काय बहार कथा लिहिली आहे सुचीताने....जियो सुचिता....
नटरंगी नार – सुचिता घोरपडे
चंदर पाटलाचं धाकलं पोरग जालिंदर म्हंजी देखणापान तरणाताठ गडी. तालिमीतनं कमावलेलं पीळदार शरीर. मिसुरडं आता कुट फुटत व्हत. शहरात रायलेलं पोर गावात कसा जीव रमलं. तवा पाटलानच गडयासंग मळ्यावर धाडलं.
“मालक तुमास्नी एक इचारू का?”
“हां...!”
“नाही म्हंजी तुमासनी पसंद पडलं नाही पडलं.”
“आता बोलतो का...”
“तसं नव्ह मळ्याच्या खालच्या अंगाला पालं पडल्यात नव्ह.”
“कसली पालं,आता नीट बोलतोस का शेंबडात माशी घुटमळ्यागत अडकून राहतोस.”
“अवं मालक कानावर बातमी आलीया तमाशातल्या लई पोरी आल्यात्या.अगदी कवळ्याकंच हाईत. नाचत्यात बी अश्या की काळीज पुढयात येवून पडतया.”
“असं म्हणतोस बगू तरी कश्या दिसत्यात या मैना.”
“हां पर आता जाऊन कसं चाललं, रातीचं जाया पायजे.आज सुपारी देतोच त्या मावशीला. फकस्त आजची वस्ती मळ्यावर करा म्हंजी जालं. तसा निरोप धाडतोच वाडयावर.”
“बरं बरं..”
“आणि तसबी कालपासनं पालातल्या बायका कपड धुवाया आपल्याच हिरीवर येत्यात. तवा तुमी बगशीलाच त्यासनी. परं जरा जपून मालक, ह्या बाया लई खोडगुनी असत्यात बगा. मव्हाच्या माश्यावानी डसत्यात अन गाबण झाल्या म्हंजी नस्ती पीडा माग पडाया नगं.”
“लई अक्कल पाजळू नगस. मला काय खुळा कावरा समजाया लागलास काय. तुझ्यापरीस लई गावचं पानी चाखलयं. तू निग आता.”
जालिंदरला मळ्यावर पोचत करून नाम्या रातीचं काम फत्ते कराया निगाला. जालिंदर जरा येळ टेकणार त्योच तुणतुण्याचा सूर कानी आला. अंगात एकदम पेटल्यागत हून जालिंदर उठला. एका गडयानं तरी हटकलच,
“मालक भर दुपारचं कुट निगालासा..?”
“तुला कशाला पायजे रं नसत्या चौकश्या.गुमान पुढ बगून भांगल.”
“तसं नव्ह मालक,भर डोक्यावर ऊन आलं हाय.वावरात एकटया दुकटयान भिरू नगासा.”
“लई शानपना दावू नगसं.मला कोन धरतयं का चावतया.”
जालिंदर तसाच वावर तुडवत आवाजाच्या दिसनं सुटला. मळा रायला माग. किसन्याची पाणंद आली तवा कुट पाय दबकत निगाला. अन पोटातन धगधग बाहेर पडावी तसं झाल समोरचं इपरीत चितार बगून. एक नटरंगी नार वडयाच्या पाण्यात पाय बुडवून पाण्यासंग अंगालाबी हेंदकाळ देत बसली व्हती. गुलबकावलीगत नाजूक, झेंडवागत पिवळीधम्म, तांबूस केसाचा बुचडा अन त्यावर एक गजरा. शेंगगत वळणा वळणाचा बांधा. डाळिंबागत लालचुटूक व्हट, रेशमागत तांबड जरतारी लुगड अन त्याला हिरवं काठ. इंदराची अपसरा झक मारल असं देखण रूपं. तिला बगूनच भान हरपलं जालिंदरच.
भूल पडल्यागत जालिंदर जागचा काय हलना. वा-याची एक हलकी झुळूक आली, तसा जालिंदर भानावर आला. तशी ती पण मान जरा तिरकी करून हसली. एवड निमित पुर व्हत जालिंदरला वळख वाढवाया. पर इथं तर दान उलटचं पडलं. जालिंदरनं एचारायच्या अगोदर तीनं इचारलं,
“कोन म्हनायाच पावनं तुमी..? पयल्या डाव पायलं. गावात नव हाईसा काय.”
जालिंदर चपापला,
“ऑ....मी मी....!”
“आता गं बया.असं बक-यागत काय कराया लागला हाईसा.”
आपल्याच येडया गबाळ्यागत बोलण्याचा राग येऊन जालिंदर म्हणला,
“मी व्हय, मी चंदर पाटलांचा पोरगा..जालिंदर. जालिंदर नाव हाय माज.”
