ही लघुकथा खूप वेगळी वाट चालते आहे...काल आपण शब्दांची असाह्यता वाचली...इथे शब्द वेगळाच खेळ खेळत आहेत.
उधार – गायत्री मुळे
पांगळ्या झालेल्या मनाला तिने उचलले. त्याला उभारी देणे कठीण होणार होते. तिला स्वत:ची मर्यादा जाणवून हताश वाटायला लागले. फार वजनदार झाले ह्या मनाचे अस्तित्व. जड जड मन. पेलता येत नव्हते. हे कुठेतरी रिते व्हायला हवे. म्हणजे हलके होईल.
पण तो पर्यंत काय?
शब्दांकडे कुबड्या मागितल्या तिने मनासाठी. त्याच्या बदल्यात काय काय परत करशील? असे म्हणाले ते शब्द तिला. कितीही विचार करून तिला उत्तर सापडेना. मग शब्दानीच पर्याय ठेवला.
कविता?
शब्दांचे बुडबुडे उडायला लागले. त्यांच्या फेसात समोरचे मन धुसर होत गेले. मनाच्या वेदना कायम होत्या पण जडत्व कमी कमी होत होते.
ह्या कुबड्या कुठवर सांभाळायच्या पण? मनाला सवय नव्हती कुबड्यांची. ते त्या कुबड्यांसकट परत परत ठेचकाळत होते. शब्द प्रत्येक वेळेस वेगळीच उधारी चुकवून घेत होते. शब्दांच्या कर्जाचा खूप मोठा डोंगर झाला. तिला उतराई होता येईना. ह्या शब्दानीच कधी घात केला होता. ह्या शब्दानीच कधी फसवले होते. ह्या शब्दानीच आधार काढून घेतला होता. आज त्यांचाच आधार घ्यावा लागत होता.
" आता आपल्या वाटा वेगवेगळ्या ह्या नंतर"
ह्या निखाऱ्याची झळ फार पोळत होती. मग तिने त्या वाटाही जोखून बघितल्या. उरल्या सुरल्या अपेक्षांचे दार ठोठावले. त्यातून बरेच काही बाहेर आले. अपमान, अवहेलना आणि निराशा. फक्त पुर्तता नव्हती. झोळी रिकामीच राहीली.
||ॐ भवती भिक्षां देही||
माधुकरी मागत फिरणारा एक योगी तिच्या समोर आला. तिच्या हातात काहीच नव्हते. फक्त काही शब्द!! तिने ते उचलले. त्याच्या झोळीत ओंजळभर टाकले. तिच्या मनाचे ओझे आता योग्याच्या खांद्यावर बसून खदाखदा हसायला लागले. ती सुन्न! शब्द देता देता काय करून बसलो ह्याची जाणीव झाली तिला. आता त्या कुबड्यांची गरज तिला उरली नव्हती. त्या कुबड्या सुध्दा त्या योग्याच्या पायाशी तिने ठेवल्या. त्याच्या झोळीत पडलेले शब्द आता एकेक करून तिच्या मनातून बाहेर निघत होते. मनाचे ओझे निवांत झाले.
जोखलेल्या वाटामधली दुसरी वाट आता तिने निवडली. जितकी चालत पुढे जात होती तितकीच शब्दहीन होत होत एक निगरगट्ट हसू तोंडावर घेवून पोकळ झालेले मन घेवून ती दरीत उतरत होती.
शब्दांचा कर्जाचा डोंगर दूर दूर पडला होता.