डॉ. माधवी वैद्य ह्यांनी एका मानवी मनाचा खेळ किती अप्रतिमरीत्या रंगवला आहे...वाचत रहावी अशी कथा
विक्रम
आवा चालली – डॉ. माधवी वैद्य
आजींनं देवापाशी निरांजन लावलं. आधुनिक काळातही आजींचा देवापाशी निरांजन लावण्याचा प्रघात कधी चुकला नाही. घरंदाज, खानदानी घराण्याचा तो रिवाजच होता. तो आजींनी आपल्या परीनं जपला होता. ‘तरी हल्ली आम्ही काहीच करत नाही हो! पूर्वी आमच्या घरात तिन्हीसांजेला सवाष्णीला हळदी कुंकवाला बोलावले जायचे. रोज सवाष्णीची ओटी भरली जायची. आता इतकं नाही होत आमच्याच्यानं. पण निदान देवापाशी निरांजन तरी लावलं गेलं पाहिजे ना!’ आजी नेहमी सांगायच्या. निरांजनं लावल्यावर प्रकाशानं भरून गेलेला गाभारा आणि त्या निरांजनाच्या प्रकाशात उजळून निघालेले देव बघितले की आजींच्या मनाला कसं शांत निवांत वाटायचं. आजींनी निरांजनं काढली त्यात वाती घातल्या आणि त्या पेटवायला काड्याची पेटी घेतली. काडी ओढली, पण वात तेवायलाच तयार नाही. ‘अगो बाई! आज काय हे विपरीत बाई? आज वात का तेवेना? नीट भिजली नाही म्हणावं, तर आजींनी वाती स्वत:नीच तुपात भिजवलेल्या होत्या. आत्ताच काय झालं न तेवायला? बरं वारंही सुटलेलं नाही. काय बाई विपरीत तरी एकेक!’ आजीचं मन नाही म्हटलं तरी जरा चरकलंच... खरंच असं कध्धी म्हणता कध्धीच झालं नव्हतं. आजी क्षणभर कावर्याीबावर्याट झाल्या.
आज सकाळपासूनच आजींचं मन थार्यांवर नव्हतं. काही दिवसांपासूनच आजींची तब्येत जरा बरी नव्हती. आता वयाप्रमाणे काहीबाही तक्रारी सुरू होणारच, म्हणून आजींनी तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्रास काही थांबेना. काही खाल्लं तरी सोसेना. मग खाण्याचं प्रमाण आपोआपच कमी झालं. मग वजन कमी झालं. मग त्या बरोबर अशक्तपणा. तोही झेपेना. शेवटी मुलाबाळांच्या आग्रहाखातर डॉक्टरांकडे तपासण्या सुरू झाल्या. त्यासाठी हेलपाट्यांनी आजींचा जीव कासावीस झाला. नको तो जीव आणि नकोत त्या तपासण्या, असं होऊन गेलं आजींना. काही सोसवेना, काही पेलवेना, काहीच झेपेना, देहाला या. अशीच आजींची अवस्था झाली. त्यांनी अनेकदा मुलांना सांगूनही बघितलं ‘अरे नको रे मला आता काही नको. ईश्वरानं सगळं दिलं आहे मला. मी अत्यंत समाधानी आहे. मला आता काही म्हणता कशाचीच आस नाही. जाऊ देत ना, राहू देत या चाचण्या बिचण्या. काही निघत नाही या चाचण्यात आणि डॉक्टर मग सांगतात, ‘ काही नाही झालं तुम्हाला. तुम्ही ठणठणीत आहात. तुमचे सर्व रिपोर्टस् अगदी नॉर्मल आहेत. आजी ! स्वस्थ राहा, मजेत.’
