आज ही कथा निवडायच सुद्धा एक स्पष्ट कारण आहे. सेक्स हा एक हळूच चोरून बोलायचा विषय राहिलेला नाही. स्त्री साठी सुद्धा नाही. त्याचा आनंद कसा उपभोगावा...एकांतात..एकट्याने...सुद्धा ...का नाही? वृंदाने अनेक विषयांना खुबीने स्पर्श केला आहे. कदाचित २०१७ ह्या वर्षात स्त्री अभिव्यक्ती अशा मोकळेपणाने झालेली पाहायला मिळेल.
पहाट-वृंदा मणेरीकर
अशी मधेच जाग आली की छातीत धडधडायला लागतं.
किती वाजलेत पाहण्यासाठी मोबाइल हातात येतो, पहाटे पावणेपाच पाच वाजत आलेले असतात. सवयीने फेसबुक उघडत. अगदीच काही मिनिटांपूर्वीच तुझं लास्ट लॉगिन बघुन मनापासून हायसं वाटतं आणि मला अशी जाग येण्या मागच कारण ही समजत.
धड़धड़ किंचित कमी झालेली असली तरी अंग थोडंसं ओलेतं जाणवत राहतं. कपाळावर फुटलेला थोडा घाम हातानेच टिपून घेते. माझ्या शरीरावर पसरलेला तुझा सुगंध आता सकाळी अंघोळ केल्याशिवाय जाणार नाही हे एव्हना मला कळलेल असतं. जवळच्या बाटलीतलं पाणी पिऊन मी परत पलांगवर आडवी होते. तुझा प्रोफाइलचा नवीन फोटो पहात असताना सहज तुझी आकृती पलंगावर माझ्या शेजारी तयार होत जाते तेव्हा तुझे दीर्घ श्वास सावकाश लयीत येत असतात. माझा हात हातात घेऊन तो हलकेच दाबतोस. डोळे बंदच असतात तुझे. त्या क्षणापुरता तू जणू संपुन गेलेला असतोस.
हलकं हसू फूटत मला, तुझ्या अशा गलित अवताराकडे बघुन. काही क्षणापूर्वी सारं शौर्य आणि कसब पणाला लावून लढलेला तू अन् आताचा शिकार होऊन पडलेला तू. उगाच काही शाब्दिक उपरती सुचतात मला तुला असं बघितल्यावर. अर्थात, मी ही काही डोळे फाडून बघत नसतेच् हां तुला! डोळे बंद असतात माझे कारण ते क्षण जन्माला येतात ते फक्त अनुभवण्यासाठीच. नेहमीप्रमाणे. आता तू असा निपचित पड़लास माझ्यामुळे, आणि बघ ना, मी सचेतन झालेय, तुझ्यामुळे. तू तरी कधी बघितलयसं मला असं जिवंत झालेलं? नाहीच ना? कारण आता तू अनुभवतोयस, मिळवलेल्या समाधानाची उजळणी करतोयस. तरी झोप येई पर्यन्त डोळे बंद ठेवून दोन तीन वाक्यं काहीशी पुटपुटतोस. हळूहळू तुझी हाताची पकड़ सैल पडत जाते. आणि तुझा झोपेचा दूसरा अध्याय सुरु होतो.
