सचिन अवसार - पुन्हा एक नव्या दमाचा लेखक...फार चांगली कथा ....
रंजू-सचिन अवचार
अंधार दाटायला लागला होता. एव्हाना रंजूकडे वीसरुपये तरी जमायला पाहिजे होते. आज सुटीचा दिवस म्हणजे जास्त लोक बाहेर मोठ्या हॉटेल्सला जेवायला जात असतात हे पाच सहा वर्षाच्या ह्या चिमुकल्या जीवाला नित्याचा भाग म्हणून माहिती होत, परंतु तरीही छोट्या चहा, नाश्त्याच्या रेगड्यांजवळ नशीब नावाची गोष्ट माहित नसलेला हा जीव त्याला आजमावण्याचा प्रयत्न करत होता.
थंडीच्या दिवसात सुद्धा अनवाणी पायांनी, तोडक्याच मळकटलेल्या फ्रॉकमध्ये, चेहऱ्यावर खूप धूळ मळी साचलेली, केस अर्धे मोकळे आणि विचित्रपणे पसरलेले, डोळ्यात आशेची आणि भुकेची स्पष्टता, गुढघ्या पर्यंतचा फ्रॉक संपला की त्यापासून खाली असणारे पाय आणि हाताचा जेव्हढा भाग उघडा होता त्याला खूप खाजवून खाजवून अगदी पांढरे ओरखडे पडलेले. अश्या स्थितीत एक हाताने डोके खाजवत ती प्रेमी जोडपे शोधून तिथे पैसे मागत होती.
तसं तिला शिकवलं गेलं होतं. चहा घेणारे, कटिंग चहा घेतला की उरलेले सुटे पैसे खिशात घालत अगदी त्याच वेळी त्यांच्या पायाला पकडायच आणि काहीही न बोलता हाताने पैसे मागायचे. देत नाही किंवा रागाने हाकलून लावत नाही किंवा काहीवेळा चहा विकणारा गिर्हाईकांना त्रास होऊ नये म्हणून काठी उगारून हाकलून लावत नाही तोपर्यंत हात पसरवत राहायचं...छोटी रंजू अश्या प्रकारे पैसे मागत फिरायची. मोक्याचे ठिकाण ठरलेली असायची. चहावाले, फ्रुट सलादवाला, जेवणाची खानावळी असे जास्त गर्दी आणि प्रेमी जोडपी येणारे ठिकाणं म्हणजे रंजूच्या कमावण्याचे स्थळ होऊन बसले होते.
आज मात्र रंजू घाबरलेली होती. मावशीला कमीतकमी पन्नास रुपये कमाई लागायची. ह्या जीवाला रुपये म्हणजे काय ते माहिती नव्हतं पण सवयीचा भाग म्हणून तिला मावशीची नेमकी पैश्याची भूक किती रुपये जमवले म्हणजे भागते हे अंदाजेच तिला कळायला लागले. ते मिळवले म्हणजेच आपल्याला काहीतरी जेवण मिळेल आणि आपली पोटाची भूक भागेल एवढेच तिला माहिती..
फ्रुटस्टॉल पासून ती सहसा स्वतःला दूर ठेवायची. तिथे भीक मागायला गेल्यावर लोक तिला खाऊ घालायचे पण पैसे मात्र देत नव्हते. एक हात पोटाला लावून आणि दुसरा हात सतत समोरच्याच्या अंगाला तो आपल्याकडे बघत नाही तोपर्यंत स्पर्शत राहायचा. त्याने आपल्याकडे बघितलं म्हणजे दोन्ही हात भिकेसाठी पुढे करायचे आणि डोळ्यात पाणी आणून पोटाला लावायचे. समोरचा लक्ष देतो असं बघून हात परत परत पोटाला लावायचे आणि चेहऱ्यावरील भावांनी असं दाखवायचं की गेल्या बऱ्याच दिवसांपासून ती भुकेली आहे. मग दया आलीच तर तीस रुपये प्लेट असणारी फ्रुट सलाद तिला न देऊ शकणारी लोक खिशात हात घालून पाच-दहा रुपये काढून द्यायची. लगेच कोणीतरी म्हणायचं,
"कशाला देता साहेब..? रोजचचं आहे त्यांचं. परेशान करतात ग्राहकांना. जेवण करा म्हटलं तर करत नाही अन दोन रुपये दिले तरी आनंदाने घेतात. लाज वाटायला पाहिजे यांच्या आई बापाला.." पण हे ऐकण्याचा किंवा कधीकधी शिव्या खाण्याचा रंजूला सवयीचा भाग झाला होता.
