उम्या कांबळे तुसी ग्रेट हो.....काय कथा लिहिली आहेस!
तिन्हीसांजा-उम्या कांबळे
बाबा मला यायला जमणार नाही...अहो मुलांची परीक्षा आहे .कामाचा लोड आहे .. एवढा प्रवास..आणि येऊन परत ती बरी झाली मागल्या वेळेसारखी तर..
अरे पण ..डॉक्टरने सांगितलं ..थोडेच दिवस शिल्लक आहेत आता तिचे .शेवटची बघून तर जा .....
तरीपण मला यायला जमणार नाही बाबा ....कळत कसं नाही?
मला कळतंय रे राघव...पण तुझ्या आईला कळत नाही....मी काय करू?
समजावा तिला... उगाचच हट्ट करते ती!
.......................................
अहो ... अहो कुठे आहेत तुम्ही? काय म्हटला राघव??
अं.....अग....अग निघतोय तो मिळेल ती फ्लाईट पकडून ...
वाटलंच मला...खुप हट्टी आहे तो....
हो तुझ्यासारखाच .....
अहो जरा माझं एक ऐकता....खिडकी उघडा ना....आणि मला जरा उठवून बसवा....
कशाला? बाहेर किती गारवा आहे ढग पण भरून आलेत ..पाऊस पडेलसा वाटतो....मालती तू शांतपणे पड बघू...
रामभाऊ आज बार वाटतंय जरा ....
अग रामभाऊ काय ????
मला आवडत हो लोक तुम्हाला रामभाउ म्हणतात ते. आवडायचं मला मी मनात नेहमी रामभाऊच म्हणायचे ...आज पटकन नाव आलं .. ...
अहो तिन्हीसांजा झाल्यात देवापुढे बत्ती तरी लावा...हो ...
रामभाऊ नि कापऱ्या हाताने दिवा लावला.....
काय मागितलंत देवाकडे..???
खरं सांगू? ...तुला उदंड आयुष्य दे म्हणालो ....का ग अशी हसलीस ....???
नाही सहजच ...जरा फोनो लावताय? आणि मीरेचं भजन लावा ... आज खूप आठवण येतेय ...राघवाची....
रामभाऊंनी फोनो लावला ...मीरा आर्त स्वरांनी कृष्णाची विनवणी करू लागली ....रामभाऊंनी खिडकी उघडली ... समोरून काळ्या ढगांचा लोंढा चालून येत होता गडगडाट करून ... सोबत विजांचा लक्ख प्रकाश ..दोन्ही हात गजांना पकडून रामभाऊ उभे ...होते ...एक मोठी वाऱ्याची झुळूक घरात घुसली ...सोबत वीजही कडकडून गेली ...
रामभाऊनी..क्षणात वळून मालतीकडे पाहिलं....आणि समोर क्षितिजाकडे पाहत तसेच उभे राहिले ......आता पावसानेही स्पर्धा सुरु केली ..अश्रूंशी ...आणि दोघेही बरसत राहिले ...कोण जाणे किती वेळ ....
तिन्हीसांजेचा देवापुढचा दिवा केंव्हाच विजून गेला होता .......