Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

देव माणूस-Suchita Ghorpade

$
0
0

सुचीताला ग्रामीण जीवनाचा ठाव लागला आहे...ह्याची जाणीव मला अलीकडे होऊ लागली आहे..जीवन आणि भाषा दोन्ही!

देव माणूस – सुचिता घोरपडे

तिला ठावं व्हत आता इतला आपला वाटा सपला.मामानं मामीपुढ हार मानली.हिची बिजवरासंग सोयरीक जोडली.तसं बी काय बाकी असं ठेवलच नव्हत मामीनं.एक डावं हिरीत जीव बी दयायचा इचार तिच्या मनात आला.पर सशाच काळीज तिचं फट वाजलं तरी भेदरणारं.नशीबाचा फेरा म्हणूनश्यान मामीच्या कचाटयात गावली.आता उदया बैठक व्हती.हिचा म्हंजी डोळ्याला डोळा लागना.कूस बदलत रायली.

मध्यानाच काय झालं काय ठावं..?एक आवंढा गिळला अन कानात वार शिरावं तसं उठली.मुंगी बी मरणार नाय अश्या चोरपावलानं बाहीर आली.मामीच्या घोरण्याचा साद बी तिला भ्या घालत व्हता.मामा वागाच्या पिज-यात अडकल्यासारखा अंगाच मुटकुळ करून झोपला व्हता.फकस्त एक डाव त्याच्याकड पायलं अन परत माग न बगता पळत सुटली.येस वलांडली तवा कुट दम घेतला.घशाला कोरड पडली व्हती.नेभाळल्यागत व्हून बी परत धावत सुटली.

आभाळबी पुनवगत लक्क पांढर शुभ्र व्हत.दिवसा वाट गावनार नाय पर आज वाटबी तिला आपणहून वाकडी वळण सोडून सरळ झाली व्हती.दावं सुटलेल्या पाडसागत फकस्त रस्ता तुडवत चालली व्हती.कुट,कुनीकडं नाय ठावं.अन अचानक थबकली.पाठनं कोनतरी येत व्हत.एवढा येळ चालून पाय भेंडाळलं व्हत.मनात पाल चुकचुकली अन पाय मोडल्यागत धप्पशिरी खाली कोसळली.नजरच्या कप्प्यात लकाकलं अन समोर टनकण उडी घेत खंडया आला.

क्वारभर तुकडयातला एका घासाला खंडया जागला व्हता. तिच्या पायाला लाळघोट घालत खंडया पाय चाटू लागला.आता जरा तिच्या जीवात जीव आला.आता नखालाबी धक्का लागायची भ्या नव्हती तिला.खंडया फाडून कोतळा बाहीर काढीलं ह्यो इश्वास व्हता.किती तरी मैल चालतच व्हती.गावं वलांडली,गैबीचा डोंगर बी माग पडला.मातीच्या फुफाटानं पाय भरलं व्हत.आता त्या धूळभरल्या पायानबी जवाब दिला,तवा कुट एका झाडाखाली जरा बसली.डोळ सताड उघड.झोप, सपान समद काय जसं हरवल व्हत.डोक्यात घण बसल्यासारख व्हत होत.इचार करत शेवटी डोळ्याची झापडच खाली आली थकून.पर डोस्क्यात इचार चालूच व्हत.तांबड फुटत व्हत.अन तेवडयात खंडया गुरगुरला.

ती उठली.खंडयानबी कान टवकारलं.तर फुटाच्या अतरावर एक धिप्पाड देखणा तरणाबांड गडी डोईवरल्या फेटयाच्या शेमल्याला कुरवाळत तिच्याकडं बगत उभा व्हता.जरा हे ध्यान तेला एपरीतच वाटलं.घसा खाकरल्यागत करून तेन खंडयाला चुचकारलं,तसा खंडया शेपटीचा गोंडा हलवत तेच्या जवळ गेला.त्यानबी खंडयाला कानाला कुरवाळलं.परत खाकरल्यागत करून तेन इचारलं कोनच्या गावचं पावन तुमी.