असं बोलणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष करत रंजू फक्त पैसे देणाऱ्याच्या हाताकडे बघत रहाते. दया आली आणि इच्छा झाली तसंच खिशात सुटे सापडले म्हणून ती व्यक्ती हातावर पैसे ठेवायची. मग रंजू दूर जाताना परत परत त्या फुकटचा सल्ला देणाऱ्या माणसाकडे रागाने बघायची. आई-बाप काय आहेत हे आपल्यालाच माहिती नाही मग हा का बोलतो त्यांना असा अनुत्तरित प्रश्न घेऊन ती फ्रुट स्टॉल कडून दुसरीकडे जाणार परत हात पसरवायला.
हळू हळू रात्र होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून जमवलेले पैसे काढून, जमलेल्या पैश्यांचा अंदाज घेऊन मावशीकडे जायची वेळ झाली असे वाटलं म्हणून ती घराकडे चालायला लागली. मावशी म्हणजे रंजूला आणि रंजू सारख्या टाकून दिलेल्या मुलांना, सापडलेल्या मुलांना बळजबरीने भीक मागायला लावून त्या पैश्यांवर अधिकार गाजवायची. शरीराने जाडजूड, तोंडात सतत तंबाकू कोंबलेली, लुगडं नेसून कंबरेला पिशवी अडकवलेली, चेहरा बघून कोणीही घाबरेल असे हावभाव. आवाज भारदस्त आणि डोळे मोठे केले की काळ्या चेहऱ्यावर ते पांढरे डोळे अगदीच थरकाप करून सोडायचे. अशी कोणीही घाबराव असं व्यक्तिमत्व असलेली साधारण साठीमध्ये असलेली स्त्री होती.
जिवंत फेकून दिलेल्या ह्या मुली मावशी शोधायची आणि त्यांना वाढवून त्यांना भीक मागायला लावायची. थोड्या मोठ्या झाल्या त्यांना कळायला लागलं, पळून जातील अशी भीती वाटायला लागली म्हणजे त्यांना कुंटणखान्यात विकून टाकायची. मावशी मात्र आपण ह्या मुलांशी योग्य तेच वागतोय हेच बरोबर आहे असा समज करून घ्यायची. तिला कधी कधी कोणी म्हणायच,
"मावशे लई चुकीचं वागत आहेस बघ तू, कुठं भरशील पाप ह्याच, किती छळशील त्या चिमुकल्याना...?"
तिच्या म्हणण्याप्रमाणे ती नसती तर आज ही मुल जिवंत नसती राहिली.
त्या दिवशी रंजू घरी गेली तेव्हा मावशी बाहेरच बसली होती. तिने लगेच स्वतःजवळचे पैसे तिला दिले आणि तिच्या मोजण्याची वाट बघत तिथेच थांबली. मावशी रंजूने जमवलेले पैसे रोजच्या रकमेच्या जवळपास होते म्हणून तिला हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली,
"हं...जा आता कर काय करायचं ते आणि लवकर घरी ये..समजलं का..?"
झालं रंजू हसत मुखाने बाहेर पळाली. थेट फ्रुट स्टॉल ला जाऊन थांबली. परत त्याच पद्धतीने भीक मागायला लागली. दिवसाचे ठरवून दिलेले पैसे मावशीला देऊन झाले होते. ती झाली मावशीच्या पोटाची पैश्यांची भूक. पण आता मात्र रंजू स्वतःच्या पोटासाठी मागत होती. आता मात्र तिला पैसे नकोच होते. तिला केव्हापासून सलादच्या स्टॉल वर वरची साल अगदी अलगद सोलून काढून काचेच्या पेटीत मांडलेले लाल टरबूज खायचे होते. मघापासून भीक मागताना पोटाकडे जाणारे हात आता ती टरबुजाकडे आणि समोरच्याच्या अंगाला लावून ती त्याला भीक मागत होती. एक झाला दोन झाले पण कोणी काहीच देईना.
