आठवणीतील गोष्टी - पुष्प १३वे
पैंजण – स्वाती धर्माधिकारी
तिच्या लग्नाच्या खरेदीच्या वेळी तिनी जरा छुमछुम वाजणारे पैंजण निवडले ,तसा सासूबाई आणि जाऊबाईंनी पदर लावला तोंडाला हसू दाबायसाठी ...तिला काहीच कळलं नाही तेंव्हा (अशाही बावळट पोरी असायच्या त्यावेळी यावर या पिढीचा विश्वास बसेल का कोण जाणे !?)
लग्नानंतर कित्येक महिने ते पैंजण रुणझुणायचे ...खुद्खुदायचे, त्यांना त्या जाऊबाई आणि सासूबाई का हसल्या ते कळलं होतं !! पैंजण म्हणजे रिझवणं , पैंजण म्हणजे साद तिला वाटे !
मग जशी ती जास्तच व्यस्त झाली वृद्धांच्या सेवेत आणि गृह्कृत्यात , तशी ती पैंजण मूक झाली ...एका पेटीत निमूट पडून राहिली काळवंडत ! घर रिकामं झालं, वृद्धांचे प्राणरुपी पक्षी आणि आकांक्षांचे पंख फुटलेली मुलं उडून गेली भुर्रर ...घर फक्त दोघांचं झालं .
आता ती ही चूप झालेली ,मुकी झालेली पैंजणां सारखीच. एक दिवस तिनी ती पेटी उघडली ...त्या पैंजणांनी खुणावलं तिला . त्यांना प्रेमभरानी उचलून घेत उजळून टाकलं तिनी पैंजणांना आणि मनालाही ! आता घरात परत छुमsssss छुम , रुणझुण. तिला वाटलं येतील परत ते आधीचे दिवस .मात्र त्या पैंजणाची भाषा त्याला कळेचना .वयानुसार श्रुती मंद होतात म्हणून ? कि हा आता त्याला पोरखेळ वाटतोय? म्हातारपणात काय असलं खूळ असं वाटतंय ---- तिला कळेना .
तिला पैंजण रूतू लागले ...ती बोच असह्य होऊ लागली.एकेकाळी "आ तोहे सजनी ले चलू नदीया के पार" म्हणणाऱ्या त्याला आता सतत "तोहे बिन साजन लागे ना जियरा हमार" च ऐकवत राहिली पैंजण .त्याला कळलीच नाही ती भाषा खूप ओळखीची असूनही !
हरून, हताश होऊन तिनी ठरवलं आता उतरवून ठेवूत पैंजण .का कोणास ठावूक, एक दिवस थांबू वाटलं तिला .त्या दिवशी जीवाचे कान करून पैंजणांची रुणझुण ऐकली तिनी ...शेवटची म्हणून! ती ऐकू लागली आणि ऐकतच राहिली .ती रुणझुण केवळ तिच्यासाठीच होती ...तो आवाज तिच्यामुळे आणि तिच्यासाठी आहे हे कळून ती खुदकन हसली .
तेंव्हा पासून ती आणि पैंजण रुणझुणतात .....स्वतःसाठी ही !!