आठवणीतील गोष्टी - पुष्प १०वे
मोबदला - सुचिता प्रसाद घोरपडे
आज माला खुप खुश होती. तिच्या मालकिणीने तिला वर्षभर राबवून घेतलेल्याचा मोबदला दिला होता.तसा ती महिन्याचा पगार घेत असे,पण पोरीच्या लग्नाला हातभार म्हणून त्यातील काही रक्कम मालकिणीकडेच तिने ठेवली होती.कारण घरी दारूडा नवरा सगळा पगार दारूमध्येच बुडवायचा. मुलीच्या लग्नासाठी एखादा दागिना करायची तिची इच्छा होती.आणि हे मालकिणीसमोर कित्येक वेळा बोलली देखील होती.त्यामुळे मालकिणीने तिला वर्षभराचा राहिलेला पगार म्हणून सुंदर सोन्याची कर्णफुले दिली.
म्हणूनच मालाचा आनंद गगनात मावत नव्हता, तिला मालकिणीचे खुप कौतुक वाटत होते. एवढी घणसर कर्णफुले थोडे स्वतःचे पैसे घालूनच केली असतील.त्याच आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत ती घरी पोहचली.पण आज नवरा तिच्या अगोदर घरी. त्याची नजर चुकवून तिने कर्णफुले तांदळाच्या डब्यात लपवून ठेवली. थोड्या वेळात काही कामानिमित्त ती बाहेर पडली.
ती गेल्याचे पाहून हळूच तो उठला आणि लपविलेली कर्णफुले घेवून पसार झाला.लागलीच त्याने सोनाराला गाठले व कर्णफुलाची किंमत मागितली. सोनाराने जरा निरखूनच पाहिले आणि जोरातच ओरडला, "मला काय मुर्ख समजला आहेस का? सोन्याचे पॉलीश असलेले दागिने खरे म्हणून विकतोस? थांब पोलीसांनाच बोलावतो."
घरी जावून त्याने मालाला चांगलेच बदडून काढले. माला धावतच मालकिणीकडे गेली आणि जाब विचारू लागली. तशी मालकिण जास्तच खवळली, रागाने ओरडून म्हणाली, "आता चल,निघ इथून नाहीतर पोलीसांनाच बोलावते माझे दागिने चोरलेस म्हणून."
मालाचे त्राणच गळून पडले, ती हताशपणे तिथून निघाली.