Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

बाळा-संजन मोरे

$
0
0

शब्दचित्र रेखाटने ही संजनची हातोटी आहे...त्याने ती रियाजाने मिळवली आहे...

बाळा-संजन मोरे

उम्याला चूकवून बाळा घराकडे तर वळला, पण घराकडे जायला त्याचे पाऊल उचलेना. कुठे जावे?

त्या पोरानं चागलंच चेलमडलं होतं. गुडघ्याला मुका मार लागलेला दिसत होता. सूज आली होती. उम्याचं घर, उम्याची आई, उम्याचा आज्जा, उम्याचे दोस्त, सगळे त्याला आवडले. तो पोरगा सोडला तर बाकीचे सगळे चांगले होते. त्या पोराची तरी काय चूक ? आपण त्याची शिकार घालवली. कुणीही चिडेलंच ना? पण तो पक्षी, पाळायला आवडला असता. किती देखणा आणि गुबगुबीत होता. तो काय खातो? उम्याला विचारायला हवं.

त्याची पावलं चालत होती. विचाराच्या तंद्रीत तो चालत होता. अजून अर्घा दिवस होता. तो गावाबाहेरच्या गावदेवीच्या वाटेला कधी लागला, त्यालाही समजले नाही. त्याची ती नेहमीची जागा. निवांत एकांत. मंदिरात कुणी ना कुणी येत असतंच, तरी शांतता असते. घंटेचा आवाज आणि देवीला घातलेलं साकडं, कानावर येतं. मग दर्शन घेवून भक्त गाभाऱ्यात काहीकाळ विसावतो, नंतर मार्गाला लागतो. खडीसाखर, खोबरं हातावर पडतं. गाभारा प्रशस्त आहे. फरशी थंडगार असते. तीचा थंडगारपणा शरीरभर मुरत जातो. मंदिर आता अधूनिक झालंय. पुर्वीची कलाकुसर जावून आता सिमेंट कॉंक्रीट ची कलाकुसर आली आहे. चांदीच्या चकचकीत डोळ्यांची, देवीची मुर्ती अजून पुर्वीचीच आहे. किती पिढ्या हिचे दर्शन घेवून काळाच्या पडद्याआड गेल्या असतील? गाभाऱ्यात दोन तीन म्हातारी माणसे पाठ टेकून पहुडलेली असतातच. मग त्यांच्या जुन्या गप्पा निघतात. बाळाला या गप्पातून बरीच माहिती मिळते.

मंदिराच्या पाठीमागे एक छोटी बारव आहे. त्यात पाणी आहे. पाण्यात तलवार घेतलेल्या गावदेवीची दगडी मुर्ती आहे. वरून ती स्वच्छ दिसते. मु्र्ती भोवतीने छोटे मोठे मासे फिरत असतात. खेकडेही दिसतात. बारवेच्या पाण्यातल्या भींतीच्या फटीत विरोळ्याची (पानसापाची ) डोकी दिसतात. बेडकांची पिल्ले पाहून त्यांच्या जीभा लवलवतात. या जलचरांना माणसाची भीती नाही. कुणी त्यांना हात लावत नाही, दगड मारीत नाही. भक्तांनी टाकलेल्या निवदावर हे जीव पोसतात. माणसांच्या गराड्यात हरवलेल्या त्या मंदिरातल्या देवी पेक्षा बाळाला ही पाण्यातली देवी आवडते. इथल्या पाण्यात जीवंतपणा असतो. पाणी हललं की देवी हालचाल करतेय असे वाटते. बाळाचा इथंही भरपूर वेळ जातो.

