आपले माणूस जबाबदारी होते तेंव्हा....आयुष्य असे क्रूर विनोद करीत असतेच....
जबाबदारी – असावरी देशपांडे
गेल्या दहा वर्षापासून तिला मी अशीच पाहतेय पलंगावर निपचित पडून,क्वचित थोड़ीशी हालचाल अगतिकतेने भरलेली... डोळयांचा मात्र घरभर वावर....
प्रत्येक गोष्टीसाठी ती दुसर्यावर अवलंबून,तिच्या शरीराचे नैसर्गिक धर्मदेखिल तो त्याचा धर्म असल्यासारखे उरकायचा यांत्रिकपणे....
तिचे जीवन बंद पडलेल्या घड्याळासारखे वाटायचे भिंतीला टांगलेले...
त्याच्यावर भार त्याच्या वृद्ध आईवडिलांचा अन तिने दहा वर्षापूर्वी बहाल केलेल्या जबाबदारीचा...ती वाट पाहते तो आपल्याकडे नज़र वळवून पाहिल याची कारण तिलाही घाई असते हसून कृतदन्यता दर्शवण्याची... त्याच्या डोक्यात रोजच्या कामांची उजळणी, एखाद्या गृहिणीलाही लाजवेल अशी कामात चपळाई, ऑफिसची घाई वगैरे..
तिला दिसतात नेहमीच त्याच्यात काठोकाठ भरलेल्या भूमिका....मुलगा, नवरा, आई, बाबा.... त्याच्या जबाबदारीला त्याने अंगाखांद्यावर खेळवल, तुरु तुरु त्याच्यामागे धावायला शिकवल, आज तो जबाबदारीच्या मागे धावतोय.
पुढच्याच क्षणी त्याची जबाबदारी त्याला घट्ट मीठी मारते, तो देखिल हसून 'बाय' म्हणतो. ती सारे टिपते डोळ्याने....
हळूच तिचा एकच शेवटचा आचका 'बाय' म्हणून जातो त्याला..
एका जबाबदारीतून ती मुक्त करते त्याला.....