चंदर पाटील नाव ऐकून तिचं डोळ असं काय लकाकलं. उरात धपापल्यागत हून मासळीगत टणकन उडी मारत ती जालिंदर म्होर उभी रायली. तिला अशी एकदम तोंडाजवळ बगून जालिंदरचं पुरत पानी पानी जाल.
“रग्गड बावडी कमावली की तुमी. तालमीला जातासा वाटत.”
एका बाई कडनं आपली तारीफ ऐकून जालिंदर बेडकागत टम्म फुगलाच. पर नवाल एका गोष्टीच वाटत व्हत, ना वळख ना पाळख तरी ही बाय कशी काय एवढी बोलाया लागली हाय. तवा बापाच्या वजनाची आठवन आली. अन छाती आनी चार हात पुढ आली.
“तुमी कुठल्या म्हणायचं..?”
“आता हित हाय तर हितलीच म्हणा की.”
तिचं उत्तर ऐकून जालिंदर कोडयात पडला. तशी ती न बोलता पुढ चालू लागली. चाल बी कशी...भर ऊनात नागीन सळसळत जावी तशी. भूल पडल्यागत जालिंदरबी तिच्या मागन चालू लागला. एक एक रान माग पडलं अन जाधवाची हीर आली. तिथल्या चीचच्या झाडाखाली जवा आली तवाच ती थांबली. तसा जालिंदरबी थबकला. तशी ती म्हणली, “या बसा जरा निवांत. ऊनाच्या झळा जीव कासावीस कराया लागल्यात. घसा बी कोरडा झालाय.”
असं म्हणत कमरला गुंडाळलेली चंची काढली.अन म्हणली,
“पान घेणार का..?”
“ऑ...घेतो की..”
“मग असं उभं का पावण बसा की खाली.”
असं म्हणत तिनं एक हात धरून तेला खालीच बसविला. तसा जालिंदर हरखला. अंगाला अंग झोंबत व्हत कात कातरताना. तसा जालिंदरच्या मनात केवडा फुलत व्हता. कवळ्या काकडी गत कराकरा खावी काय चीचच्या बुटूकागत एकदम तोंडात टाकावं असं जाल व्हत. तवर नजरनचं पान घ्याया इशारा केला. अन गुणगुणू लागली.
“कवळं हाय पान रंगलया छान घातली चुना सुपारी नी कात गं रायानं धरला माजा हात”
आता तर खरंच जालिंदरनं तिचा हात धरला. अन गपकन माग खेचला. इंगळावर हात पडावा तसा तेचा हात भाजला.
“ऑ...काय जाल ओ..”
“ना..ना नाय काय नाय.तुमचं अंग लई भाजालयं.बर बीर नाय का तुमास्नी.”
“मला काय धाड भरलीया बर नसाया. म्हणलं नव्ह घशाला कोरड पडलीया. पानी पायजल हाय. जरा आनतासा काय हिरीतन.”
इकडं नाम्या मालकाला सांगावा दयाया आला. तर समदी गडी माणसं मालकाला हुडकत व्हती. तसा नाम्यानं एकाला हाळी दिली.
“कुट हाईत रं मालक..?”
“ठावं नाय..मना करत असतानाबी गेलं नव्ह भर ऊनाचं.”
“अरं मालक एक नवं हाईत पर तुमाले कळत नाय काय..?”
नाम्या चपापला अन गडयास्नी म्हणाला.
“चला रं समदी जाधवाच्या मळयाकडं..एक डाव बगून तर येवूया.”
तशी समदी बिचकली.अन आपापसात कुजबुजू लागली.
“अरं तिकडं कशाला भर ऊनाच जायाचं. ती तमासगीर सुंदरी थोरल्या मालका पासनं गाबण रायली व्हती तवा त्याच हिरीत जीव दिला नव्ह. अरं अजूनबी दिसतीया ती अधन मधन.कोन काळ कुत्रबी भटकणार नाय तिथं. अन आता तिकड जायाचं.....”
“अरं एवढी समदी असताना तुलाच एकटयाला धरतीया काय.चल गप गुमान.”
समदी जवा हिरीजवळ आली तवा एकच बोंब ठोकली. हिरीच्या पाण्यावर जालिंदर उताना पडला व्हता. काळीज घट्ट करत जालिंदरला बाहेर काढला. मळ्यावर नेला तवर थोरलं मालक आलं. तेंची तर वाचाच बसली. कडूसं पडलं तसं हळूहळू जालिंदरला सुद याया लागली. थोरलं मालक जवळ जाऊन बसलं. तसं जालिंदरनं तेंचा हात पकडला.अन.. अन गुणगुणू लागला.
“कवळं हाय पान रंगलया छान घातली चुना सुपारी नी कात गं रायानं धरला माजा हात”
थोरल्या मालकाची दातखीळ बसली अन त्यो तिथचं पडला.