मी मात्र जागी, टवटवीत. तुला अंधारात निरखत राहते थोडावेळ. तुझ्या लांबसडक बोटांमधे बोट गुंफुन अलगद तुझ्या पांघरुणात शिरते. तुझ्या माझ्या भविष्याचा विचार येतो मनात, त्याला अगदी निकषाने परतवून लावते. तुझ्याकडे एकटक बघत राहते बरेचदा. झोप येतच नाही बराच वेळ. मग मी तरी काय करणार? लोळत राहावसं वाटतं पण अगदी तासभरातच अलार्म होणार असतो. मग तीच धावपळ. म्हणून या सहवासासाठी दुपारची वेळ मला जास्त छान वाटते. घराचे सगळे पडदे ओढून अंधार करायचा. जेवढा मंद उजेड येत राहतो घरात तो मोहक आणि आकर्षक वाटतो. तुझ्याशी तुझ्यासारखं बोलता येतं तेव्हा. रात्री वेळ हातातून भरभर निसटून जात असतो. पहाटे गोड़ धुंदी असते खरी, पण आपल्यातला प्रणय मात्र यंत्रवत वाटतो मला. दुपारी घड्याळ ही निवांत फिरत राहतं. जे करायच जस करायच तसा करण्याची मुभा मिळते रे! पुरुषांना नसतो इंट्रेस्ट या सुरुवातीच्या उत्कट गोष्टींत. पण स्त्रियांना हे राधन आवडत. मला आवडतं. माहिती आहे तुला. मूड बनतो बाकी सगळं मनासारखं जमुन येतच मग!
पण तू कसला ऐकायला! इतका दमतोस दिवसभर स्वतः च्या कामात तरी तू ही पहाटेची वेळच निवडतोसं. मला चांगलच आठवतयं एकदा आपल्या चौकडीत तुला कुणीतरी हीच वेळ का अस विचारलेलं. आणि तू उत्तरादाखल काहीतरी वाहयात कारणं दिलेलीस! काय तर म्हणे, सुमंगल प्रभात, मॉर्निंग अलार्म, शुद्ध हवा, मॉर्निंग वॉक, व्यायाम वगैरे काहीही. केवढं हसलेलो ग्रुपमधे सगळे या तुझ्या Justification वर. सगळे नंतर तुला यावरून चिड़वायचे. पण तुला काडीमात्र फरक पडायचा नाही. तु बेधड़क बोलायचास. अगदी स्त्रीच्या दृष्टिकोनातुन ही! तुझं म्हणणं बहुतांशी खरच असायचं. स्त्री शरीराने पुरुषांच्या मनात प्रवेश करते आणि पुरुषाचा स्त्रीच्या मनात प्रवेश झाला तरच शरीराशी होऊ शकतो. पुरुष एकांतात एकटेपणाच् सुख एकट्याने जस उपभोगू शकतो, तसच स्त्रीने ही ते उपभोगाव. पुरुषाच्या गरजांच्या ओझ्याखाली कुणी स्त्री तिच्या अपरोक्ष दबली जातेच की. तेवढयासाठीच्, तेवढया क्षणापुरतीच. प्रेम वगरे बरचं नंतर. मग स्त्रीला जर असाच मोकळा श्वास घाव्यासा वाटला तर काय चुकलं? जेव्हा तिला हव तेव्हा तिने असा दीर्घ श्वास घ्यावा, वारंवार घ्यावा. एकटेपणा तेव्हाच सुसहय होतो ना!
मुली उगाच नाही लट्टू व्हायच्या रे तुझ्यावर, किती मुली स्पष्ट मोकळ्या झाल्या असतील तुझ्यामुळे!! तुझ्याकडे! पण तुझा क्लास ठरलेला. तसा आपल्यात ही बराच काळ लोटला नाही? आता नावारूपालाच राहिलिये ओळख. पण खरं सांगू तर मला ही तुझ्या सवयीने बऱ्याच गोष्टी जमु लागल्यात...मनस्वी झालेय म्हण हवं तर. बाकी काय सांगणार? जेव्हा अशी पहाटे जाग येते, तू ही जागा दिसतोस तेव्हा मन सहज बोलू लागतं, तुझी आजची पहाट माझी होती अस वाटून जातं. उगाच स्वत:च कौतुक वाटत, थोडावेळ का असेना मग!
शरीरावर न उठलेल्या तरी ही मला स्पष्ट दिसणाऱ्या त्या ख़ास खुणा मी पुन्हा पुन्हा गोंजारून ठेवते. पुढल्या पहाटे पर्यंत. नकळत माझे ही डोळे बंद होतात. सुखाची एक डुलकी झोप, अलार्म वाजेपर्यंत आता मी ही घेते.