थोडंसं ओढ्याच्या बाजूने पुढं गेलं की पाण्याचं एक तळं दिसतं. आजूबाजूला गवताळ कुरण, त्यात चरणारी गाई गुरं. तळ्याच्या कडेने फोफावलेल्या किंजळ वनस्पतीच्या दाट भिंती ,त्यांना फुटलेली लांबलचक पानकणसे. . किंजळातले मासे, लपलेली कासवे . तळ्यात म्हशी डुंबत असतात. शिकारी पोरं बुड्या देवून मासे काढतात. पाण्यात गायब होतात, दम संपला की पुन्हा वर येतात. दम घेवून पुन्हा बुडी घेतात. मासा घावला की पाण्यात पडणार नाही या बेताने बाहेरच्या गवतावर फेकतात. मग गवतात माश्याची चंदेरी फडफड होते. पिशवीत पडल्यावर मासा शांत होतो. बाळाला असले मासे वेचून पिशवीत टाकायला आवडते. ते बाळाला पिशवीत डोकावू देतात. पिशवीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे, खेकडे, शांत पडलेले दिसतात . क्वचित एखादी लांबसडक वांबही दिसते. बुड्या देवून पोरांचे डोळे लालभडक होतात. त्या मानाने ओढ्यात मासे पकडणे सोपे. ओढ्याला खाली वर गवताळ ढेकळांच्या ढेपा टाकून तूंब घालायचा. मग पाणी उपसायचं. प्रचंड मेहनतीचे काम. पाणी काढल्यावर सगळीकडे माशांची वळवळ दिसते. सगळा अैवज गोळा करायचा. गवत चाचपायचं. खेकडे, मासे, डोकळे, वांब,मरळ, सगळा अैवज बादलीत भरायचा. पोरं चिखलाने बरबटून जातात. भरपूर मासळी घावल्यावर खूष होतात. मग तूंब फोडून पाणी मोकळं करून द्यायचं. मग स्वच्छ पाण्यात आंघोळ. नंतर सगळे ओल्या अंगानेच गवतात बसतात. मग सगळ्या बादल्या पालथ्या करून अैवजाची समान वाटणी. बाळाने फक्त मासे वेचले तरी बाळाला एक वाटा मिळतो. पण बाळाला वाटा घरी न्हेता येत नाही. बाळाच्या आईला असलं काही आवडत नाही. असल्या पोरांची संगतही बाळाने करावी असे तीला वाटत नाही. मग बाळा वाटा घ्यायला नकार देतो. मग बाळाच्या वाट्याची पुन्हा समान वाटणी.

मग सगळेजण मासे धूवायला बसतात. दगडावर मासे घासायचे. खवले काढायचे. मग खेकड्याच्या नांगीने माशांची पोटे फोडायची. आतले फुगे काढायचे. घाण काढायची. पाण्याच्या धारेत मासा स्वच्छ धूवायचा. खेकड्यांच्या नांग्या मोडायच्या पाठी उचकटायच्या. केसाळ जाळी उपटून काढायची. खेकडा स्वच्छ करायचा. खेकड्या माशांच्या पोटातलं सगळं पाण्यावर तरंगत जातं . मग या शिकारीतून वाचलेले जलजीव त्यावर तूटून पडतात. वाहत जाणारे फुगे बेडकं मटकावतात . बाळाला हे पण बघायला आवडतं.

आजही हे सगळं बघण्यात बाळाचा वेळ कसा गेला हे त्यालाही कळले नाही. शिकार स्वच्छ केल्यावर पोरं पांगली. बाळाही घरी जायला आतूर झाला. थोड्या वेळाने आई येईल. तोपर्यंत घर आवरून ठेवायला हवं. मग ती स्वयंपाक करेल. पावटा, घेवडा, डाळ वटाणा असं काहीतरी करेल. आपल्यासाठी अंड्याची पोळी भाजेल. जेवायला बसेपर्यंत कुठूनतरी खेकड्याची कढी, माश्याच्या रश्श्याचा डबा येईलच. भावकीच्या बाहेरचे मित्र बाळाला विसरत नाहीत. बाळाच्या आईचा ते विचार करत नाहीत. बाळाच्या घरी कोण येतं, याच्याशी त्यांना देणं घेणं नसतंच. बाळाच्या रविवारच्या दिवसाचा शेवटही मग चांगलाच होतो.

बाळाची शाळा आज सुरू होईल. कालचा रविवार चांगला गेला बाळाला. दिवसभराची भटकंती झाल्यामुळे रात्री बाळा लवकर झोपून गेला. रात्री तो काका आलेला. उशीरापर्यंत आईबरोबर बोलत बसलेला. बाळाला त्याच्या वडिलांची आठवण झाली होती. बाळा तोंडावर पांघरून घेवून आतल्या आत रडला मग तसाच झोपी गेला.

