एखादी कथा मला थांबवते हाताला धरून...बसवते तिच्यापाशी आणि.........मग मी हरवून जातो तिच्यात...
सिंदबाद – सुमित्रा
तसे फार दिवस झाले होते..तुझी आठवण आली नव्हती. पण परवा समुद्रावरच्या मऊशार रेतीतल्या ठाशीव पाऊलखुणा पाहिल्या आणि सरकन तू इथंच आहेस, हे समजलं. ती तुझी पावलं आहेत.. तू इथंच आहेस.. सिंदबाद! तुझ्या इथं असण्याच्या जाणीवेनेच त्या मऊशार वाळूत मी दणादण नाचले, टोपी फेकली आणि खो खो हसले सुद्धा.
पाठीवर ओझं घेऊन तसे मागच्या वेळी एकत्रच निघालो होतो. बहुदा पहिलीच भेट होती आपली. तुला आठवते का मागल्या वेळची भेट. त्रिवेंद्रमहून निघून कन्याकुमारीच्या प्रवासाला जाताना भेटलो आपण. नारळीच्या बागा बघत पाठीवरच्या तुझ्या सर्वव्यापी ओझ्या-काळज्यांसकट तू निघाला होतास. पण त्या फारशा महत्त्वाच्या नव्हत्याच. तू तुझ्याच धुंदीत गात गात निघाला होतास. मग अनेकवार भेटत राहिलास. अनेकवार दुरावतही राहिलास..
ताजमहालाच्या पायरीवर फतकल घालून बसलेला, वृंदावनच्या काळ्याशार यमुनेच्या तीरावर एकटाच नाचणारा तू, हरिद्वारला गंगेच्या काठावर बसून एकतारीवर भजन म्हणतात हंपीच्या देवळांत काळ्याशार दगडांवर मायेनं हात फिरवून बघणारा, मुरडेश्वरच्या खडकांवरच्या शिंप्या काढण्याच्या प्रयत्नांत हातांना जखमा करून घेणारा हर्णेच्या बंदरावर माशाचा गळ घेऊन तल्लीनतेन मासे पागताना, राजस्थानातल्या वाळवंटात भर दुपारी हात पसरून वेगाने धावणारा.. किती तरी रूपं या सगळ्या ठिकाणी मी तुला पाहिलं.. प्रत्येक ठिकाणी तू तसाच होतास.. पाठीवरच्या ओझ्यां-काळज्यांसह.. पण तरीही निर्मोही, सारे असून बंधमुक्त आणि प्रसन्न... तुझ्या इथं असण्याच्या जाणीवेनं मला हे सारं आठवलं.. तू आहेस इथं तेव्हा आता तो आठवणं क्रमप्राप्तच..
तुला जेव्हा जेव्हा पाहिलं ना, तेव्हा तेव्हा मला तो आठवायचा. पाठीवर ओझं लादून निघालेला सिंदबाद आणि तो यात तसा फारसा फरक नाहीच. फरक असलाच तर इतकाच आहे, की सिंदबाद मनमुराद जगला. सारं अनुभवत, चाखत माखत, संकटांना झेलत, वाटेत रमत, गात, मनसोक्त पण योग्य दिशेने तो चालत राहिला. पाठीवरच्या ओझ्याचं त्याला फार काही वाटलं नाही कारण त्या ओझ्याचंही त्याला कौतुक होतं. त्याला वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथं ते ओझं त्याने टाकलं, अगदी मौल्यवान गोष्टींसह टाकलं. कारण त्याला जगायचं होतं.
सिंदबादवर प्रत्येकानं जीव टाकला, त्याने प्रत्येकाला जीव लावला. मी त्याच्यावर प्रेम केलं ते त्याच्या जगण्याच्या ओढीसाठी. त्याच्या जगण्याच्या जीवट आणि आशावादी मुळांसाठी. खरं तर खरं तोच जगला. तुम्ही आम्ही जगण्याचं ओझं वाहिलं. कोण काय म्हणेल, कसं म्हणेल, हे का, ते का, असं कसं, तसं कसं, मीच का याव नी त्याँव! हे सारे प्रश्न म्हणजे न संपणाऱ्या लाटा. एका मागोमाग एक. त्या प्रवाहात आपण भिरकावले गेलो की सिंदबादची साथ संपते. त्याच्या मागे ऊर फाटेस्तोवर धावायची तयारी नसतेच.
अर्थात त्याला सोबतीची अपेक्षा तरी कुठं होती? तो एकटा आला होता, एकटा जाणार होता. आलेले सारे चार क्षणांचे सोबती आहेत, हे त्याच्या मनात पक्के होते आणि त्या पक्क्या समजुतीला त्याने मनोमन अत्यंत नेमके जपले. त्यामुळे तो जगला, तरला आणि प्रवासाला कंटाळला नाही. अनुभवांचे रापलेपण चेहऱ्यावर आले, पण कटुता आली नाही. खरं तर तोच जगला. मी मात्र, कडूगोड अनुभवांच्या रापलेपणासह कडूशार होत गेले. केव्हा तरी उमगलं की खळाळत्या, उसळत्या लाटांच्या साक्षीनं इथलं एकाकीपण सिंदबादनं लीलया झेललं, पेललं; पण याच एकाकीपणाला घाबरून आपल्याला आपलं घर आठवलं.
जगण्यातला फरक इथं सापडतो. हा फरक सापडला तेव्हापासून म्हणूनच तू भेटायला हवा होतास. भेटायला हवा असलास तरी भेटायची हिंमत गोळा करायला लागणार होती. आता पावलाचे ठसे पाहिलेत, तेव्हा भेटण अटळ! भेटतोच आहोत तर थोडं तरी बळ दे. तुझ्याइतकं नाही पण किमान नकोशी ओझी टाकण्याची हिंमत दे. वाळूतल्या या पावलांच्या जोडीला माझी पावलं दमदारपणे टाकण्याचं धाडस दे. सिंदबाद प्रत्येक भेटीनंतर तू जातोस, याही वेळी जाणारच. पण त्या जाण्या नंतर तू शिकवलेल्या प्रवासाच्या खुब्या वापरत जगता आलं, तरी दान भरून पावलं...योगायोगाने भेटलोच कुठल्या बेटावर पुन्हा, तर कळवेनच मी आल्याचं तुला.