आजीनं लावलेली वात तर पेटली, पण नेहमीसारखी शांतपणे उजळेना. अस्वस्थ होऊन तेवत होती. हे सारंच आजींना जाणवत होतं. काल पूजा करताना, पूजेतला गंगेच्या पाण्याचा कलशच निसटला होता, आजींच्या हातून. तेव्हाही आजींच्या मनाला अशीच बेचैनी जाणवून गेली होती. त्यांनी म्हटलं देखील होतं सुनेला, ‘आज गंगेचा कलश फुटला ग माझ्या हातून. असं व्हायला नको होतं. कुठे तिसरी घंटा तर वाजली नाही आयुष्याची?’ सून तेव्हा त्यांच्या अस्वस्थ मनाला धीर देत म्हणाली होती ‘काही होणार नाही तुम्हाला. नका उगाच काळजी करू.’ पण जरी ती असं म्हणाली असली तरी तिच्याही मनात कणकेतल्या मिठाएवढी भीती होतीच. आजींची दिवसेंदिवस थकत जाणारी तब्येत आणि घटत जाणारं वजन यामुळे सार्यांभच्याच मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण कोणीच कोणाशी उघडपणे बोलून दाखवत नव्हतं. आजींनी देवाला हात जोडून मनोमन नमस्कार केला. नमस्कारासाठी हातांना टेकलेलं डोकं त्यांनी वर उचललं आणि बघतात तो काय, निरांजनाची ज्योत विझली होती. आजी मनातून चरकल्या. सून गेली आहे डॉक्टरकडे रिपोर्टस् आणायला. काय म्हणतात रिपोर्टस् काय ठाऊक पण काही तरी अशुभ तर ऐकायला नाही ना मिळणार? आजीचं मन अस्वस्थ झालं. देवापुढचं निरांजन आज विझलं हा कसला तरी संकेत असावा का?
इतक्यात दाराचं फाटक वाजल्याचा आवाज झाला. झालं आता. आली वाटतं सून आपले रिपोर्टस् घेऊन डॉक्टरकडून. आजी जड पावलांनी दार उघडायला उठल्या. काय असेल त्या रिपोर्टस्मधे ? रिपोर्टस् पॉझिटिव्ह असतील का निगेटिव्ह? तसं खरं तर आपल्याला एक पचनाची तक्रार आणि वजन कमी होणं या व्यतिरिक्त दुसरं काहीच तर होत नाहीये. हल्ली ना उगाच या तपासण्यांचं स्तोम माजवतात डॉक्टर. परवा तर त्यांच्या एका मैत्रिणीनं आपल्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या. त्यात निदान आलं त्या जीवघेण्या कॅन्सरचं. आपल्याला कॅन्सर झाला आहे, या भावनेनं ती इतकी घाबरून गेली की काही विचारू नका. बी.पी. चढलं तिचं. तिला अॅंडमिट करावं लागलं आणि त्यानंतर कळलं की म्हणे कोणाच्या तरी रिपोर्टस्ची अदलाबदल झाली होती. आणि तिचे सर्व रिपोर्टस् अगदी नॉर्मल होते. झालं! आहे की नाही मजा? आजी आपल्याच मनाशी असा संवाद साधायचा प्रयत्न करीत होत्या. आजी विचार करत करत हॉलमधे आल्या. हल्ली चालायची गतीही खूपच मंदावली होती. काठीचा आधार घ्यावासाही वाटे त्यांना.
बाहेर वॉचमननं गॅरेजचं दार उघडल्याचा आवाज आला. म्हणजे आता आपला रिझल्ट थोड्याच वेळात सून आपल्या हातात ठेवणा, समजलं नाही तर समजून सांगणार. आजींच्या मनात आलं. काहीही असेना का त्या रिपोर्टस्मधे. त्यानं काय फरक पडतो आपल्याला? पूर्ण आयुष्य जगून झालं आहे आपलं. दृष्ट लागण्यासारखा अगदी हेवा करण्यासारखा संसार झाला आपला. जरा आजोबांना बरं नसतं, इतकं खरं आहे.पण अंथरुणाला खिळून असतानाही मुलं त्यांच्याकडे चांगलं बघत आहेत ना? झालं तर. माणसाला आणखी काय हवं असतं ? या वयात आम्हा म्हातार्यांलना त्यांचाच तर आधार! त्यांनी आमच्याकडे नीट लक्ष दिलं की आणखी काहीच नको असतं आम्हाला. उलट आपल्याला अहेवपणी मरण आलं तर खरं तर किती चांगलं होईल. सोने पे सुहागा म्हणतात ना! अगदी तसं. मुलं छान आहेत, सुना चांगल्या आहेत, नातवंडं सद्गुणी आहेत. इतकंच काय पण परवा तर नातसूनही घरात आली. सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच आली जणू. काय जोडा शोभत होता बाई! लक्ष्मी नारायणाचा! सर्व आमच्या दोघांशी छान वागतात. देवानं दोन्ही हातांनी भरभरून दिलं.
