काय बोलाव उम्याच्या लेखणी बद्दल...तिच्यातली विविधता आणि भावना टिपण्याचे तिचे सामर्थ्य विलक्षण आहे...आणि ते सुद्धा कमी शब्दात!
कर्ली – उम्या कांबळे
संध्याकाळचा मच्छीबाजार भरलेला....गळाभर दागीने घालुन चंद्रा कोळीन बसलेली...समोर पापलेट सुरमय सरंगा कोळंबीची रास पडलेली...गिर्हायकांनी केलेली गर्दी ...चंद्रा एक नंबर फेमस अजिबात बनवाबनवी नाय ...खराब मासा नाय विकला कधी गिर्हायकाला ..सुरमय सरंगा कापायला चंद्राच्या दोन पोरी आजुबाजुला बसुन ...
ये हात चालव लवकर ....
ऐवढ्यात एक बारीक आवाज आला ...
मांदेली वाटा कसा दिला चंद्रा ..
चंद्रान दचकुन वर बघीतल रोजचा परीचीत आवाज ...पवार मास्तर ....संध्याकाळचा बाजार चुकला नाय कधी मास्तरांचा ...रिटार्यड होवुन दहा वरिस झाली ...
बाबा आवो कुठ होता ऐवढे दिवस ....आलात नाय ते ...तुमची रोजची फेरी चुकायची नाय कदी .....मास खायच बंद केलव का काय ????? नाय ग मासे खाणारीच गेली ..चार महिने झाले ...आता मी ऐकटाच ....ऐकट्याला कशाला हवेत मासे .....काल सुन नातवंड पोरगा आलाय ...,त्यांच्याकरता नेतोय ....
मग कुट असतो पोरगा ...
मुंबईत ..तीथच लग्न केलन ...परजातीची म्हणुन पटल नाय कधी आमच्या हिच सुनेबरोबर ....घरात यायच नाही म्हणुन सांगीतलन...आली नाय हो बिचारी...ही गेली तेंव्हाच आली .... पण चांगली आहे पोरगी ...सकाळी माशे आणतो तर म्हणाली ...चालत जावु नका,.शेजारच्यांची स्कुटी घेतलन आणि मला सोडलन हिथे ....ती बाकी मसाला आणि सामान घेतेय ...बर मांदेली दे दोन वाटे ..
अवो पण बाबा आज कर्ली नको काय??? कर्लीशिवाय कधी गेलाय काय ???
नको ग ...नातवाला मांदेली आवडतात .... .
पाठुन आवाज आला ...पवार मास्तरांनी चमकुन बघीतल ....पाठीमागे सुन उभी .....
बाबा आमच्याकरता स्वताची आवड मारायची नाही ...तुम्ही नातवाला मांदेली घ्या ....मी तुम्हाला कर्ली .घेते ......चला ...फिट्टंफाट ...
खळखळुन हसत ...कर्ली मांदेलीची पिशवी घेवुन सुन निघुन गेली ....तिच्या पाठमोर्या सावलीकडे बघत पवार मास्तर बोलले .,..
चंद्रा जातीवरुन माणस पारखण चुक नाय ग?? आमच्या हिला कळलच नाय कधी .... , पवार मास्तर नव्या उमेदीन पावल टाकत निघाले ,...
आणि चंद्राचे डोळे पाणावले ....कुणाचतरी सुख ....डोळ्यात पाणी आणायला पुरेस ठरत ...