वर्षा वेलणकर ह्यांची ही एक अप्रतिम कथां आहे....वाचाच!!
दुम्मा – वर्षा वेलणकर
वाड्याच्या दारात पाय ठेवल्यावर आधी पायरीशीच एका परातीत आलेल्या माहेरवाशिणीचे पाय धुण्याची प्रथा होती. आईचा पदर छोटुकल्या मुठीत गच्च आवळून धरलेल्या इटुकल्या लालीला परातीत उभं राहायला भारी वाटायचं.
पाय धुवून झाले की मामी पदराने पावलं पुसायची. पण हे झालं की आई मायकडे वळायची. माय दुम्मा घ्यायची. दोन्ही हात आईच्या गालांवरुन फिरवून, सगळी बोटं आधी कानशिलावर मोडायची आणि नंतर सगळी बोटं पुन्हा एकदा चेहऱ्यावरुन फिरवून ओठांवर टेकवायची.
मायने दुम्मा घेतला की आईच्या डोळ्यात पाणी तरळताना लालीला दिसलं की तिचा चेहरा हिरमुसायचा. परातीत धुवून घेतलेली पावलं मग दारातच अडखळायची. माय मग तिला जवळ ओढून घ्यायची आणि तिचाही दुम्मा घ्यायची. तिचे रखरखीत हात आपल्या गोबऱ्या गालांवर फिरवून घेणे लालीला अजिबात आवडायचे नाही. तिच्या हातांनी गालाला त्रास होतो आणि म्हणून आईला रडू येतं, असा निष्कर्ष लालीने लगेच काढला होता.
"तू असा पापा का घेते?"
तिने तक्रारीच्या सूरात पहिला प्रश्न मायला केला होता.
"काय इचारतंस माह्या लेकरा?"
मायला तिची शहरी भाषा अवघडून टाकायची. लालीने कितीही काही सांगायचा आणि विचारायचा प्रयत्न केला तरी ती फक्तच कौतुकाने हसायची. लालीसारखं तिचंही अर्ध बोळकं तोंड मजेदार दिसायचं. पुन्हा मायच्या हातांचा स्पर्श नको म्हणून लाली तिच्यापासून दूरदूर राहायची. रात्री ओसरीत बिछाने पडायचे. अंगणात मायच्या खाटे शेजारी लाली आईच्या कुशीत निजायची.
सगळे झोपी जाईस्तवर माय आणि आई काहीबाही बोलायच्या. लाली तारे मोजायची. कविता म्हणायची. हातवारे करायची. पण त्या दोघींच्या बोलण्यात खंड पडत नसे.
"तिला माझी गोष्ट कलत नाई,"
लाली आईजवळ भुणभुण करायची.
"तुलाही तिची गोष्ट कळत नाही सोन्या!"
लालीला थोपटत आई एवढं एक वाक्य बोलायची. लालीच्या गोष्टीत चांदण्या होत्या, मामा घेऊन जायचा शेतात ती बैलगाडी होती; आंब्याची झाडं होती; मचाण होतं; झाडांवरची माकडं होती; कोवळ्या कैऱ्या होत्या; विहीर होती; मोट होती; मोटेच्या खळखळत्या पाण्यातील आंघोळ होती; आंब्याचा रस-पोळी होते; गाईचं फेसाळलेलं उन-उन दूध होतं.
मायची गोष्टं मात्र तिला कळत नसे. कितीतरी उन्हाळ्याच्या सुट्या ह्या अश्याच गेल्या. मग माय गेली. आईला दुम्मा न घेताच रडू आलेला लालीला दिसलं. माय गेली, म्हणजे काय, हे कळण्याइतकी लाली आता मोठी झाली होती. परातीत पाय धुवून घेणे, मामीने पदराने पाय पुसणे, योग्य नाही; तो मोठ्यांचा अवमान आहे आणि अशी प्रथा बंद पडावी, अशी मतं असण्याइतकी लाली मोठी झाली होती.
आता वाड्यावर गेले की दुम्मा घेणारी माय नव्हती. मुळात दुम्मा घेण्याची प्रथाही बंद झाली होती. अनेक वर्षांनी जेव्हा तिच्या छोट्या लालीला घेऊन लाली माहेरी आली तेव्हा आईने तिचा दुम्मा घेतला. तिच्या रखरखीत हातांचा स्पर्श होताच जेव्हा पापण्या ओलावल्या तेव्हा लालीला मायची गोष्ट कळली आणि तेव्हाच तिच्या लालीने तिला प्रश्न केला,
"ही अशी पापा का घेते?"