मी काल हे विनयाच्या पोस्टवर वाचल आणि फ्रीझ झालो. मी तिला फोन केला आणि क्षणभर मला काय बोलाव ते सुचेना. शब्द जेंव्हा आपल्याला मूक करतात...तेंव्हा तीच दाद समजावी
शेवटचाच – विनया पिंपळे
...मग त्याचं सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर
तिनं तिच्या सगळ्या इच्छा , आकांक्षा , अपेक्षा-
आणि कधीतरी पाहिलेली चारदोन स्वप्नं
एका कोऱ्या कागदावर
भराभर लिहिली
कागदाला सुरेख घड्या मारून
एक छानसं विमान बनवलं
डाव्या तळहातावर घासत
हळूवारपणे फुंकर मारून
अलगद हवेत सोडून दिलं
हे पाहताच तो म्हणाला –
"काय हा बालिशपणा!"
ती म्हणाली –
"बस... हा शेवटचाच..."