आपल्या उघड्या डोळ्यात स्वप्न घेऊन फिरणारे असतात...ही कथा अशाच एका माणसाची...अझीम भाई...खूप सुंदर लिहिली आहे तुम्ही....
जॉब- अझिम आतार
"अरे , कसा आहेस मित्रा?"
"मस्त .. भारी .. आणि तू?"
"अरे मजेत. आज पण या गाडीला?"
" हो. मला वाटलंच होत तू भेटशील, म्हणूनच आलो इथे. "
"हम्म्म .. आता रोज असतो मी या टाईमला"
"अच्छा. मग कुठ चालुए जॉब?"
" इथंच… सीझन्सला … लय काम असत राव …. बघ ना कुठ जॉब आहे का मला .."
"हम्म्म … बघतो … " ( काहीतरी आश्वासक म्हणून बोललो ) "किती लांब आहे रे इथून?" एक प्रतिप्रश्न .
"आसन १०-१५ किलोमीटर, १५ मिनिट लागतात चालत.
मनातल्या मनात हसलो मी . पण अशा गंभीर चेहऱ्याने फेकलेल्या गमतीदार वाक्यांची सवय झाली होती मला .
तर असा हा माझा गमतीदार मित्र ( नुकताच झालेला ) मागच्याच रविवारी भेटला होता… इथेच. तेव्हा कळल होत की हा दर रविवारी रात्री ११ च्या ट्रेनला असतो. भोळसट चेहरा आणि त्याच चेहऱ्यावर नानाविध वाकडेतिकडे प्रश्न आ वासून तयारीत उभे असलेले. आपण दिसताक्षणीच झडप घेणारे .
पहिल्याच भेटीत हा थोडा वेडा वाटला होता. त्याचं बोलण आणि शंका ऐकून कोणीही हे ठरवलं असत. पण मला मात्र याची मजा आली होती. (एखाद्याच्या भोळेपणाची आपण मजा घ्यावी, हा विचार नंतर खटकलाही होता.) त्याच्या बोलण्यावर आसपासचे लोकही हसत होते. त्यात तोही शामिल होत होता. (कदाचित त्यालाही याची सवय असावी.)
परंतु बोलताना मात्र तो मला सारखं म्हणत होता . "एखादा जॉब भेटेल का रे मला मित्रा?" मी सुद्धा हो हो म्हणत होतो. या अशा आमच्या बोलण्यात त्याचं स्टेशन आलं आणि परत भेटू या वाक्यावर तो उतरला.
आज दारातच बसू, असं म्हणून आम्ही दोघ इतक्या थंडीत बोलते झालो. आज तो थोडा गंभीर वाटला . नेहमीची ती गमतीदार वाक्यं नव्हती त्याच्याकडे. "जॉब भेटेल का कुठे?" यामुळे तो बराच अस्वस्थ होता. त्याच्या बोलण्यावरून कळल की सध्या करत असलेल्या हाउस कीपिंग च्या कामामध्ये त्याला बरीच बोलणी खावी लागत होती. १२ तास काम करून त्याला ४००० च रुपडे मिळत होते .
त्याने मला विचारलं, " हे टोपर लोकं खूप हुशार असतात ना?"
मी स्वानुभवावरून साशंक उत्तर दिलं, "अम्म्म … हो … कदाचित …"
तो उत्तरला, "काही नाही. रोज दारू पिऊन पडलेली असतात तिथे. मी पाहतो ना. "
उच्चभ्रू वर्गातल्या कॉलेज विद्यार्थ्यांचीही अवस्था त्याला किळसवाणी वाटत होती.
तो स्वतः १२ वी पर्यंत शिकलेला जरी असला तरी निदान समाजात कस वावरावं याची त्याला बरीच जाण होती .
नंतर बोलता बोलता कळलं की त्याच्या घरी आजारी आई, दारुडा बाप आणि एक लहान भाऊ होता. ( पूर्ण फिल्मी स्टोरी, पण वास्तवात मात्र पोटाला चटका देणारी).
घराचा गाडा चालवण आता याच्याच हाती आलं होत. लहान भावाचं वय बसत नसल्यामुळे त्याला कोणीही कामावर घेत नव्हत. (बालकामगारांची ही बाजूही दखल घेण्याजोगी होती, बालकामगारांचा कायदा काढणाऱ्या सरकारने त्यांच्यासाठीही काहीतरी करावं, हा विचार चमकला.)
दूरवर शेत चमकत होती आणि तो बोलत होता. म्हटला, "आपल्याकडे इतकी लोकं शिकतात, इंजीनियर बनतात. पण आपल्या गाड्या, रेल्वे, रस्ते किती साधे आहेत. अमेरिका, युरोप मध्ये बघ बर किती भारी आहे." ( इंजिनियर या प्रजातीत मी सुद्धा मोडत असल्याने इंजिनियर कसे असतात किंबहुना कसे बनतात याचा परिचय नक्कीच होता)
त्याला शिकायचं होत…. आहे …. गाडी बनवायला. त्याला सुसाट धावणारी गाडी बनवायची आहे. पण घरच्या गरिबीमुळे त्याला जबाबदारी सोडता येत नाहीये. चूक कोणाचीही का असेना, भोगावं लागतय मात्र त्याच्या स्वप्नांना. खेळण्याच्या वयातच आपल्या स्वप्नांना विस्कटलेल पाहावं लागणाऱ्यांची हजारो उदाहरण आपल्याला डोळ्यांदेखत पाहायला मिळतात.
तर असंच "कुठ भेटेल का रे जॉब मला?" विचारत विचारत त्याच स्टेशन आलं होत. आणि मी मात्र बोर होतंय म्हणून २ दिवसांपासून जॉब सोडायच्या विचारात होतो. त्याची कहाणी ऐकून उगाचच मला माझ्या जॉबवर प्रेम आलं.
इतक्यात गाडी थांबली. तो प्लेटफॉर्म वर उतरला. परंतु त्याचे ते प्रश्न त्याच्याभोवती घुटमळताना दिसले. त्याला गुदमरत सोडून. बाहेर अंधार खूप होता आणि त्याची सावलीही त्याच्याबरोबर नव्हती .
"भेटू मित्रा पुन्हा याच गाडीला", असं म्हणत तो एकटाच अंधारात निघून गेला .
आजही मी जेव्हा असतो त्या गाडीला, नजर भिरभिरत असते, कान टवकारलेले असतात . कुठूनतरी आपसूक आवाज येईल ,
"अरे , कसा आहेस मित्रा?"