आईचा राग पण येतो. मग वाईटही वाटते. आपल्या आईला कुणी चांगलं समजत नाही. आपल्यालापण भावकीतले डोळ्यात घातल्यासारखे करतात. “ कडू बेणं “ असं कुणीतरी त्याचं नाव पाडलंय. बाळाला वाईट वाटतं. आई कुणाच्या घरी जात नाही. तीला कुणी घरी बोलवत नाही. आज वर्गात उम्या भेटेल !

बाळा चट चट आवरू लागला. आई पाणी भरत होती. बाहेरच्या चूलीवरलं तापायला ठेवलेलं पाणी त्याने बादलीत ओतून घेतलं. पातेल्याच्या कडांनी बोटं भाजली. फडक्याने धरायला पाहिजे होतं, पण बाळा विसरला. पाणी ओतून होईपर्यंत बाळाने कळ मारली. चटका सोसला. मग न्हाणीत गेला. कमरेयेवढी न्हाणी. तीन्ही बाजूने उघडी. आई पातळाचा आडोसा करते. पातळ गुंडाळून घरात येताना शेजारी पाजारी तीला बघतातंच. काही बाही बोलतात. चांगलं तर नाहीच. बाळाने कोळसा घेतला. दगडावर बारीक केला. मग हातावर घेवून दात घासू लागला. दात करकर वाजू लागल्यावर बाळाने चूळ भरली. मग न्हाणीत घुसला. तो पर्यंत आई आली. तीने गरम गरम पाण्याचे तांबे बाळाच्या डोक्यावर ओतले. भींतीच्या खोबणीत ठेवलेला साबण काढला. खसाखसा बाळाला चोळला. डोळ्यात साबण गेला होता. मान पाठ चोळल्यावर बाळाला दगडाने घासला. मळाच्या वळ्या निघाल्या. मग पुन्हा पाणी ओतून बाळाला तीने लखलखीत केला. बाळाने डोळे धूतले. कानात पाण्याचे हपके मारले. आई स्वयंपाकघरात निघून गेली. मग बाळा निवांतपणे गरम पाणी अंगावर घेवू लागला. बाळाला आईच्या हातची आंघोळ आवडत नाही पण आठवड्यातून एकदा आई त्याला आंघोळ घालतेच. दगडाने घासून घासून त्याचे हाल करते.

अंघोळ करून बाळा खुशीतच घरात शिरला. पांढरा शर्ट, खाकी चड्डी, टोपी चढवून बाळा सज्ज झाला. दफ्तर आवरून पिशवीत भरलं. मग जेवायला बसला. तव्यातली उसळ आणि गरम भाकरी. आता बाळाला दिवसभर काही लागणार नाही. बाळाला पैसे लागत नाहीत. बाळा चॉकलेट, गोळ्या खात नाही. आईने दिलेले पैसे, बाळा पेन्सील, शाई, खोडरबर साठी वापरतो. उम्याच्या पिशवीत खायला काहीतरी असतंच. अकराला शाळा असते पण वस्तीवरची, लांबची पोरं लवकरच आलेली असतात. बाळाही दहालाच शाळेत जातो. तासभर कोवळ्या उन्हात खेळता येतं. उम्या शाळा भरताना येतो. प्रार्थनेला उशीर करतो, मग मास्तरांच्या छड्या खातो. पण त्याचे त्याला काहीच वाटत नाही.

बाळाला शाळा आवडते. लांबलचक वऱ्हांडे , पाणी घालून, काटेकुटे लावून जपलेल्या प्रत्येक वर्गाच्या बागा. समोरचं मोकळं मैदान, कडेची झाडं. बाळाला शाळा जीवंत वाटते. खेळताना वाळूत घसरून कितीवेळा गुडघे फुटले असतील, खरचटलं असेल. मऊ माती लावली की रक्त थांबतं. कपड्याला डागही पडत नाही. खपली धरून कधी गळून पडते तेही समजत नाही. सुरपाट्या, कब्बडी, खोखो खेळताना गुडघे फुटतातच. आई ओरडते, तेल लावते. बाळाच्या घरात घड्याळ नाही. रेडिओ आहे. बाळाने भिंतीवर दहाची खूण करून ठेवली आहे. घरासमोरच्या झाडाची सावली, बरोबर दहा वाजता खुणेवर येते. मग बाळा वडिलांच्या फोटोला हात जोडून, आईच्या पाया पडून शाळेत जायला निघतो.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>