प्रथम नूतन वर्षाभिनंदन! आजची पहिली कथा आहे - शून्य जाणिवांच्या शहरी कथा - कथा क्रमांक २ - झापड.
शुन्य जाणिवांच्या शहरी कथा
कथा २ :
झापड – सुचरिता (रमा अतुल नाडगौडा)
लहानपणापासुन तिला बस लागते. प्रचंड. नुसती रस्त्यावर उभे राहुन चालणारी बस दिसली तरी मळमळायला सुरुवात. खरं तर मुंबईत राहुन बसचा रोजचा प्रवास सवायीचा झालेला. पण तो थोडका असतो. शिवाय ट्राफीकमुळे सावकाश आणि थांबत थांबत. लाल डब्यासारखा सलग नाही की ज्यामुळे पोटातल्या ऐवज आणि अवयवाला एक गरगरती लय यावी.
गुरुत्वाकर्षाणाच्या विरुद्ध दिशेने!
लग्नानंतर हा एक इश्युच झाला. बस विरुद्ध ट्रेन. ज्या गावाला ट्रेन जात नाही त्या गावाला जाणेच नको वाटायचे. नातेवाईकांना भारी नको नको त्या बिळात रहायची खोड असते. न जाऊन चालत नाही आणि ट्रेन तिकडे असत नाही. आवळा सुपारी, आलेपाक, अवामिन, लवंग, खङी साखर..केव्हढा जामानीमा! चंद्रावर स्वारी आठवलं.
जाताना उपाशीपोटी बरी झोप लागली. खाली उतरून श्वास घेतला मोकळ्या हवेवर पोटभर. मग लग्नबिग्न इत्यादी झालं. आता परतीचे संकट. त्यात दिवसाचा प्रवास. उन्हात तापलेली गाडी. रेटुन गर्दी. रिझर्व्हेशनच्या सीटवर बसताचति नवऱ्याच्या हक्काच्या खांद्यावर स्वतःला लोटुन दिलं. डोळे मिटुन घेतले. सुरु झाला घरघराट, थरथराट, खडखडाट..
कण्हण्याचा आवाज आला का? तिने मुश्किलीने डोळे उघडले. नवऱ्याचा खांदा अवघडला असेल बहुतेक. पण तो सुद्धा गाढ झोपेत होता. गँगवेमधे एक १५ -१६ वर्षांची नाज़ुक मुलगी. तिच्या शेजारी सभ्य दिसणारा एक साधारण पस्तिशीचा दाढीवाला. गर्दी तिला त्याच्या अंगावर लोटत होती आणि याचे हात तिच्या अंगावरुन मुक्त फिरत होते. पिंजऱ्यातल्या भेदरलेल्या प्राण्याचे डोळे असेच दिसतात का? तिने उठुन प्रतिकार करण्याचा विचार केला. उठली सुद्धा. मुलीने खुप आशेने पाहिलं. पण गोळीची तीव्र झापड होती डोळ्यावर. पोटातुन ओठांकडे येणारी उबळ दाबुन टाकण्यात तिचे डोळे पुन्हा मिटले. कधी तरी बस थांबली. लेकरु उतरून गेली होती वाटते. घर आलं. मेंदुची गरगर थांबली. त्यानंतर किती वेळा प्रवास केला. आता ती दक्ष असते. नजर चुकार हरिणीच्या शोधात. मदतीसाठी.
पण त्यावेळी चुकलचं. माकडीणीची गोष्ट संपली .
सुचरिता