देता किती घेशील दो करांनी म्हणत तो देतच गेला. खरंच, काही म्हणता काही कमी नाही आपल्याला. लक्ष्मी, सरस्वती दोघी एकत्र नांदत आहेत आपल्या घरात. अशा भरल्या संसारातून जरी आपल्याला जावं लागलं तरी काय बिघडलं? उलट किती चांगलं! नव्हे या जगातून एक्झिट सुध्दा वेळेतच झाली पाहिजे. तरच त्यात गंमत! आजींचं विचारचक्र चालूच होतं. इतक्यात गाडीचं दार वाजलं. सुनेनं गाडी गॅरेजमधे पार्क करून आता घराकडे मोर्चा वळवलेला दिसतोय.
नाही म्हणजे आपण काही मरणाला घाबरणार्याच नाही आहोत. पण तरीही काय असेल त्या रिपोर्टस्मधे? आपण जगणार की मरणार? नाही म्हणजे संधी दोन्हीपैकी कशाला मिळणार? जो जन्माला येतो त्याला मरण अटळच, नाही का? मग कधीतरी यायचंच असेल त्याला तर- तर वेळेतच यावं! त्यात काय वाईट आहे? आपण तर त्याच्या स्वागताला उत्सुक असावं, असलं पाहिजे. हो पण हाल नकोत व्हायला जिवाचे. झाडाचं पान जितक्या सहजपणानं गळतं तितक्या सहजपणानं आयुष्य सरलं पाहिजे. पण ते आपल्या हातात का असतं? आता यांनी का खितपत पडावं असं अंथरूणावर? सगळ्यांचं आयुष्यात चांगलंच केलं ना त्यांनी? पण हे प्रत्येकाचे भोग असतात आणि ते हसतमुखानं भोगावेच लागतात. हेच अंतिम सत्य आणि अंतिम उत्तर. दुसरं काही नाही. आपल्या नशिबी काय लिहिलं आहे, कोणास ठाऊक! नाही तर एखादा नको तो गंभीर आजार निघायचा आणि मग त्यांच्या शेजारी आपलंही अंथरूण! देव करो आणि दीर्घ गंभीर आजाराचं निदान त्या रिपोर्टमधे नको येऊ देत म्हणजे झालं. तसंच होईलसं वाटतं आहे. काय ते हल्ली हेरिडिटी का काय म्हणतात ना?
तसंच होईल. आपली आई, आजी कोणीच दीर्घ आजारानं गेल्या नाहीत. आत्ता होत्या आणि आत्ता गेल्या. इतक्या सहजपणानं पिकल्या पानासारखी गळून पडली आयुष्य त्यांची. बहिणाबाईनं म्हटलं आहे ना! ‘आला सास, गेला सास जिवा तुझं रे तंतर, अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर.’ अस्सं मरण यावं माणसाला. आजींना आपल्याच विचाराचं हसू आलं. जणू आपल्या मरणाचा रिमोट आपल्याच हातात आहे! ... अग बाई! ही येत का नाहीये घरात अजून? आजी आता उत्सुकतेनं सुनेची वाट पाहात होत्या. सुनेची वाट पाहात होत्या का तिनं डॉक्टरकडून आणलेल्या रिपोर्टस्ची? आजींनी दार तिच्यासाठी उघडून ठेवलं होतं. तिच्यासाठी उघडलं होतं का आपल्या भवितव्यात काय होतं आहे, आपल्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, ते बघण्यासाठी उघडलं होतं?