तिचं काळीज धडाडललं.तरीबी धीटपनं म्हणली,नवं हाय गावात.पाय जरा आत वडूनच तिनं खंडयाला जवळ बोलाविलं.

अशी एकटी आडवळणी गावात,अन ह्या सुमसान वनात ही कुटनं आली हाय हे कोड काय तेला थंड बसू देना.तेचा पाय बी तिथनं निगना.परत तेन काळजीन इचारपूस केली.तसबी आता पतूर तेला बगून एवड तर पक्क झाल व्हत की ह्यो कोन तरी भला माणूस दिसत्योय.म्हणूनश्यान कदी कोनामोर त्वांड न उघडणारी ती जणू काय आपला वालीच ह्यो अशा नजरनं तेला बगत समद कथन केलं.तसं तेलाबी जरा शंका व्हती. पर आता पुढ काय करणार हे इचारल्यावर ती गपच उभी रायली.तवा तेनच म्हटलं,जवर तुमची सोय व्हत नाय तवर तुमची हरकत नसल तर ऱ्हावा माझ्या शेतात.मस्त मोठ घर हाय.हां...पर माझ्या माघारी कोन नाय मला.तवा इचार करा मगच ठरवा.

जरा येळ इचार करून ती उठली अन म्हणली हिरीत जीव देण्यापरीस चाकरी करून पोट भरीन.दिस जात व्हत.तेच्या घरची सगळी काम करून चार घास खात खंडया नी ती जगायेगळ पर एक पाक नात जगत व्हती.पर समदया गावात गोमगाला झाला व्हता.त्यान शेतावर बाय ठेवली म्हणून.पर तेला जाब एचारायचा धाक कुणाच्यात नवता.एक रोज त्यो बाहीर गेलेलं बगून चार टवाळ टाळकी वास घेत बांधावर आली.नेमका खंडयाबी नव्हता जवळ.त्यासनी असं एकदम अवचित बगून ती बिथरली.तशी ती पोर जास्तच चेव चढल्यागत जवळ आली.

तवर कुटनं पत्ता नाय ते त्यो आला,चांगल दंडुक उचललं नी घातलं पेकाटात.कुत्र्यागत क्याव क्याव करत ती विव्हळली.तसा घणानाती आवाज चढवत त्यो बोलला,तिला परत हात लावलासा तर हात खांदयातनं उपडून काढीन. बुड टेकायाबी जागा ठेवणार नाय.ती मुसमुसत तेच्या माग लपली.तवर समदा गाव शेतात गोळा झाला.चार शान्या लोकानी तेला समजावलं.समदी माघारी फिरली.

ती इचार करत बसली.ह्या देवमाणसानं आपल्याला जगण शिकवलं.फुलपाखरागत मोकळ पणानं भिरभिरण्यासाठनं मोकळा श्वास दिला.नात्याला नाव नाय पर जीवाला जीव लावत्योय हे तर पक्क हाय.आपल्याला ठेच लागली तर तेच्या डोळ्यात का म्हणून पानी उभ ठाकतयं.त्यो नसला की जेवण बी गोड लागत नाय आपल्याला.तेच्या वाटला डोळ लावून तासंनतास बसल्यावर त्यो दिसला का काळीज हरकातयं.तेच एक बी काम आपल्याबिगार का पूर व्हत नाय.ना आपल तेच्या बिगार पान हलत.इचारावं का तेलाच ह्या समदयाची उत्तरं.ती पायऱ्या चडून आत आली,त्याच येळी त्यो बी हीच उत्तरं तिच्याकडनं घ्याया आला व्हता.फकस्त नजरा नजर झाली अन आपसूकच समदी उत्तरं दोगास्नीबी गावली.दुसऱ्याच दिशी गावदेवीच्या देवळात नगारा घुमला,त्या दोगानच्या साता जन्माच्या गाठी देवीच्या साक्षीनं बांधल्या गेल्या व्हत्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>