आईपण एक आंतरिक स्रोत ....
विक्रम
आईपण – नफिसा सय्यद
तिला थायरॉईडचा त्रास होता डॉक्टर म्हणाले तूम्ही आई होऊ शकत नाहि आणि आधुनिक पद्धतीने प्रयत्न केला तरी ती कितपत यशस्वी होईल सांगता येत नाहि. त्यानंतरही तुम्हा दोघांच्या जीवाला धोका आहेच.
तिला धक्का बसला हे ऐकून सहा वर्ष सतत प्रयत्न करून घरच्यांच्या अपेक्षांना खरं उतरता येत नाही. पतीची एक सहज इच्छा पूर्ण करता येत नाही. या विचारांनी डोक्यात थैमान घालायला सुरुवात केली.
मग समोर दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा तिटकारा वाटू लागला यांना इतकं सहज लाभणारं आईपण आपल्या नशिबी का असं वांझपण. खूप त्रागा झाला शिक्षण, नाती सगळंच खोटं वाटू लागलं. तोडावे बंधन आणि एकटं राहाव जिथे कोणी ओळखीचच नसेल. कोणी प्रश्नच विचारणार नाही. किती झाली वर्ष लग्नाला याच कोणी कॅल्कुलेशन करणार नाही. मग ही उदासीनता कमी होईल बहुतेक.
माणसाला प्रश्नच मारतात हेच खरंय बहुतेक. लोक टपलेली असतात कोणी दुःखात सापडुच दे, आम्ही येतो सहानुभूती द्यायला सगळं जग फसवं आहे. खरं काही नाही. मग हळू हळू दृष्टी व्यापली. ज्यांच्या पदरी सगळं आहे त्यांना तरी लोकांनी कुठे सोडली.
प्रत्येक माणूस काहीतरी त्रासात आहे. दुःख कवटाळून रडत आहे.
तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत नवरा म्हणाला,
"संध्या किती त्रास करून घेशील?? आपल्या नशिबात नाही स्वतःच मुल फक्त या सत्य स्थितीला मान्य कर, त्रास कमी होईल. तुला माहित आहे का?? माझ्या चेहऱ्यावरचं हे दुःख मुलासाठी नाहीये. तेही जगाच्या प्रश्नासाठी आहे त्याहूनही जास्त ते तुझ्या त्रास करण्यामुळे आहे. मी लढेन देईन उत्तर सगळ्यांना. तू खंबीर राहा. आपण मुल दत्तक घेऊ. तुला काय वाटत आईपण मुल जन्माला घालूनच येत का?? आईपण मुलांच्या संगोपनात असत. जिच्या ह्रीदयी मायेचा पाझर तीच खरी आई."
तो जे बोलत होता ते त्याच मोठेपण होत. तिच्या मनाला फक्त टोचणी होती जगाची, लोकांची. तिच रडणं अजूनही थांबत नाही हे पाहून नवरा म्हणाला,
"बरं सगळं विसर, एक सांग फक्त तुला काय वाटत??"'
त्याच्या या प्रश्नाला तिने डोळे भेदून त्याच्याकडे पाहिलं. तिच्याही डोळ्यात तोच प्रश्न होता आता,
"मला काय वाटत??"
ती विचार करीत होती.
खरंच का मला आईपण हवंय?? की फक्त लोकांसाठी हे स्टेटस आहे. मीही आई होऊ शकते??
तिला खूप गुसमटल्यासारखं वाटलं.
नवऱ्याने पाणी आणून दिल.
एक घोट पाण्याचा तोही दुखत गेला घश्यातुन.
तिच रडणं थांबलं होत.
उत्तर तिच्याजवळ नव्हतं.
नवरा म्हणाला शांत हो थोडा अराम कर. तिला झोपवून अंगावर चादर टाकून निघून गेला.
तिला बहुतेक फक्त हेच हवं होत....
तिला काय वाटत.... तिच काय मत आहे.... तिची इच्छा काय आहे....
या नंतर जगाला ती जुमानणार नव्हती....