आज नुक्कड - आठवणीतील गोष्टी आणि भूतबंगला सर्वावर सुचिता आहे...एकाच लेखिकेची ही विविध रूपे तुम्हाला खूप आवडतील
विक्रम
अभागी – सुचिता घोरपडे
एक अगदी क्षीण झालेली तरूणी. अंगावर फाटके मळकट जीर्ण कपडे, केस विस्कटलेले. शुन्यात हरवलेली आणि काहीतरी खाण्यासाठी भुकेली झालेली तिची नजर खुप काही सांगत होती. तिला पाहून सगळे विचार करू लागले कुठून आली असेल ही? आणि हिची अशी अवस्था का झाली असेल. पण ती काय बोलतच नव्हती. सगळे आपापसात बोलू लागले तिच्याविषयी.
“काय रं शिरपा, ही कोनं रं आलीया गावात? पयला कदी नाय पायलं हिला.”
“नाय रं ठाव,म्या बी नाय पायलं कदी.”
मग कोणीतरी तिला खायला दिले, नजरही वर न करता तिने ते सगळं अधाशीपणे संपविले. मग त्या गावातच ती राहू लागली. बस स्थानकाच्या आवारात फिरायची, भीक मागायची. काय मिळेल ते खायची. पण कोणाला त्रास दयायची नाही. महत्वाचे म्हणजे ती बिचारी मुकी होती, कुणाला बोलणार तरी कसे? गावातील काही टारगट मुलांची नजर होती तिच्यावर. ते तिला त्रास दयायचे. तिची छेडछाड काढायचे पण गावातील काही सभ्य लोकांना घाबरून त्यांनी ते बंद केले.
काही महिन्यानंतर तिच्यात बदल जाणवू लागला बहूधा ती गरोदर असावी. आता सगळे तिलाच दोष देऊ लागले. बदचलन कुलटा अश्या बाईमुळे आपले गाव बदनाम झाले वगैरे वगैरे. काही बायकांनी तर तिला गाठून खुप चिखलफेक केली, तिला वाटेल तश्या त्या बोलू लागल्या.
“बोल कुणाच पाप हाय? तुज्यासारख्या बाईला गावातच घ्याया नग पायजे व्हत. दया दावली तर असं पांग फेडलं तूनं. अशी नालायक बाई आमच्या गावाला बट्टा लावाया निगाली. चल नीग..नीग आमच्या गावातनं.”
“काय ठाव कोन बाप हाय ह्या पापाच्या गोळ्याचा. गरीब बिचारी म्हणूनश्यान दया दावली तरीबी आपली जात नाय सोडलीस, पापाचा धंदा केलासच.”
हे सगळे आरोप तिला सहन होत नव्हते. तिला खुप काही त्यांना सांगायचे होते, पण तिच्या तोडून किंकाळी शिवाय दुसरे काही बाहेर पडेनाच. बिचारी मुकी अभागी मनात आर्ततेने ओरडत होती. “नाय नाय म्या नाय पाप केल, ह्यो पापाचा गोळा नाय भुकेचा गोळा हाय. माजी भुक नाय ही........वासननं पिसाळलेल्या मुडद्यांची भुक हाय. भुक भागवली अन त्या भुकेचा गोळा तेवडा माज्या वाटयाला ठेवला.”
पण कुणी काही ऎकूनच घेतलं नाही तिचे, दग़ड मारून गावाबाहेर वेशीबाहेर घालवून देण्यात आले आणि ती अभागी फिरत आहे, वाली नसलेल्या पोराचं ओझं उराशी घेवून दारोदारी भीक मागत.