थोड्यावेळाने एक प्रेमी युगुल तिथे आले तिला वाटल आता हे तरी आपल्याला देतील काही मग आपण टरबूज मागू. वीतभर पोटाला कितीकच खायला लागणार होते पण तेवढीही दया कोणी दाखवत नव्हतं. मग आता ह्या डोंघांकडे ती आशेने बघत होती. त्या युगुलाने एकाच प्लेट मध्ये खाण्याचा विचार केला असावा, त्यांनी एक प्लेट ऑर्डर केल. दोघांनी एकाच प्लेट मध्ये प्रेम वाढण्यासाठी घेतलं असावं हे कळण्याइतपत मात्र रंजू मोठी नव्हती. तिला वाटलं दोघांनी एक प्लेट घेतली म्हणजे ह्यांच्याकडेच पैसे नसावेत. म्हणून तिने त्यांना काहीच मागितले नाही. मान खाली घालुन ती नुसती चोरट्या नजरेने बघत होती.
तिकडे छोट्याश्या प्लेट मध्ये एकावर एक कापलेल्या तुकड्यांना काटेरी चमच्याने खुपसून खुपसून युगुल खात होते. रंजू मात्र आसुसलेल्या नजरेने बघत होती. गेल्या अर्ध्या तासापासून तिला कोणीच काही दिलेलं नव्हतं. म्हणून आता वाटेल ते करायला ती तयार होती. टरबुजाचा लाल रंग तिला आणखी जास्त आकर्षित करत होता. पोटापेक्षा मन ऐकायला आता तयार नव्हत. मावशीला कमी पैसे दिले असते तरी चाललं असत असं तिला आता वाटायला लागलं होतं. एकतर दुकान बंद करायची वेळ पण जवळ आली होती आणि टरबूज पण कमी राहील होत. तेवढ्यात तिच मन जसा विचार करत होत तसच झालं. एकाच प्लेटमध्ये खाता खाता युगुलाकडून एक तुकडा खाली पडला. क्षणाचा सुद्धा विलंब न लावता रंजू त्याकडे वळली आणि तो तुकडा उचलला आणि तेथून पळाली.
घरी जेवण करत असताना खाली जमिनीवर पडलं तरी ते उचलून खाण्याची आणि खाली पडल म्हणजे परत ताटात घ्यायची सवय तिला होती. त्याच निरागस मनाला वाटलं मग खाली पडलेला तुकडा कोणीतरी उचलेल म्हणून तिने त्यावर अशी अचानक आणि घाईत झडप घातली आणि लगेच उचलून कोणीतरी आपल्याला परत मागेल या भीतीने ती तेथून पळत सुटली. थेट हातपंपा जवळ थांबली. हातपंपाच्या दांड्याला लटकून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. पाणी आले तसेच तिने टरबुजाचा तुकडा त्याखाली धरून त्यावरील माती धुण्याचा प्रयत्न केला. मनाच समाधान होईपर्यंत धुतलं. साफ झालं असं वाटलं मग ते अधाश्यासारखं खायला सुरुवात केली. खाता खाता पावलं घराकडे वळले.
रंजू खुश होती. एव्हाना टरबूज खाण्यासाठी तिला सलादवाल्याची कचरापेटी शोधावी लागत असे. त्यात सलादवाल्याने टरबुजाच्या काढून टाकलेल्या सालीला पूर्णपणे न निघालेले टरबूज मिळायचे त्यात तोंड खुपसून मनाची भूक भागवावी लागत असे. आज मात्र तिला पूर्ण वीतभर तुकडा मिळाला होता. मळकटलेल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य मात्र स्पष्ठ दिसत होते.
अंधार चांगलाच दाटला होता, दोन्हीकडे सुद्धा....वातावरणात सुद्धा आणि रंजूच्या आयुष्यात सुद्धा..