हातारी उठली. पीठाच्या हातानंच तिने फडताळात ठेवलेली पन्नासाची नोट म्हाताऱ्याच्या हातात दिली.
“मंगळवारी, अंडी विकली होती. त्याचं आलतं पैसं...जावा तूम्ही..या जावून..न्हायतर असं करा, बाटली घेवून घरीच या..मी आळणी काढून ठेवते.“
असे म्हणत तिने म्हातार्याला घराबाहेर हाकलला.
“तूझं पण काहीतरीच असतंय बघ“...असे म्हणत म्हातारा कुई ...कुई ...सायकल वाजवत अड्ड्याच्या दिशेने निघाला. चाळीस रूपायाची संतरा घेवून, दहा रूपये म्हातारीला परत आणून द्यायचं. असा विचार करत म्हातारा पाय मारत होता ….
इकडे, साहेब आपल्या जोडीदारांना घेवून धुंदावला होता. साडेचार हजाराचं बिल आपल्या नावावर फाडून घराकडे जाण्यासाठी स्कुटरला किक मारत होता. चालू होत नाही म्हणून स्कुटर एका अंगावर वाकडी करत होता.
चांगलीच किक बसली होती त्याला ……