आज लुप्तच्या पहिल्या प्रकरणाचा शेवटचा भाग. मी कादंबरी दिवाळी नंतर प्रसिद्ध करायची ठरवली आहे. ४ नोव्हेंबरला...तो पर्यंत तुम्हाला दुसरे प्रकरण अशा हप्त्यात वाचायला आवडेल? फक्त कॉमेंट मध्ये "YES" टाईप करा.
लुप्त - विक्रम भागवत
प्रकरण १ले - भाग ५वा
मी पुन्हा अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थेला पुन्हा फोन लावला.
त्यांना नाव, पत्ता दिला आणि अगदी साधा अंत्यसंस्कार हवा आहे हे बजावले. भटजी, मंत्र सगळ्याला काट. हे आटोपून मी जॉन कडे वळले.
"अरे त्याना जरा वेळ लागेल… तुला हॉस्पिटलमध्ये जायला हव" मी त्याला म्हटले. त्याने लिहित असलेल्या कागदावरून मान वर केली.
"म्हणजे तू एकटीच सगळ …. स्मशानात सुद्धा?" - तो विश्वास न बसल्या सारखा माझ्याकडे पहात होता.
"का? नाही करू शकत?" - मी त्याला विचारले.
"साम हा शक्य अशक्यतेचा प्रश्न नाही … काय योग्य आहे आणि काय अयोग्य ह्याचा प्रश्न आहे" - माझ्या डोळ्यांना डोळे भिडवित तो म्हणाला.
"जॉन हा चर्चेचा विषय करू नकोस… हे सगळ एकट्याने करायची माझी इच्छा आहे … तू हॉस्पिटल मधून रात्री इकडेच ये… मला रात्री तुझी गरज लागेल" मी त्याला खुर्चीतून उठवत म्हणाले.
"ठीक आहे … मी डेथ सर्टिफिकेट पाठवून देतो" तो दरवाजाच्या दिशेने निघाला. मी त्याचा हात पकडून त्याला थांबवल.
"जॉन थ्यांक्स … " मी त्याला म्हणाले.
त्यानंतर त्याच्या मिठीत विसावताना मला काहीच त्रास झाला नाही. मित्राची विश्वासाची मिठी. त्याच्या छातीतले स्थिर ठोके मला ऐकू येत होते. त्यांच्यात कुठेही चलबिचल नव्हती.
"किस मी जॉन" मी त्याला म्हणाले.
त्याने हलकेच माझा चेहरा वर उचलला आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवले.
"टेक केअर किड" त्याने माझ्या डोक्यावर थोपटल्या सारखे केले आणि तो बाहेर पडला.
मी पुन्हा विश्रामकडे … मृत विश्राम कडे निघाले.
जसा त्याचा ठसका कमी झाला तशी त्याला त्याच्या पूर्ण नग्न्तेची जाणीव झाली आणि तो कावराबावरा झाला. पण माझे त्याच्या कडे तसे लक्षच नव्हते. मी, माझे हात, चारकोल, डोळे … एकाच चित्रात पूर्ण पणे हरवले होते. त्याने हलायचा प्रयत्न केला तशी मी किंचाळले.
"हलायचे नाही … आजिबात हलायचे नाही … जसा आहेस तसाच रहा… " माझ्या धार धार आवाजाने तो जिथल्या तिथे स्त्ब्ध झाला.
मी काही वेळाने मोकळी झाले. तो तसाच जमिनीवर पडला होता.
"जा आता … कपडे करून ये. मी चहा करते"
मी स्टुडीओतून बाहेर पडले आणि वर आले. किचन मध्ये शिरून चहाचे आधण ठेवले. शरीराने मी सगळे काही करत होते पण त्याची वेदना मला सर्व दिशांनी घेरून बसली होती. आत आत झिरपत होती. हे हे काहीतरी वेगळे हातातून होते आहे …अस्सल निर्मितीची ग्वाही देते आहे ह्याची गडद जाणीव होत होती. त्याचा श्रांत चेहरा…पराभुत, जिवनेच्छा हरवलेला, डोक्यावरचे विस्कटलेले केस, ओठांवरून लटकलेली लाळेची तार, त्याचे थरथरणारे हात, बोटांची निळसर नखे, झिरपणारे डोळे, छातीच्या बरगड्या, कृश मांड्या … केविलवाणे पाय, भेगा पडलेल्या टाचा, पोटरी वरच्या निळ्या नसा … आणि दीनवाणे इंद्रिय सगळेच एकमेकांना पूरक आणि संवादित होते… कुठेहि विसंवाद नव्हता … एक वेगळीच हार्मोनी….ओह!
मी चहाचे मग घेऊन दिवाणखान्यात आले तर तो नव्हताच. मी घाई घाईत खाली स्टुडीओ मध्ये गेले … बाथरूम मध्ये शिरले पण तिथेही तो नव्हता. मी पुन्हा वर आले… तो निघून गेला होता. कोणीतरी आपल्या फाडकन मुस्कटात मारावी तसे मला वाटले!
बेल वाजली तशी मी भानावर आले. अंत्यसंस्कार करणारे आले होते. त्यांनी विश्रामला उचलून खाली ठेवले. त्याच्या शरीरावर हार घातले. माझ्या हातात चंदनाचा हार सरकवला.
"हे काय … चंदनाचा कशाला?" माझ्या तोंडून प्रश्न निसटलाच.
"प्रथा… " त्यांचे उत्तर.
बरे आहे! सगळे प्रथेला अर्पण केले की आपल्याला काही त्रास नाही!! इच्छेचा प्रश्न नाही…प्रथा!
"कोणासाठी थांबायचे आहे?" त्यांचा प्रश्न.
"नाही मी तुम्हाला सांगितले होते" मी स्पष्ट.
"मृत्यूचा दाखला मिळाला आहे…तुम्ही आमच्या शववाहिकेतून येणार की स्वतंत्र?" - सगळे प्रश्न रोख ठोक.
"मी माझी गाडी घेऊन येतेय. परत येताना लागेलच." - मी
"स्मशानाचा पत्ता ठाऊक आहे?" - पुन्हा एक रोख ठोक सवाल.
"तुम्ही निघा पुढे मी आलेच" - मला आता त्यांचा कंटाळा आला होता.
पुढच्या क्षणी विश्राम दारातून बाहेर पडला.
दहा वर्षांपूर्वी स्वतःच्या पायांनी आत आला होता … आज …!!