पण सून काही घरात येईना. शेजारणीनं नेमकं गाठलं होतं तिला. शेजारणीलासुध्दा आत्ताच वेळ मिळाला वाटतं हिच्याशी गप्पा मारायला. बरं तिला वेळ मिळाला हे ठीकच आहे, पण हिला नको होतं का कळायला की आपली सासू वाट पाहात असेल आपली म्हणून. आता काही असलंच रिपोर्टस्मधे तर जे असेल ते भोगायला शांतपणे तयार राहायचं आपण. आपल्यामुळे, आपल्या दुखण्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. इतकी खबरदारी आपण घेतली तर कोणालाच त्रास होणार नाही आपला. आपण आपलं मुलांना सांगूनच टाकावं की, ‘बाबांनो! कसलेही महागडे उपचार करू नका माझ्या दुखण्यासाठी. कॅन्सर झाला असेल तर कल्याणच. मग तर हालाला पारावारच नाही. नको ग बाई त्या केमो आणि ते हाल! जिवंतपणी मरणंच की ते! छे! तसलं काही तर मी मुळीच करून घेणार नाही. कोणीही कितीही सांगितलं तरी कोणा कोणाचंही ऐकणार नाही. अगदी यांचंसुध्दा. हो ! माणसं फार लबाड असतात. त्यांना वाटेल, माझ्या आधी हिनं जाऊच नये. पण आता आपलाच नंबर लागणार बहुतेक आधी... पण हो, तेवढं मात्र बरीक बरं झालं असतं हो ! पतवंडाचा चेहेरा पाहून मरण आलं असतं तर किती चांगलं! पण सर्वच गोष्टी भाग्यात लिहिलेल्या असतात, असं नाही.’ आता मात्र आजी विचार करकरूनच अर्ध्या अधिक थकल्या होत्या. पार पाठीचा कणा मोडल्यासारखा झाला होता त्यांच्या. पार दमून गेल्या होत्या त्या.
इतक्यात दारात सुनेची पावलं वाजली. सून घरात आली. म्हणाली, ‘सासूबाई का अशा बसलात ? दमलात ना ? तरी सांगत असते मी नेहमी की आता आराम करा. जे काही दिवस आपल्या वाट्याला असतील, त्याचा आनंद घ्या. पण तुम्ही ऐकाल तर शपथ!’ सून रिपोर्टस् वगैरेबद्दल अवाक्षरही न काढता सरळ आत निघून गेली. आजींना वाटलं हल्लीच्या मुली तरी कसल्या, त्यांना जाणच नाही आमच्या मनाची. आम्ही कशा अगदी सतत सासूबाईंच्या मागे पुढे, मागे पुढे फिरत राहायचो. आता हिला जर माहीत आहे की आपण त्या डॉक्टरच्या रिपोर्टस्कडे डोळे लावून बसलेलो आहोत, तर हिनं आधी आपल्याशी आस्थेनं बोलावं की नाही, गेली आपली मला ओलांडून सरळ माझ्या समोरून. नाही तशी ती वाईट नाही हो, चांगलीच आहे. अलीकडच्या सुना बघितल्या तर खूपच बरी. पण एक आपली वागायची रीत असते, म्हणते मी ! खरं की नाही ? आजीबाईंच्या मनात आलं.
इतक्यात सून आतून आली. आली अन् म्हणाली, ‘सासूबाई! तोंड गोड करा बघू. छान बातमी आहे.’ आजी म्हणाल्या, ‘अगोबाई! हो का? कोणती ती?’ सून म्हणाली, ‘ तुम्हाला पतवंडं होणार!’ आजींच्या मनात आलं ही मला पतवंडं होणार म्हणून मला पेढा भरवते आहे आणि वर जे काही दिवस आपल्या वाट्याला असतील त्याचा आनंद घ्या, असा उपदेश करते आहे, म्हणजे आजीबाई ! चला बांधा आपलं गाठोडं आणि पंढरपूर गाठा सरळ. म्हणून आजीबाई उठणार इतक्यात मुलगाही समोर येऊन उभा ठाकला आणि म्हणाला, ‘आई आणि हा दुसरा पेढा! तुझे सर्व रिपोर्टस् एकदम नॉर्मल बरं का! नो प्रॉब्लेम!’ आजी एकदम स्तब्धच झाल्या म्हणाल्या, ‘अग्गोबाई! खरंच की काय? अरे तू सांगतोयस म्हणून नाही तर ही आवा पंढरपूरला जायचं म्हणून गठुडं बांधूनच बसली होती ना रे!’ मुलगा म्हणाला, छे! छे! आई पतवंडाचं लुगडं नेसल्याशिवायच कुठे जातीस ग पंढरपूरला ? आणि खरं सांग तुला जाववेल तरी का ?’ सारं घरच हसण्यानं भरून गेलं. आजीबाई हळूच डोळ्यात जमलेले आनंदाश्रू पदरानं टिपत होत्या. मनोमन सुखावल्या होत्या.